मुंबईत प्रदूषणाचा विळखा, रस्त्यावरच्या वाहतूक पोलिसांना श्वसनाचा त्रास
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
ऑक्टोबरअखेर मुंबईने प्रदूषणात दिल्लीला मागे टाकले होते. दिवसाचे आठ ते दहा तास रस्त्यावर उभे राहणाऱ्या वाहतूक पोलिसांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे.
मुंबईला प्रदूषणाचा विळखा पडला असून त्याचा सर्वाधिक फटका वाहतूक पोलिसांना बसत आहे. हे पोलीस दिवसाचे आठ ते दहा तास रस्त्यावर उभे राहून वाहतूक नियंत्रित करतात. मुंबईत थेट रस्त्यावर उतरून वाहतूक सांभाळणाऱ्या बहुतांश पोलिसांना काही ना काही श्वसनाचा विकार जडल्याचे दिसून येत आहे.
या पोलिसांचा सामना रोज फक्त धूळ आणि रखरखत्या उन्हाशी होत नाही. लाखो गाड्यांमधून बाहेर पडणाऱ्या कार्बन डाय ऑक्साइडशीही त्यांना रोज तोंड द्यावे लागते. म्हणजेच दिवसभर रस्त्यावरच्या हवेशी त्यांचा थेट संबंध येतो. एमआयडीसी परिसरात आणि ज्या ज्या ठिकाणी प्रकल्पांची कामे सुरू आहेत, तिथे ड्युटी करणाऱ्या वाहतूक पोलिसांची अवस्था जास्त खराब होत आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस मुंबईने देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक असलेल्या दिल्लीला मागे टाकले होते. महिना बदलला तरी परिस्थितीत फरक पडलेला नाही. उलट, गेल्या काही दिवसांपासून दिवसा कडक ऊन आणि रात्री थोडा गारवा अशी स्थिती आहे आणि त्याचा परिणाम रहिवाशांवर होत आहे. त्यात वाहतूक पोलिसांना सर्वाधिक त्रास होत आहे.
शहरात वेगवेगळ्या ठिकाणच्या वाहतूक पोलिसांशी बोलले असता, सर्दी, पडसे आणि खोकला आता सामान्य झाल्याचे समोर आले. मात्र छातीत दुखणे, नाक आणि घसा खवखवणे, तसेच अनेक दिवस न थांबणारा खोकला यामुळे बेहाल झाल्याचे काही वाहतूक पोलिसांनी सांगितले. मुंबईतील खराब हवेबद्दल सर्व माध्यमांतून बातम्या येत आहेत, तसेच समाजमाध्यमांतून तज्ज्ञांनी दिलेले इशारे आणि लेखही येत आहेत.
यंदा ऑक्टोबरमध्ये मुंबईतील वायू प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. ऑक्टोबरमधील बहुतांश दिवशी मुंबईने प्रदूषणाच्या बाबतीत दिल्लीलाही मागे टाकले होते. जागतिक पातळीवर आयक्यू एअरच्या अहवालानुसार, मुंबई जगातील तिसरे सर्वात प्रदूषित शहर ठरले होते. तिथे हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १६६ ते २०० च्या दरम्यान नोंदवला गेला.
मुंबई आणि उपनगरे मिळून १०२ बिटचौक्या आहेत आणि तिथे ३ हजारांपेक्षा अधिक वाहतूक पोलीस कर्तव्य बजावतात. हेच पोलीस शहरातील रोजच्या २७ लाख वाहनांची वाहतूक नियंत्रित करतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात १२९ ठिकाणी प्रदूषणाचे हॉट स्पॉट आहेत. त्यापैकी ३० पेक्षा अधिक ठिकाणी शासनाचेच वेगवेगळे प्रकल्प सुरू आहेत, ज्यामुळे धुळीचे प्रदूषण प्रचंड वाढत आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.