सणासुदीत मोठी खरेदी करताना EMI घ्यावी की फुल पेमेंट? जाणून घ्या फायदा कशात
सणासुदीत घरगुती उपकरणे, मोबाईल, लॅपटॉप, कार यांसारख्या महागड्या वस्तू खरेदी करताना EMI आणि फुल पेमेंट यापैकी कोणता पर्याय निवडावा, याबाबत हे विश्लेषण.
सणासुदीचे दिवस जवळ आले की घरगुती उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल, लॅपटॉप, कार अशा महागड्या वस्तूंची खरेदी वाढते. या काळात कंपन्या आणि बँका EMI, नो-कॉस्ट EMI, कॅशबॅक, डिस्काउंट अशा वेगवेगळ्या ऑफर्स देतात. त्यामुळे ग्राहकांसमोर नेहमी एक प्रश्न असतो, वस्तूची पूर्ण रक्कम एकाच वेळी भरावी की EMIचा पर्याय निवडावा.
दोन्ही पर्यायांमध्ये काही फायदे आणि काही तोटे आहेत. त्यामुळे फक्त दर महिन्याला किती EMI भरावी लागणार आहे, एवढाच विचार करून निर्णय घेणं चुकीचं ठरू शकतं. त्याऐवजी सध्या किती बचत आहे, खरेदीनंतर हातात किती पैसे शिल्लक राहणार आहेत, उत्पन्न किती स्थिर आहे, कर्जावर किती व्याज लागणार आहे आणि पुढे कोणते खर्च येणार आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे.
ज्या वेळी एखादी महागडी वस्तू घेण्यासाठी जवळपास सगळी बचत खर्च होणार असेल, त्या वेळी EMIचा पर्याय विचारात घेता येतो. उदाहरण द्यायचं झालं तर समजा एखाद्याकडे 5 लाख रुपयांची बचत आहे आणि त्याला 3 लाखांची कार, लॅपटॉप किंवा अन्य वस्तू घ्यायची आहे. अशा वेळी पूर्ण 3 लाख रुपये एकदम भरले तर हातात फक्त 2 लाख रुपये उरतील. ही रक्कम आपत्कालीन खर्च किंवा घरगुती गरजांसाठी पुरेशी नसेल, तर संपूर्ण बचत खर्च करण्याऐवजी EMI घेणं फायद्याचं ठरू शकतं. यामुळे संपूर्ण रक्कम एकाच वेळी द्यावी लागत नाही आणि हातातली बचत काही प्रमाणात सुरक्षित राहते. पण EMI निवडताना फक्त मासिक हप्ता किती आहे, एवढंच न बघता व्याजदर, प्रोसेसिंग फी, प्री-क्लोजर चार्ज आणि एकूण कालावधीत प्रत्यक्षात किती रक्कम भरावी लागणार आहे, हे तपासणं गरजेचं आहे. कमी EMI हवी म्हणून कालावधी वाढवला, तर मासिक भार कमी होतो, पण एकूण व्याज वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे कमी EMI म्हणजे नेहमीच स्वस्त खरेदी असं नाही.
याउलट, पुरेशी बचत असेल आणि पूर्ण किंमत भरल्यानंतरही इमर्जन्सी फंड आणि पुढील गरजेच्या खर्चासाठी पैसे शिल्लक राहत असतील, तर फुल पेमेंटचा पर्याय बघता येतो. यातला सगळ्यात मोठा फायदा म्हणजे कर्जावरचं व्याज द्यावं लागत नाही आणि पुढे दर महिन्याला EMI भरण्याची जबाबदारीही राहत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या वस्तूची किंमत 2 लाख रुपये आहे आणि तीच वस्तू EMIवर घेतली, तर व्याज आणि इतर शुल्क धरून एकूण 2.25 लाख रुपये मोजावे लागत असतील, तर फुल पेमेंट केल्यास 25,000 रुपयांपर्यंतचा खर्च वाचू शकतो. पण एवढी रक्कम भरल्यानंतर आपत्कालीन परिस्थितीसाठी पुरेशी बचत उरते का, हेही तपासावं लागतं.
यावर एकच ठाम उत्तर देता येत नाही, निर्णय ज्याच्या त्याच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असतो. फुल पेमेंट केल्यानंतरही बचत सुरक्षित राहत असेल, इमर्जन्सी फंड शिल्लक असेल आणि EMIमुळे जास्तीचं व्याज किंवा शुल्क भरावं लागणार असेल, तर पूर्ण पेमेंट करणं फायद्याचं ठरतं. पण पूर्ण रक्कम भरल्याने बचत मोठ्या प्रमाणात कमी होणार असेल, तर कमी हप्त्याची EMI कॅश फ्लो सांभाळायला मदत करते.
सणासुदीत मिळणाऱ्या नो-कॉस्ट EMI, कॅशबॅक किंवा कमी व्याजाच्या ऑफर्स आकर्षक वाटल्या तरी त्यातल्या अटी काळजीपूर्वक वाचाव्यात. नो-कॉस्ट EMIमध्ये खरंच काही शुल्क लागतंय का, प्रोसेसिंग फी आहे का, वस्तूची रोख किंमत आणि EMIमधली एकूण किंमत यात किती फरक आहे, हे पडताळून पाहावं. खरेदी करण्याआधी काही गोष्टी तपासाव्यात, खरेदीनंतर काही महिन्यांच्या गरजेसाठी पुरेशी रक्कम शिल्लक आहे का, EMIची रक्कम, व्याज, प्रोसेसिंग फी आणि इतर शुल्क मिळून एकूण किती पैसे जाणार आहेत, कमी EMीच्या नादात कालावधी खूप वाढवला जातोय का, उत्पन्न किती स्थिर आहे आणि फक्त ऑफर आहे म्हणून नव्हे तर खरी गरज आहे म्हणून वस्तू घेतली जातेय का.
थोडक्यात, EMI किंवा फुल पेमेंट यापैकी कोणताही पर्याय आपोआप बरोबर किंवा चूक नसतो. कोणतीही वस्तू घेण्याआधी इमर्जन्सी फंड नक्की तपासावा. खरेदीनंतरही पुरेसा इमर्जन्सी फंड शिल्लक राहणार असेल, तर कॅश पेमेंट फायद्याचं ठरू शकतं. यासाठी काही क्रेडिट कार्डच्या ऑफरचाही फायदा घेता येतो. त्यामुळे सणासुदीची ऑफर बघताना आज किती पैसे द्यायचे आहेत, एवढंच न बघता खरेदी पूर्ण होईपर्यंत आणि त्यानंतर एकूण किती खर्च येणार आहे, याचं गणित मांडूनच निर्णय घ्यावा.