महाराष्ट्रात देशातील पहिले स्पेस पार्क, 18 महिन्यांत 5 उपग्रह सोडणार
उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांची घोषणा, पॅरिसमध्ये झाली अंतराळ धोरणावर चर्चा
महाराष्ट्राला अंतराळ क्षेत्रातलं जागतिक केंद्र बनवण्यासाठी राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. देशातलं पहिलं स्पेस पार्क आता महाराष्ट्रात उभं राहणार असून, पुढच्या 18 महिन्यांत पाच बहुउद्देशीय उपग्रह अवकाशात सोडण्याचा संकल्प करण्यात आला आहे. उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी ही माहिती दिली.
फ्रान्समधल्या पॅरिसमध्ये नुकतीच 'पॅरिस वर्ल्ड स्पेस बिझनेस वीक' ही परिषद पार पडली. या परिषदेत अंतराळ क्षेत्रातल्या जागतिक कंपन्यांसोबत महाराष्ट्राच्या अंतराळ धोरणावर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेतून राज्यातल्या अंतराळ तंत्रज्ञान उद्योगाला, संशोधनाला आणि नवउद्योजकतेला चालना मिळणार आहे. या उपक्रमामुळे फ्रान्स आणि भारत यांच्यातलं औद्योगिक सहकार्य आणखी मजबूत होईल, असा विश्वास डॉ. सामंत यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून अंतराळ क्षेत्रात महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी हे धोरण राबवलं जात आहे. उद्योग, संशोधन, तंत्रज्ञान आणि रोजगार या सगळ्या गोष्टींना एकत्र चालना देत महाराष्ट्राला देशाच्या अंतराळ क्षेत्रातलं महत्त्वाचं केंद्र बनवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं डॉ. सामंत यांनी सांगितलं.
राज्यातल्या तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी मिळाव्यात आणि बेरोजगारी कमी व्हावी, हा या अंतराळ धोरणामागचा मुख्य उद्देश आहे. देशातली पहिली अशी स्पेस पॉलिसी प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकारने पावलं उचलली असून, जागतिक अंतराळ कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यातून भविष्यात अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात मोठे उद्योग उभे राहून हजारो कोटी रुपयांची उलाढाल आणि महसूल मिळेल, अशी अपेक्षा आहे.
राज्य सरकारकडून विकसित होणारे हे पाच बहुउद्देशीय उपग्रह फक्त अंतराळ संशोधनापुरते मर्यादित राहणार नाहीत. कृषी विकास, पर्यावरण संवर्धन, आपत्ती व्यवस्थापन, शहरी नियोजन, आरोग्य सेवा आणि उद्योग क्षेत्रातल्या अचूक नियोजनासाठी या उपग्रहांकडून मिळणाऱ्या माहितीचा वापर केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे 200 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, पुढच्या काळात 1 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळवण्याचं उद्दिष्ट असल्याचं डॉ. सामंत यांनी सांगितलं.
उपग्रह प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यासाठी लागणाऱ्या तांत्रिक बाबींच्या दृष्टीने राज्यातल्या वेगवेगळ्या जागांची प्राथमिक पाहणी करण्यात आली आहे. अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रातल्या संधी, संशोधन आणि उद्योगांना मोठं व्यासपीठ मिळावं यासाठी येत्या फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय स्तरावरचा 'स्पेस फेस्ट' आयोजित केला जाणार आहे.