पावसाने उघडीप घेतली, कोकणात उकाडा वाढला; मुंबईसह पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट
मान्सूनचा हंगाम संपताच राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवू लागला आहे. कोकणातील काही जिल्ह्यांसाठी आज उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट जारी झाला आहे.
मान्सूनचा हंगाम संपताच महाराष्ट्रातील हवामान बदलताना दिसत आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच राज्यातल्या अनेक भागांत 'ऑक्टोबर हिट'चा तडाखा जाणवू लागला आहे. आज 3 ऑक्टोबर रोजी कोकणातील काही जिल्ह्यांसाठी उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईसह कोकण पट्ट्यात उष्णता आणि वाढलेल्या आर्द्रतेमुळे लोक हैराण झाले आहेत. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी भागांत सध्या उष्ण आणि दमट हवामान आहे. पावसाने उघडीप घेतल्यामुळे उकाडा जास्त जाणवत आहे. पुढचे 2 ते 3 दिवस या भागांत असेच हवामान राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी कमाल तापमान 34 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणातील लोकांना उन्हाच्या चटक्यांबरोबरच दमट वातावरणाचाही सामना करावा लागू शकतो.
उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. या भागात सध्या पावसाची शक्यता कमी आहे आणि तापमानही वाढू शकते. कमाल तापमान सुमारे 31 अंश, तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस राहू शकते.
पश्चिम महाराष्ट्रातही पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर परिसरात पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे आकाश निरभ्र ते अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. इथे कमाल तापमान सुमारे 32 अंश, तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. पुढच्या काही दिवसांत हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता दिसत नाही.
मराठवाड्यात अनेक भागांत पावसाने उघडीप घेतल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाची तूट निर्माण झाल्याने शेतीवर त्याचा परिणाम होत आहे. येत्या काळातही अनेक जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. या भागात कमाल तापमान 34 अंश, तर किमान तापमान सुमारे 24 अंश सेल्सिअस राहू शकते.
विदर्भातील अनेक भागांत सध्या पावसाचा ठोस इशारा नाही आणि हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. पावसाने उघडीप घेतल्याने तापमान वाढत असून लोकांना उकाड्याचा सामना करावा लागू शकतो. कमाल तापमान सुमारे 34 अंश, तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
एकीकडे कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट आहे, तर दुसरीकडे राज्यातल्या अनेक भागांत पावसाची उघडीप आहे, अशी सध्याची स्थिती आहे. वाढलेली आर्द्रता आणि तापमानामुळे 'ऑक्टोबर हिट'चा प्रभाव जाणवत आहे. त्यामुळे परतीचा मान्सून पुन्हा सक्रिय होऊन महाराष्ट्रात पाऊस आणणार का, याकडे शेतकरी आणि लोकांचे लक्ष लागले आहे.