शाळा बंद करू नका, अभाविपची मागणी; राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याशी सविस्तर चर्चा
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाने शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांना भेटून शिक्षण व्यवस्थेतील अनेक प्रश्न मांडले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) शिष्टमंडळाने शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर (Dr. Pankaj Bhoyar) यांची भेट घेतली. राज्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या शिक्षण व्यवस्थेशी संबंधित अनेक प्रश्नांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. अभाविपने याआधी शासनाकडे दिलेल्या 15 कलमी निवेदनाचाही या भेटीत उल्लेख करण्यात आला.
प्रवेश प्रक्रिया, शिक्षक भरती, संचमान्यता, मराठी शाळांचे सक्षमीकरण, परीक्षांमधील गैरप्रकार, खासगी शिकवणी वर्ग आणि ऑनलाइन प्रक्रियेतील अडचणी याबाबत शिष्टमंडळाने सूचना आणि मागण्या मांडल्या.
कमी पटसंख्या आहे म्हणून मराठी आणि शासकीय शाळा बंद करण्याऐवजी त्यांचा दर्जा वाढवण्यासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करावा, तसेच विशेष कृतीदल स्थापन करावे, अशी मागणी अभाविपने केली.
टीईटी आणि इतर परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, असे अभाविपने सांगितले. 2016 मध्ये कोल्हापूर येथे टीईटीची प्रश्नपत्रिका फुटली होती. त्या घटनेची माहिती आणि त्यावर काय कारवाई झाली याचा सविस्तर तपशील द्यावा, अशीही मागणी करण्यात आली.
इयत्ता 11 वीची प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतरही अनेकदा बराच काळ चालते, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापनावर परिणाम होतो, याकडे अभाविपने लक्ष वेधले. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे पारदर्शकता वाढली असली, तरी तांत्रिक अडचणी, प्रवेश वाटपातील त्रुटी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी, अशी मागणी झाली. इयत्ता 12 वीतील प्रवेश आणि कॉलेज बदलण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्याबाबतही चर्चा झाली.
शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत, टीईटी-टॅट परीक्षांचे निश्चित वार्षिक वेळापत्रक जाहीर करावे आणि ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांना आवश्यक पायाभूत सुविधा द्याव्यात, अशीही मागणी अभाविपने केली.
शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि खासगी शिकवणी वर्ग यांच्यातील अनैतिक संगनमतावर नियंत्रण आणावे, एकात्मिक शिकवणीच्या शुल्कावर नियमन असावे आणि शाळा-कॉलेज व शिकवणी वर्गांच्या वेळांमध्ये योग्य अंतर ठेवावे, असेही अभाविपने म्हटले. संचमान्यता, आधार पडताळणी, यू-डायस संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणी आणि शिक्षकांचे विविध प्रश्न यावरही सविस्तर चर्चा झाली.
मुंबई आणि परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांसोबत स्वतंत्र संवाद आयोजित करून प्रवेश प्रक्रिया आणि शैक्षणिक प्रश्नांवर चर्चा करावी, असा प्रस्तावही मांडण्यात आला. ऑनलाइन प्रक्रिया, प्रवेश वाटप आणि संचमान्यता यासंदर्भातील सविस्तर सूचना शासनाकडे सादर करणार असल्याचे अभाविपच्या वतीने सांगण्यात आले.
या भेटीवेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री अथर्व कुलकर्णी, देवगिरी प्रांतमंत्री वरुणराज नन्नवरे, कोकण प्रांत सहमंत्री शांतनू बिरोजे, मुंबई महानगर मंत्री अभिषेक पवार, मुंबई महानगर सहमंत्री सानिका जोशी आणि अलका यादव यांच्यासह अभाविपचे पदाधिकारी उपस्थित होते.