मायक्रोसॉफ्टची स्वेच्छा एक्झिट योजना: सुमारे ६० हजार कर्मचाऱ्यांना पॅकेजसह नोकरी सोडण्याची संधी
माइक्रोसॉफ्ट सुमारे ६० हजार कर्मचाऱ्यांना स्वतःच्या इच्छेने नोकरी सोडण्याची संधी देत आहे. या योजनेत भारतातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
जगातली आघाडीची टेक कंपनी मायक्रोसॉफ्ट आपल्या सुमारे ६० हजार कर्मचाऱ्यांना स्वतःहून नोकरी सोडण्याची संधी देत आहे. या योजनेत भारतातले कर्मचारीही येतात. भारताशिवाय अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडातले पात्र कर्मचारी यात सहभागी होऊ शकतात. कंपनीतल्या काही निवडक टीम्समधल्या लोकांना हा पर्याय मिळेल.
कंपनीच्या एकूण जागतिक मनुष्यबळापैकी सुमारे २७ टक्के लोकांना ही संधी मिळू शकते. पण याचा अर्थ ६० हजार लोकांना कामावरून काढणार असा नाही. ही सक्तीची नोकरकपात नाही आणि कोणावरही जबरदस्ती केली जाणार नाही. ज्यांना जायचं आहे त्यांनाच हा पर्याय आहे. जे जातील त्यांना आर्थिक मदत मिळेल, तसंच करियरचं नियोजन करण्यासाठी आणि पुढची नोकरी शोधण्यासाठी मार्गदर्शन दिलं जाईल. हे पॅकेज साधारणपणे नोकरी संपल्यावर मिळणाऱ्या भरपाईसारखं असू शकतं, असंही सांगितलं जातंय.
कंपनीच्या मुख्य मानव संसाधन अधिकारी एमी कोलमन यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या अंतर्गत संदेशातून ही माहिती दिली. त्यानुसार लेव्हल ७० आणि त्याखालच्या पात्र कर्मचाऱ्यांना योजनेचा फायदा घेता येईल. दुसऱ्या एका वृत्तात उपाध्यक्ष स्तरावरचे आणि त्याखालचे कर्मचारी पात्र असल्याचं म्हटलंय. कंपनीच्या प्रवक्त्यानेही पात्र कर्मचाऱ्यांना हा पर्याय दिला जाणार असल्याचं सांगितलं. ही योजना सगळ्या विभागांसाठी नाही. डेटा सेंटर, विक्री आणि मार्केटिंगशी संबंधित काही टीम्समधल्या कर्मचाऱ्यांना यातून वगळलं जाणार असल्याची माहिती आहे. पात्रता ठरवताना प्रत्येक विभागाच्या कामाच्या गरजा, ग्राहकांशी संबंधित जबाबदाऱ्या आणि व्यावसायिक प्राधान्यक्रम बघितले जातील. ज्यांना योजना लागू होईल त्यांना ३१ डिसेंबरपर्यंत कंपनी सोडावी लागेल. काही प्रकरणांत ऑफर स्वीकारलेल्या कर्मचाऱ्याकडे गरजेची कौशल्यं आणि विशेष गुणवत्ता असेल, तर त्याला कंपनीत ठेवण्याचाही विचार होऊ शकतो.
या निर्णयामागे खर्चावर नियंत्रण आणि एआयमधली मोठी गुंतवणूक ही कारणं मानली जातात. मायक्रोसॉफ्ट डेटा सेंटर, अत्याधुनिक चिप्स, सर्व्हर आणि एआयसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उभारण्यावर प्रचंड पैसा खर्च करतंय. २०२६ मध्ये कंपनीचा भांडवली खर्च सुमारे १७५ अब्ज डॉलरपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. एआय तंत्रज्ञान विकसित करणं, वाढवणं आणि चालवणं यासाठी भरपूर पैसा लागतो. त्यामुळे मोठ्या टेक कंपन्या आपली कर्मचारी संख्या आणि कामाच्या पद्धती पुन्हा तपासून बघत आहेत.
मायक्रोसॉफ्टने याआधीही स्वेच्छानिवृत्ती योजना राबवली होती आणि तिला पात्र कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. पण या वेळी बाहेर पडण्याचा पर्याय खूपच मोठ्या पातळीवर दिला जातोय. जुलैमध्ये कंपनीने सुमारे ४ हजार ८०० पदांत कपात केली होती, त्यामुळे नव्या योजनेने कर्मचारी रचनेत आणखी बदल होऊ शकतात. इतर कंपन्यांतही असंच चित्र आहे. गुगलने काही विभागांत कर्मचाऱ्यांना स्वेच्छेने जाण्यासाठी आर्थिक पॅकेज दिल्याचं वृत्त आधी आलं होतं, तर मेटाने २०२२ च्या अखेरीपासून कर्मचारी संख्येत मोठी कपात केली.
एआयमुळे काही पारंपरिक कामांचं स्वरूप बदलतंय, तर मशीन लर्निंग, क्लाउड कम्प्युटिंग, डेटा सायन्स आणि एआय इंजिनिअरिंग यांसारख्या कौशल्यांची मागणी वाढतेय. भारतातले किती कर्मचारी प्रत्यक्षात या योजनेचा फायदा घेतील, हे अजून स्पष्ट नाही. देशनिहाय तपशील आणि अंतिम अटी काय असतील, याची अधिकृत माहिती येणं बाकी आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.