राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १८ हजार कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नियुक्ती; मुंबईत राज्यस्तरीय
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या १८ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नियुक्ती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी कर्मचारी आणि संबंधित अधिकारी कायमस्वरूपी तत्त्वावर नियुक्ती मिळावी, अशी मागणी करत होते. अखेर सरकारने ही मागणी मान्य केल्यामुळे त्यांच्या कायम नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार तसेच आरोग्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीने विविध पदांवर अनेक अधिकारी आणि कर्मचारी सध्या काम करत आहेत. या सर्वांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
सरकारच्या या निर्णयानुसार १५ ते १८ हजार कर्मचाऱ्यांना याच महिन्यात अधिसंख्य पदांवर नियुक्ती आदेशांचे वाटप केले जाणार आहे.
हे नियुक्ती आदेशांचे पत्र वाटण्यासाठी मुंबईत राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून सुमारे १५ हजार ते १८ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आमंत्रित केले जाणार आहे. एवढ्या मोठ्या कार्यक्रमासाठी योग्य जागा आणि आवश्यक सोयीसुविधा निश्चित करणे गरजेचे असल्याने, पुरेशा क्षमतेचे मैदान आणि आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला पत्राद्वारे करण्यात आली आहे.
ऑक्टोबर महिन्यातील कोणत्या तारखा आणि कोणती मैदाने उपलब्ध आहेत, याची माहिती मुंबई महानगरपालिकेने आरोग्य सेवा आयुक्तालयाला पाठवावी, अशी विनंतीही त्या पत्रात करण्यात आली आहे.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहणार असल्याने त्यांच्या सोयीसाठी आवश्यक व्यवस्था करण्याची मागणी पत्रात केली आहे. यामध्ये बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे, वीज आणि प्रकाश व्यवस्था, वाहनतळ, कचरा व्यवस्थापन आणि सुरक्षा व्यवस्था यांचा समावेश आहे.
याशिवाय आपत्कालीन सुविधांसह कार्यक्रमस्थळी येण्या-जाण्यासाठी योग्य व्यवस्था करण्याची सूचनाही देण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळी उपलब्ध असलेल्या सुविधांची पाहणी करून आवश्यक सुधारणा आणि पूरक व्यवस्था कराव्यात, असे आरोग्य सेवा आयुक्तालयाने सांगितले आहे. यासाठी महानगरपालिकेच्या संबंधित विभागांतील अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे, अशी विनंतीही आयुक्तालयाने केली आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.