पुणे, सांगली, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांत पावसाचा इशारा, हवामान खात्याचा अलर्ट
राज्यात रविवारी-सोमवारी हलक्या ते मध्यम पावसानंतर आजही अनेक भागांत पावसाचा अंदाज, हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
गेल्या काही दिवसांत राज्यातील वातावरणात मोठा बदल जाणवतो आहे. दिवसा उन्हाचा चटका बसत असला, तरी रविवारी आणि सोमवारी राज्यातील अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस पडल्याचं दिसून आलं. या पार्श्वभूमीवर आजही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, हिंगोली, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. यासोबतच नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर (घाटाचा परिसर) या जिल्ह्यांनाही इशारा देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचाही यात समावेश आहे. दुसरीकडे नाशिक, पालघर, मुंबई, ठाणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या भागांत ढगाळ वातावरण राहून तुरळक सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, पावसाच्या कमतरतेमुळे काही भागांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. मात्र अहिल्यानगर, रायगड आणि पुण्यासह राज्यातील काही भागांत सोमवारी पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे पाण्याचं संकट काही अंशी कमी होण्यास मदत होऊ शकते, तसंच पिकांनाही याचा दिलासा मिळणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातही मोठ्या प्रतीक्षेनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. दुष्काळाच्या उंबरठ्यावर असलेल्या या जिल्ह्यात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. राज्यातील अनेक भागांत पिकं करपण्याची परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे आणखी काही दिवस समाधानकारक पाऊस झाला तर शेतकरी आणि जनावरांसाठी मोठा दिलासा मिळू शकतो, असं सांगण्यात येत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण आणि गोव्यात २२ ते २७ सप्टेंबर या काळात पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात २२ आणि २३ सप्टेंबर रोजी, तर मराठवाड्यात २३ सप्टेंबर रोजी मध्यम ते व्यापक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात २१ ते २४ सप्टेंबर या कालावधीत, तर मराठवाड्यात २१ ते २३ सप्टेंबर या काळात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
काही भागांत ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या काळात विजांचा कडकडाट, जोरदार वारा आणि पाऊस यांचा सामना करताना नागरिकांनी सुरक्षिततेची पुरेशी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.