बुधवार, 28 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 144 | Moderate 04:51 IST

गडचिरोलीत जंगलात पुरलेला माओवाद्यांचा स्फोटकांचा साठा उघड, पाच अग्निशस्त्रे जप्त

गडचिरोली पोलीस दलाने माचुवंचा जंगल परिसरात माओवाद्यांनी लपवलेली पाच अग्निशस्त्रे आणि मोठ्या प्रमाणावर स्फोटक साहित्य हस्तगत केले; काही स्फोटके जागेवरच नष्ट करण्यात आली.

गडचिरोलीत जंगलात पुरलेला माओवाद्यांचा स्फोटकांचा साठा उघड, पाच अग्निशस्त्रे जप्त छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

गडचिरोली जिल्ह्यात माओवादाचा प्रभाव वेगाने कमी होत चालला आहे आणि तिथले नागरिक आता दहशतीतून मुक्त झाले आहेत, असे सांगण्यात आले. अशा वेळी सुरक्षा दलांना धोका पोहोचवण्यासाठी आणि घातपात घडवण्यासाठी माओवाद्यांनी जंगलात पुरून ठेवलेला स्फोटक साहित्याचा आणि अग्निशस्त्रांचा साठा गडचिरोली पोलीस दलाने उघडकीस आणला आहे. पोलीस दलाच्या या प्रभावी कारवाईत पाच अग्निशस्त्रांसह मोठ्या प्रमाणावर स्फोटक साहित्य हाती लागले असून, काही स्फोटके घटनास्थळीच नष्ट करण्यात आली आहेत.

गडचिरोली पोलीस ठाण्याच्या वांगेतुरी हद्दीतील मौजा माचुवंचा जंगल परिसरात माओवाद्यांनी मोठ्या प्रमाणावर अग्निशस्त्रे आणि स्फोटक साहित्य लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे २७ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथकाच्या चार तुकड्या आणि बीडीडीएसचे (BDDS) पथक तातडीने जंगल परिसरात शोध मोहिमेसाठी रवाना करण्यात आले.

शोध मोहिमेदरम्यान बीडीडीएसच्या जवानांनी परिसराची कसून तपासणी केली. तपासणीत जमिनीखाली लपवून ठेवलेले घातक साहित्य सापडले आणि ते जप्त करण्यात आले. त्यात १२ क्लेमोर, एक १२ बोअर रायफल, तीन सिंगल शॉट रायफल, एक एअर गन, एक बॉटल स्फोटक, एक जिवंत क्लेमोर स्फोटक, एक वायरलेस माईक सेट आणि हत्याराचा एक लोअर हँडगार्ड यांचा समावेश आहे. याशिवाय १०० सुतळी बॉम्ब, माओवादी गणवेशासाठी वापरले जाणारे हिरव्या रंगाचे पाच जोड्या कापड आणि इतर साहित्यही सापडले.

हे संपूर्ण साहित्य सी-६० आणि बीडीडीएस पथकाने घटनास्थळावरून ताब्यात घेतले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्फोटकांसह माओवाद्यांचे विविध साहित्य तिथेच सुरक्षितपणे नष्ट करण्यात आले.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली पार पडली. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी., अहेरी (प्राणहिता) येथील अपर पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बि. जे. आणि पोलीस उप-अधीक्षक (अभियान) सुनील उईके यांनी या मोहिमेवर महत्त्वाची देखरेख ठेवली.

विशेष अभियान पथक, गडचिरोली, इंट सेल आणि बीडीडीएस पथकातील जवानांनी ही मोहीम अत्यंत यशस्वीपणे पूर्ण केली. उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व जवानांचे विशेष कौतुक केले आहे.

#नागपूर#PT24#Nagpur

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ