अल्बानीज यांचा डिसेंबरमध्ये भारत दौरा; मुंबईत व्यापार परिषद, चेन्नईत क्रिकेट सामन्याने सांगता
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज मोठ्या व्यावसायिक शिष्टमंडळासह डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार असून, मुंबईतील व्यापार परिषद आणि चेन्नईतील क्रिकेट सामन्याने या दौऱ्याची सांगता होणार आहे.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज लवकरच एका मोठ्या व्यावसायिक शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर येणार आहेत. या वर्षाच्या शेवटी, म्हणजेच डिसेंबर महिन्यात हा दौरा पार पडण्याची दाट शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अल्बानीज यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध सातत्याने दृढ होत असले, तरी दोन्ही देशांमधील आर्थिक भागीदारीची पूर्ण क्षमता अजून समोर आलेली नाही. हीच आर्थिक आणि व्यापारी दरी भरून काढण्यासाठी आणि दोन्ही देशांतील उद्योगांना नव्या संधी मिळवून देण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
अमेरिकेत होणाऱ्या जी-२० बैठकीला हजर राहिल्यानंतर, मायदेशी परतताना अल्बानीज भारतात येणार आहेत. न्यू यॉर्कमधील एशिया सोसायटीच्या एका खास कार्यक्रमात बोलताना त्यांनी या आगामी भारत दौऱ्याची अधिकृत घोषणा केली. ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान केविन रूड यांच्याशी बोलताना अल्बानीज यांनी सांगितले की, फ्लोरिडामध्ये होणाऱ्या जी-२० परिषदेनंतर ते थेट भारतात येऊन दोन्ही देशांतील व्यापार आणि क्रीडा क्षेत्रातील संबंधांना नवी गती देतील.
या दौऱ्याची आखणी खास पद्धतीने करण्यात आली आहे. अल्बानीज या दौऱ्यात भारताची आर्थिक राजधानी मुंबईला भेट देणार आहेत. बिझनेस कौन्सिल ऑफ ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधी आणि ऑस्ट्रेलियातील अनेक आघाडीच्या कंपन्यांचे प्रमुख या दौऱ्यात त्यांच्यासोबत असतील. मुंबईत एका खास व्यावसायिक परिषदेचं आयोजन केलं जाणार असून, यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियातील उद्योजक एकत्र येऊन नवीन गुंतवणूक आणि करारांवर चर्चा करतील.
व्यावसायिक कार्यक्रमांनंतर या संपूर्ण दौऱ्याची सांगता उत्साही वातावरणात चेन्नईत होईल. चेन्नईत ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये एक खास क्रिकेट सामना आयोजित केला जाणार आहे. भारतात क्रिकेटला असलेलं वेगळं महत्त्व लक्षात घेऊनच या दौऱ्याची सांगता क्रिकेट सामन्याने करायचं ठरवण्यात आलं आहे. "भारतात नेहमीप्रमाणेच, कोणत्याही महत्त्वाच्या दौऱ्याची सांगता क्रिकेटच्या जल्लोषानेच होते," असं अल्बानीज यावेळी म्हणाले. यावेळी पंतप्रधान मोदी आणि अल्बानीज एकत्र हा सामना बघण्याची शक्यता आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांमध्ये लोकशाही मूल्यं आणि राष्ट्रकुलमुळे एक जुनं आणि घट्ट नातं तयार झालं आहे. याशिवाय क्रीडा, संस्कृती आणि शिक्षण क्षेत्रातही दोन्ही देशांतील सहकार्य सतत वाढतंय. सध्या ऑस्ट्रेलियन विद्यापीठं भारतात आपले कॅम्पस सुरू करत असून, भारतीय विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण भारतातच मिळवून दिलं जातंय.
अल्बानीज यांच्या मते, भारत ही जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि लवकरच ती जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. भारताची मोठी लोकसंख्या आणि वाढती आर्थिक ताकद बघता ऑस्ट्रेलियासाठी भारतासोबतची भागीदारी खूप मोलाची आहे. दोन्ही देशांतील द्विपक्षीय व्यापाराला नव्या उंचीवर नेण्यासाठी मोदी आणि अल्बानीज हे दोघेही विशेष उत्सुक आहेत.
याच कार्यक्रमात अल्बानीज यांनी मोदींच्या नेतृत्वाचं आणि कार्यशैलीचं मनापासून कौतुक केलं. भारतातील ऊर्जा क्षेत्रातील मोठ्या बदलाचा उल्लेख करताना ते म्हणाले की, मोदींच्या कार्यकाळात भारतातील कोट्यवधी लोकांना वीज जोडणी मिळाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि इतक्या कमी काळात ऊर्जा उपलब्ध करून देण्याचं काम इतर कोणत्याही देशात किंवा प्रदेशात झालेलं नाही, असं ते म्हणाले.
तसंच, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना मोदींसोबत भारतीय समुदायाच्या एका मोठ्या कार्यक्रमात सहभागी झाल्याची आठवणही अल्बानीज यांनी सांगितली. त्या कार्यक्रमातील भारतीय वंशाच्या नागरिकांचा उत्साह प्रचंड होता. "पंतप्रधान मोदी यांनी स्टेडियममधील गर्दीला माझ्यासाठीही घोषणा द्यायला सांगितलं, ही माझ्यासाठी खूप आनंदाची आणि सन्मानाची गोष्ट होती," अशा शब्दांत अल्बानीज यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हा आगामी भारत दौरा भारत-ऑस्ट्रेलिया मैत्रीचा नवा अध्याय लिहील यात शंका नाही.