राज्यात पुन्हा पावसाचा जोर, 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट, ताशी 50 किमी वेगाने वारे
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून परतीच्या प्रवासातही राज्यात पावसाचा जोर कायम, हवामान खात्याचा इशारा.
राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल दिसतोय. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळं राज्यातल्या अनेक भागांत पावसानं जोर धरलाय. राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असला तरी महाराष्ट्रात मात्र पावसाची स्थिती अजून कायम आहे. हवामान खात्यानं राज्यातल्या 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट दिलाय आणि काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय.
कोकणात मागच्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडतोय. 22 सप्टेंबरला ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय. या भागात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे वाहू शकतात. पालघर आणि सिंधुदुर्गला अलर्ट नसला तरी तिथंही हलक्या सरींची शक्यता आहे. 23 सप्टेंबरलाही कोकणातल्या काही भागांत यलो अलर्ट कायम राहण्याचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे, नंदुरबार आणि जळगावला अलर्ट नाही, पण काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. नाशिक आणि घाटमाथ्यावर मात्र विजांच्या कडकडाटासह हलका ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहू शकतात. या दोन्ही भागांना उद्यासाठीही यलो अलर्ट देण्यात आलाय.
पश्चिम महाराष्ट्रातही पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरसह घाटमाथ्याच्या परिसरात पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार सरी पडू शकतात. या भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर, तर काही ठिकाणी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. 23 सप्टेंबरलाही यलो अलर्ट कायम राहणार असून त्यानंतर पावसाचा जोर थोडा कमी होऊ शकतो.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरला अलर्ट नसला तरी जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या सात जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय. इथं विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असून ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहू शकतात. पावसामुळं थोडा दिलासा मिळत असला तरी आधीच्या पावसाच्या कमतरतेचा फटका पिकांना बसलाय.
विदर्भातल्या अकोला, अमरावती, बुलढाणा आणि वाशिमला अलर्ट नाही. पण भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या भागांत ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा अंदाज असून बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय. पुढच्या 2 ते 3 दिवसांत विदर्भात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमधून मान्सून परतीच्या प्रवासाला लागला असला तरी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांत अजूनही पावसाचं वातावरण कायम आहे. त्यामुळं वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलंय. पुढच्या काही दिवसांत पावसाचा जोर किती काळ टिकतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
पुढच्या दहा दिवसांच्या तापमानाच्या अंदाजानुसार, 23 सप्टेंबरला कमाल तापमान 32 अंश सेल्सियस आणि किमान 26 अंश सेल्सियस राहील. 24 आणि 25 सप्टेंबरला कमाल तापमान अनुक्रमे 33 अंश आणि किमान 26 ते 27 अंश सेल्सियस राहण्याचा अंदाज आहे. 26 सप्टेंबरला कमाल 32 आणि किमान 25 अंश सेल्सियस, तर 27 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोबरपर्यंत कमाल तापमान 32 ते 33 अंश सेल्सियस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सियसच्या आसपास राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.