महाराष्ट्रात पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा जोर, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यभर पावसाने पुन्हा जोर धरला असून हवामान खात्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असून त्याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर दिसू लागला आहे. राज्यातल्या बऱ्याच भागांत पावसाला सुरुवात झाली असून पुढच्या दोन ते तीन दिवसांत पाऊस अजून वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्या काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना यलो अलर्ट लागू आहे. इथं ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह वादळी पाऊस पडू शकतो. पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस, ढगांच्या गडगडाटासह सरी आणि काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर दिसणार आहे. धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांत हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे, तर नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. इथं ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्यासोबतच हलका, मध्यम ते जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, पुणे घाटमाथा, सातारा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला गेला आहे. या भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी येण्याची शक्यता असून, घाट परिसरात पावसाचा जोर तुलनेने जास्त राहील असं सांगण्यात आलं आहे.
मराठवाड्यातही पुढचे दोन दिवस पावसाची स्थिती कायम राहू शकते. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या सगळ्या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. इथं ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि हलका, मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भातही जोरदार सरींचा अंदाज आहे. अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, तर काही भागांत जोरदार सरींचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरातल्या या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातल्या पावसाला पुन्हा एकदा चालना मिळण्याची शक्यता आहे. पुढचे दोन ते तीन दिवस राज्यातल्या विविध भागांत पावसाचा जोर कायम राहू शकतो. यलो अलर्ट असलेल्या जिल्ह्यांतल्या नागरिकांनी विजांच्या कडकडाटाच्या वेळी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. पावसाचा परिणाम शेतीकामांवरही होण्याची शक्यता असल्याने शेतकरी पुढच्या हवामान अपडेटकडे लक्ष ठेवून आहेत.
तापमानाबाबत बोलायचं झाल्यास, 22 सप्टेंबर रोजी कमाल तापमान 32 अंश सेल्सियस आणि किमान 26 अंश सेल्सियस राहील. 23 सप्टेंबरलाही तेच 32 आणि 26 अंश राहणार आहे. 24 सप्टेंबरला कमाल तापमान 33 अंश तर किमान 26 अंश राहील. 25 सप्टेंबरला कमाल 33 आणि किमान 27 अंश, 26 सप्टेंबरला कमाल 32 आणि किमान 25 अंश, 27 सप्टेंबरला कमाल 33 आणि किमान 27 अंश, 28 सप्टेंबरला कमाल 33 आणि किमान 26 अंश, 29 सप्टेंबरला कमाल 32 आणि किमान 26 अंश, 30 सप्टेंबरला कमाल 33 आणि किमान 26 अंश असेल. 1 ऑक्टोबरला कमाल तापमान 33 अंश सेल्सियस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सियस राहण्याचा अंदाज आहे.