महिंद्रा थार फेसलिफ्ट आज लाँच होणार, नव्या डिझाइन आणि फीचर्ससह येणार समोर
महिंद्रा अँड महिंद्राची थ्री डोअर थार पुन्हा अपडेट होतेय, 2025 च्या अपडेटनंतर वर्षभरातच नवा अवतार समोर येणार आहे.
महिंद्रा अँड महिंद्राची लोकप्रिय ऑफ-रोड एसयूव्ही थार थ्री डोअर आज नव्या रूपात समोर येण्याची शक्यता आहे. कंपनी या गाडीच्या फेसलिफ्टेड व्हर्जनचा अधिकृत खुलासा आज करणार असल्याचं सांगितलं जातंय. गंमत म्हणजे 2025 मध्ये या गाडीत अपडेट झाला होता, आणि वर्षभर पूर्ण व्हायच्या आतच थारमध्ये पुन्हा बदल केले जात आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या एसयूव्हीचे कॅमफ्लाज केलेले प्रोटोटाइप भारतातल्या रस्त्यांवर टेस्टिंगला दिसत होते.
डिझाइनच्या बाबतीत बोलायचं झालं तर नव्या महिंद्रा थार फेसलिफ्टमध्ये बाहेरून बरेच बदल दिसू शकतात. समोरच्या बाजूला हनीकॉम्ब पॅटर्न असलेली अपडेटेड ग्रिल मिळण्याची शक्यता आहे, सोबतच नवीन डिझाइनचे अलॉय व्हीलही दिले जाऊ शकतात. पाच डोअर असलेल्या थार रॉक्सचे काही डिझाइन एलिमेंट्स आता थ्री डोअर मॉडेलमध्ये आणले जाण्याची शक्यता आहे, म्हणजे प्रोजेक्टर एलईडी हेडलॅम्पसोबत सी-शेप डीआरएल मिळू शकतात. पुढच्या आणि मागच्या बंपरमध्येही बदल होऊ शकतो, तर टेल लॅम्पच्या डिझाइनमध्येही काही सुधारणा अपेक्षित आहेत.
केबिनच्या आतमध्येही नवीन फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. थार फेसलिफ्टच्या केबिनचा मूळ लेआउट आत्ताच्या मॉडेलसारखाच राहील असं वाटतंय, पण ग्राहकांना जास्त प्रीमियम फील यावा यासाठी लेदरेट सीट अपहोल्स्ट्री आणि अपडेटेड ट्रिम मटेरियल वापरलं जाऊ शकतं. फीचर्सच्या बाबतीत मात्र यावेळी मोठी भर पडण्याची शक्यता आहे. आधीच्या अपडेटमध्ये 10.25 इंचाची टचस्क्रीन, मागच्या सीटसाठी एसी व्हेंट्स, रिअर वायपर-वॉशर आणि रिअरव्ह्यू कॅमेरा असे फीचर्स दिले गेले होते. आता नव्या मॉडेलमध्ये डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 360 डिग्री कॅमेरा, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, वायरलेस चार्जर आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल असे फीचर्स मिळू शकतात, त्यामुळे थारच्या फीचर लिस्टमधल्या काही उणिवा भरून निघतील असं दिसतंय.
इंजिनच्या बाबतीत मात्र फार बदल होणार नाही असं वाटतंय. सध्याची लाइनअप म्हणजे 117bhp ताकदीचं 1.5 लिटर डिझेल इंजिन, 130bhp ताकदीचं 2.2 लिटर डिझेल इंजिन आणि 150bhp ताकदीचं 2.0 लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन कायम राहू शकतं. सगळ्या इंजिनांसोबत 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सचा पर्याय असेल, तर 2.2 लिटर डिझेल आणि 2.0 लिटर टर्बो-पेट्रोल इंजिनसोबत 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सही उपलब्ध आहे. ड्राइव्हट्रेनच्या बाबतीतही सध्याची रचना कायम राहील असं वाटतंय. 1.5 लिटर डिझेल फक्त रिअर-व्हील ड्राइव्हसोबत मिळेल, तर 2.2 लिटर डिझेल 4x4 ड्राइव्हसोबत येईल. टर्बो-पेट्रोल इंजिनसोबत मात्र आरडब्ल्यूडी आणि 4x4 असे दोन्ही पर्याय राहू शकतात.
किंमतीबद्दल बोलायचं झालं तर सध्याच्या महिंद्रा थारची एक्स-शोरूम किंमत साधारण 10.32 लाख रुपयांपासून 18 लाख रुपयांपर्यंत आहे. फेसलिफ्टमध्ये नवीन फीचर्स आणि डिझाइन अपडेट्स मिळणार असल्याने जुन्या मॉडेलच्या तुलनेत किंमतीत थोडी वाढ होण्याची शक्यता आहे. लाँच झाल्यानंतर नव्या थारची थेट स्पर्धा मारुती सुझुकी जिम्नी आणि फोर्स गुरखा थ्री डोअर यांसारख्या ऑफ-रोड एसयूव्हींशी कायम राहणार आहे. त्यामुळे आजच्या अधिकृत खुलाशात महिंद्रा नेमके कोणते बदल करते आणि नव्या थारची किंमत काय ठेवते, याकडे एसयूव्ही चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे.