माणगाव-इंदापूर बायपाससाठी कोकण रेल्वेचा मेगाब्लॉक, ४ नोव्हेंबरपर्यंत काम
मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेल्या माणगाव-इंदापूर बायपासच्या उड्डाणपुलाचे गर्डर चढवण्यासाठी कोकण रेल्वे २६ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर पहाटे मेगाब्लॉक घेणार आहे; प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम नाही.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेली तब्बल १८ वर्षे रडतखडत सुरू आहे. आता हा महामार्ग पूर्णत्वाच्या जवळ पोहोचला आहे. मात्र त्यातला रायगड जिल्ह्यातील माणगाव आणि इंदापूर बायपास अजूनही रखडलेला आहे. हा बायपास रखडल्यामुळे सुट्टीच्या काळात महामार्गावर वाहतूक कोंडीचा मोठा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. हे काम पूर्ण करण्यासाठी कोकण रेल्वेचा ट्रॅक ओलांडणाऱ्या उड्डाणपुलाचे गर्डर चढवण्याचे काम आता हाती घेण्यात आले आहे.
या कामासाठी कोकण रेल्वे प्रशासन २६ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत मेगाब्लॉक घेणार आहे. हा ब्लॉक पहाटे ४:३० ते ७:३० या वेळेत असेल. या कालावधीतील शुक्रवार आणि शनिवार हे दोन दिवस मात्र ब्लॉकमधून वगळण्यात आले आहेत. म्हणजेच बाकीच्या दिवशी रोज पहाटे तीन तास हे काम चालणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ब्लॉकचा प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम होणार नाही. त्या वेळेत त्या मार्गावरून कोणतीही प्रवासी गाडी धावत नसल्यामुळे वेळापत्रक जसेच्या तसे राहील. प्रवाशांना दिलासा मिळावा म्हणून कोकण रेल्वे प्रशासनाने ब्लॉक घेताना मोठी खबरदारी घेतली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील कोकणातला हा माणगाव-इंदापूर बायपास गेली कित्येक वर्षे रखडलेला आहे. त्यामुळे सुट्टीच्या काळात मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना, तसेच मुंबईहून कोकणात आणि गोव्याकडे जाणाऱ्या प्रवासी वाहनांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतो. या परिसरात तासन् तास कोंडीत अडकावे लागते आणि त्यात तब्बल २ ते ३ तासांचा वेळ जातो. त्यामुळे हा प्रवास त्रासदायक ठरतो.
आता मात्र हा बायपास पूर्ण करण्याच्या कामाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून गती देण्यात आली आहे. प्राधिकरण आणि कोकण रेल्वे प्रशासन यांच्यात समन्वय साधून रेल्वे मार्गावर ब्लॉक घेण्यात येत आहे. बायपासवरील कोकण रेल्वे ट्रॅकवरून जाणाऱ्या उड्डाणपुलासाठी गर्डर चढवण्याचे हे महत्त्वाचे आणि जोखमीचे काम संबंधित ठेकेदार कंपनीकडून सुरू करण्यात आले आहे. हे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंता अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू आहे.
या कामासाठी आवश्यक ती सगळी यंत्रणा संबंधित ठिकाणी तैनात असणार आहे. कोकण रेल्वे प्रशासनाचे अभियंते, तांत्रिक विभागातील अधिकारी आणि कर्मचारी, तसेच महामार्ग प्राधिकरणाचे अभियंते आणि कर्मचाऱ्यांचे पथक तिथे हजर राहील. हे जोखमीचे काम अत्यंत सुरळीतपणे पार पडावे यासाठी कोकण रेल्वे प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व अभियंते यांची संयुक्त बैठकही झाल्याची माहिती आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.