मुंबईतील १२२ वर्षे जुन्या क्यानी कॅफेवर FDA ची कारवाई, उंदराची विष्ठा, माश्या, झुरळे आढळली; परवाना निलंबित
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने मुंबईतील क्यानी अँड कंपनी कॅफेची अचानक तपासणी करून त्याचा FSSAI परवाना निलंबित केला आहे.
मुंबईतील सुप्रसिद्ध क्यानी अँड कंपनी (Kyani & Co. Cafe) या कॅफेवर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने, म्हणजेच FDA ने कारवाई केली आहे. हा कॅफे जवळपास १२२ वर्षे जुना आहे. महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात सध्या FDA च्या कारवाया सुरू आहेत, आणि त्यातलीच ही ताजी कारवाई मुंबईत झाली. या कारवाईत FDA ने कॅफेचा FSSAI परवाना निलंबित केला आहे.
FDA च्या पथकाने कॅफेची अचानक तपासणी केली. १२२ वर्षांपासून सेवेत असलेल्या या लोकप्रिय कॅफेमध्ये तपासणीदरम्यान भयानक आणि किळसवाणे चित्र दिसल्याचे समोर आले आहे. अन्न तयार करण्याच्या आणि साठवण्याच्या जागी अधिकाऱ्यांना उंदराची विष्ठा, जिवंत माश्या आणि मेलेली झुरळे आढळली. परिसरात मांजरेही दिसली. एका रेफ्रिजरेटरमध्ये थेट रक्त सापडले. त्यामुळे कॅफेच्या स्वच्छतेबद्दल मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
एवढ्यावरच गोष्ट थांबली नाही. तपासणीत आणखी धक्कादायक प्रकार समोर आला. एका उघड्या सांडपाण्याच्या मॅनहोलजवळच अन्न तयार केले जात असल्याचे दिसले. काही खाद्यपदार्थ थेट जमिनीवर ठेवलेले होते, तर कच्चे पीठ वर्तमानपत्राने झाकलेले होते. कच्चे आणि तयार खाद्यपदार्थ वेगळे ठेवण्यातही अनेक त्रुटी अधिकाऱ्यांना दिसल्या.
FDA च्या म्हणण्यानुसार, अशा परिस्थितीमुळे अन्न दूषित होण्याचा धोका बराच वाढतो आणि त्याचा ग्राहकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. म्हणूनच विभागाने ही अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेची गंभीर समस्या मानली आहे.
तपासणीनंतर FDA ने Kyani & Co. Cafe चा FSSAI परवाना निलंबित केला. या कारवाईचा एक भाग म्हणून कॅफेला खाद्यपदार्थांची खरेदी, साठवणूक, विक्री आणि वितरण थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. म्हणजेच आवश्यक त्रुटी दूर होईपर्यंत कॅफेच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे.
क्यानी कॅफेवरील ही कारवाई महाराष्ट्र FDA च्या राज्यव्यापी अन्न सुरक्षा मोहिमेचा भाग आहे. ही मोहीम २३ ते २७ सप्टेंबर दरम्यान राबवण्यात आली. या काळात अनेक खाद्य आस्थापनांची तपासणी झाली. अहवालानुसार ३० आस्थापनांचे परवाने किंवा नोंदणी प्रमाणपत्रे निलंबित करण्यात आली आणि मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले.
क्यानी अँड कंपनी हा कॅफे १९०४ मध्ये सुरू झाला आणि तो मुंबईतील सर्वात जुन्या इराणी कॅफेंपैकी एक आहे. एवढा मोठा इतिहास असलेल्या या कॅफेवर FDA ने कारवाई केल्यामुळे त्याच्या स्वच्छतेबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत.