महागावमध्ये साईड देण्यावरून वाद, खासगी वाहनचालकाने बसचालकाला लोखंडी रॉडने मारले
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव बसस्थानकाबाहेर साईड देण्यावरून झालेल्या वादात मानव विकास बसच्या चालकाला मारहाण झाली. सुमारे २० विद्यार्थिनींना तासभर वाट पाहावी लागली.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव बसस्थानकाबाहेर एक संतापजनक प्रकार घडला आहे. साईड देण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचं रूपांतर थेट मारहाणीत झालं. एका खासगी प्रवासी वाहनचालकाने मानव विकास बसच्या चालकाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नेमकं काय झालं, ते पाहू. महागाव ते सेनद मार्गावर शाळकरी विद्यार्थिनींची ने-आण करणारी मानव विकास बस महागाव बसस्थानकाबाहेर आली होती. त्याच वेळी एमएच २८ एएन ३०२९ क्रमांकाच्या एका खासगी प्रवासी वाहनाच्या चालकाशी साईड देण्यावरून वाद सुरू झाला. बसचे क्रमांक एमएच ४० वाय ५४१० / एमएच ४० वाय ५४०६ असे नमूद करण्यात आले आहेत.
बसचालक ज्ञानेश्वर वानखेडे यांनी खासगी वाहनचालकाला आपलं वाहन बाजूला घ्यायला सांगितलं. त्यानंतर त्या चालकाचा राग अनावर झाला आणि वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात त्याने लोखंडी रॉड काढला आणि वानखेडे यांना बेदम मारहाण केली. मारहाण केल्यावर तो घटनास्थळावरून पळून गेला.
या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे बसमधील विद्यार्थिनी खूप घाबरल्या होत्या. बसचालक जखमी झाल्यामुळे महागाव ते सेनद मार्गावरील सुमारे २० विद्यार्थिनींना घरी जाण्यासाठी तब्बल तासभर वाट पाहावी लागली.
घटनेची माहिती मिळताच महागावचे ठाणेदार सेवानंद वानखडे तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी चालक ज्ञानेश्वर वानखेडे यांची समजूत काढली आणि त्यांना धीर दिला. त्यानंतर स्वतःची प्रकृती बरी नसतानाही वानखेडे यांनी पुन्हा बसचा ताबा घेतला आणि सर्व विद्यार्थिनींना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचवलं. जखमी चालकाची प्रकृती सध्या चांगली असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी बसचालकाने दिलेल्या तक्रारीवरून महागाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. किरकोळ कारणावरून झालेल्या या वादात शाळकरी मुलींना नाहक त्रास सहन करावा लागल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.