परतीचा मान्सून सुरू; महाराष्ट्रासह 18 राज्ये रेड झोनमध्ये, पावसाची तूट 20 टक्क्यांपेक्षा जास्त
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून महाराष्ट्रातून तो 5 ते 10 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. यंदा परतीचा पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचे नागपूर वेधशाळेने सांगितले आहे.
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. परतीच्या मान्सूनने पंजाब, हरियाणा आणि राजस्थानचा काही भाग ओलांडला आहे. महाराष्ट्रातून मात्र हा परतीचा प्रवास 5 ते 10 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे.
बहुतेक वेळा परतीचा मान्सून जाता जाता महाराष्ट्रात पाऊस देऊन जातो. यंदा मात्र भारतावर प्रतिचक्रवात स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती ढगांना एकत्र येऊ देत नाही. त्यामुळे परतीचा मान्सून महाराष्ट्रात पाऊस देण्याची शक्यता नाही, असे नागपूर वेधशाळेने (IMD) सांगितले आहे. परिणामी महाराष्ट्राच्या वाट्याला, विशेषतः शेतकऱ्यांच्या वाट्याला, निराशाच येणार असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत असताना पुढचा काळ आणखी अडचणीचा ठरण्याची शक्यता आता वाढली आहे.
सध्या देशात ओडिशा हे एकमेव राज्य आहे, जिथे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. याउलट महाराष्ट्रासह 18 राज्यांत 20 टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची तूट असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. त्यामुळे या 18 राज्यांना रेड झोनमध्ये टाकण्यात आले आहे.
पश्चिम विदर्भातील परिस्थिती तर आणखी बिकट आहे. अकोला आणि अमरावती जिल्ह्यांत पावसाची तूट 40 टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागात पाऊसच पडला नाही आणि सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाळ्याचे चारही महिने कोरडेच गेले. दीड महिना तर राज्यातील अनेक भागांत पावसाचा एक थेंबही पडला नाही. काही ठिकाणी पाऊस झाला, पण तोही समाधानकारक नव्हता. त्यामुळे राज्यात मोठा दुष्काळ पडला आहे.
हवामान खात्याच्या दाव्यानुसार, एका दशकानंतर राज्यात यंदा सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. यावरून राज्यावरचे संकट किती मोठे आहे, हे दिसून येते. यंदा राज्यातील पावसाची सरासरी तूट 18 टक्के आहे. राज्यातील सर्वच विभागांत यावर्षी कमी जास्त प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे. पाऊस कमी झाल्याने रब्बी पेरणीवरही संकट उभे राहिले आहे आणि त्यामुळे बळीराजाचे टेन्शन वाढले आहे.
येत्या 5 ते 6 दिवसांत राज्यात सर्वदूर पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. असे असले तरी राज्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाचा सल्ला घेऊनच रब्बी हंगामात पेरणी करावी, असा सल्ला एस.डी. सानप यांनी दिला आहे.