मुल-नागपूर एसटी पुन्हा धावू लागली; मुनगंटीवारांच्या पाठपुराव्याने मुलवासीयांना दिलासा
मुल-नागपूर बससेवा २९ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू झाली असून, नागपूर आणि उमरेड डेपोतून वाढीव सेवाही सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
चंद्रपूर : मुल ते नागपूर ही बससेवा २९ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू झाली आहे. ही सेवा बंद असल्याने अनेक दिवस लोकांची गैरसोय होत होती. आता मुल तालुक्यातील नागरिकांच्या रोजच्या प्रवासातील मोठी अडचण दूर झाली आहे. विद्यार्थी, रुग्ण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा फायदा होणार आहे.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांना पत्र देऊन ही सेवा तातडीने सुरू करण्याची ठाम मागणी केली होती. सेवा बंद झाल्याने विद्यार्थी, रुग्ण, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि कामानिमित्त नागपूरला जाणाऱ्या लोकांची मोठी गैरसोय होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. काही वर्षांपूर्वी या मार्गावर एसटीच्या दिवसभरात सुमारे १५ फेऱ्या होत होत्या, असा उल्लेख करून मुल-नागपूर बससेवा ही लोकांच्या रोजच्या जगण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
मुनगंटीवार केवळ पत्र देऊन थांबले नाहीत. त्यांनी परिवहन मंत्र्यांशी फोनवरून संपर्क साधून सेवा तातडीने सुरू करण्याची विनंती केली. तसेच आपल्या स्वीय सहाय्यकांना विभाग नियंत्रकांकडे पाठवून विभागीय पातळीवरही पाठपुरावा केला. अनेक दिवसांच्या गैरसोयीनंतर या प्रयत्नांचे फळ म्हणून २९ सप्टेंबरपासून बस धावू लागली आणि मुलवासीयांना मोठा दिलासा मिळाला.
आपल्या पत्रात मुनगंटीवार यांनी मुल शहराचे भौगोलिक, सामाजिक, शैक्षणिक आणि व्यापारी महत्त्व स्पष्ट केले होते. नागपूरशी थेट एसटी बससेवा नसणे ही रोजच्या जीवनाशी निगडित गंभीर समस्या असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थी, रुग्ण, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग अशा अनेकांना या बससेवेचा मोठा आधार मिळतो, असेही त्यांनी म्हटले होते. त्यामुळे उपचार, शिक्षण, रोजगार, व्यवसाय तसेच शासकीय आणि सामाजिक कामांसाठी नागपूरला जाणाऱ्यांची अडचण या सेवेमुळे दूर होणार आहे.
मुल-नागपूर सेवा सुरू झाल्यानंतर आता उमरेड आणि नागपूर डेपोतून नागपूर-मुल मार्गावर वाढीव बससेवा सुरू करण्यासाठीही मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. ही सेवाही लवकरच सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मुल तालुक्यातील नागरिकांना नागपूरला ये-जा करण्यासाठी अधिक सोपी आणि नियमित सार्वजनिक वाहतूक मिळणार आहे.
मुल तालुक्याला कर्मवीर मा.सा. कन्नमवार यांचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या भागातील लोकांच्या रोजच्या गरजा आणि नागपूरला वाढत चाललेली प्रवासाची गरज लक्षात घेऊन मुनगंटीवार यांनी वाहतूक सुविधांना विशेष प्राधान्य दिले आहे.
बससेवेसाठी मुलवासीयांनी मुनगंटीवार यांचे आभार मानले. लोकांच्या अडचणीला स्वतःची जबाबदारी मानून शासनस्तरापासून विभागीय पातळीपर्यंत पाठपुरावा करण्याची त्यांची पद्धत पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली, असे नागरिकांनी सांगितले. रोजच्या जगण्याशी जोडलेला छोटा प्रश्न असो किंवा मोठ्या विकासकामाचा विषय, तो मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा करण्याची त्यांची भूमिका त्यांच्या लोकाभिमुख कार्यशैलीची ठळक ओळख ठरत आहे.