मुल कृषी महाविद्यालयाच्या आधुनिकीकरणासाठी मुनगंटीवार यांचा पुढाकार, ५ ऑक्टोबरला बैठक
मुल येथील कृषी महाविद्यालयाला भेट देऊन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि परिसराची पाहणी केली आणि 'कृषी ज्ञानसंकुल' उभारण्याचा संकल्प व्यक्त केला.
मुल येथील कृषी महाविद्यालयाचा कायापालट करण्याचा निर्धार माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. महाविद्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊन त्यांनी तेथील प्रयोगशाळा, ग्रंथालय, पॉलीहाऊस आणि संपूर्ण परिसराची बारकाईने पाहणी केली. या भेटीदरम्यान महाविद्यालयाला अत्याधुनिक 'कृषी ज्ञानसंकुल' असे रूप देण्याचा संकल्प त्यांनी मांडला.
शिक्षण, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची योग्य सांगड घालून विद्यार्थ्यांना जगातील कृषी विद्यापीठांशी थेट संपर्क साधता यावा, यासाठी टू-वे कम्युनिकेशन यंत्रणा उभारण्याची सूचना आ. मुनगंटीवार यांनी दिली. या संपूर्ण विकासकामाबाबत ५ ऑक्टोबर रोजी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या पाहणीवेळी पी.डी.के.व्ही. अकोलाचे उपकुलसचिव डॉ. एस. एस. चव्हाण, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा सहयोगी प्राध्यापक डॉ. विलास अतकारे, भाजपाचे मुल शहराध्यक्ष प्रवीण मोहुर्ले, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष बंडू गौरकार, सहयोगी संशोधन संचालक डॉ. श्रीकांत अमरशेट्टीवार, संतोष भावदे, सहायक प्राध्यापक डॉ. विशाखा डोंगरे, सहायक प्राध्यापक शाम पतींगे आणि आर्किटेक्ट चिन्मय पाटील उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या बांधकामासाठी नवीन डिझाईन तयार करताना विद्यमान नकाशामध्ये आवश्यक ते फेरबदल करता येतील का, याचा आढावा घेण्याची सूचना आ. मुनगंटीवार यांनी दिली. भविष्यातील गरज लक्षात घेऊन प्रेझेंटेशन हॉल आणि कृषीविषयक ई-लायब्ररी उभारण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
महाविद्यालय परिसरातील प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचा स्रोत बनावी, अशी कल्पना मांडत त्यांनी कृषीविषयक माहिती देणारे साईन बोर्ड उभारण्याची तसेच झाडांजवळ क्यूआर कोडच्या माध्यमातून त्या-त्या वृक्षाची संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्याची सूचना केली. यामुळे शेतीशी निगडित सर्व माहिती विद्यार्थ्यांना एकाच परिसरात मिळू शकेल.
मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी उपलब्ध जागेची पाहणी करून योग्य नियोजन करण्यास सांगतानाच वसतिगृहात राहणाऱ्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची संख्याही तपासण्याची सूचना त्यांनी दिली. महाविद्यालयातील रिक्त पदांची माहिती त्यांनी जाणून घेतली, तसेच इमारतीला आवश्यक रंगरंगोटी करून संपूर्ण परिसर स्वच्छ, सुंदर आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा ठेवण्याची सूचना दिली. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि अपेक्षाही जाणून घेतल्या.
५ ऑक्टोबरच्या बैठकीसाठी कृषिमंत्र्यांना चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आमंत्रित करून अजयपूर येथील शेतकरी प्रशिक्षण केंद्राचीही पाहणी घडवून आणली जाणार आहे. या दौऱ्यासाठी पीडीकेव्ही आणि कृषी महाविद्यालयाने एकत्रितपणे सविस्तर प्रेझेंटेशन तयार करावे, अशी सूचनाही आ. मुनगंटीवार यांनी दिली.
चंद्रपूर जिल्ह्याच्या कृषी सामर्थ्याला व्यापक व्यासपीठ मिळावे यासाठी 'वन डिस्ट्रिक्ट, वन प्रॉडक्ट' या योजनेत धान पिकाचा समावेश करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. महाविद्यालयाच्या माध्यमातून सीड स्टोरेज म्हणजेच पारंपरिक व महत्त्वाच्या बियाण्यांचे संवर्धन, जनुक संकलन व संशोधन, टिश्यू कल्चर आणि नर्सरी विकास या बाबींवर विशेष लक्ष देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
रेन वॉटर हार्वेस्टिंग, गाईंच्या विविध प्रजाती, आधुनिक शेती तंत्रज्ञान, पिकांची विविधता, संशोधन आणि स्थानिक कृषी परंपरा यासह शेतीशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी मिळावी, अशी व्यापक संकल्पना आ. मुनगंटीवार यांनी मांडली.