शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
05:30 IST

महाबळेश्वर पालिकेच्या रखडलेल्या मुख्य इमारतीच्या नूतनीकरणाला अखेर सुरुवात

अनेक वर्षे अर्धवट पडून असलेल्या महाबळेश्वर नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे काम आता प्रत्यक्ष सुरू झाले आहे.

महाबळेश्वर पालिकेच्या रखडलेल्या मुख्य इमारतीच्या नूतनीकरणाला अखेर सुरुवात छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

महाबळेश्वर नगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या नूतनीकरणाचे रखडलेले काम अखेर प्रत्यक्ष सुरू झाले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून अर्धवट अवस्थेत पडून असलेल्या या इमारतीला आता नवे रूप मिळणार आहे. महाबळेश्वरकरांचे या कामाकडे लक्ष लागून राहिले होते. भव्य आणि आधुनिक प्रशासकीय वास्तू लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.

नगराध्यक्ष सुनील शिंदे आणि मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे या कामातील सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी दूर होऊन कामाला गती मिळाली आहे, असे सांगण्यात येत आहे.

पालिकेची जुनी इमारत अपुरी पडत होती आणि प्रशासकीय कामकाजाचा विस्तारही होत होता. म्हणून नवीन भव्य इमारतीचे नियोजन करण्यात आले होते. मात्र काही तांत्रिक अडचणी, निधी आणि इतर कारणांमुळे हे काम अनेक वर्षे प्रलंबित राहिले. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील राजकीय हेवेदावेही या कामाला खीळ बसण्यास कारणीभूत ठरले होते. ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या महाबळेश्वर शहराच्या मध्यवर्ती भागात ही इमारत तशीच पडून राहिल्याने नागरिकांमधूनही चिंता व्यक्त होत होती.

या रखडलेल्या प्रकल्पाची नगराध्यक्ष सुनील शिंदे आणि मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी गांभीर्याने दखल घेतली. नगराध्यक्ष शिंदे आणि नगरसेवकांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शासन दरबारी सातत्याने प्रयत्न केले. विविध विभागांच्या परवानग्या मिळवणे, निधीचा मार्ग मोकळा करणे आणि तांत्रिक त्रुटी दूर करणे यासाठी सुनील शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले असून प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे आणि इमारतीचे बांधकाम पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले आहे.

आता ही इमारत केवळ प्रशासकीय कार्यालय न राहता महाबळेश्वरच्या वैभवात भर घालणारी देखणी वास्तू ठरणार आहे. नागरिकांसाठी सर्व आधुनिक सुविधा, विविध विभागांची सुसज्ज कार्यालये, प्रशस्त सभागृह आणि वाहनतळाची व्यवस्था यात करण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेचा कारभार अधिक गतिमान होईल आणि एकाच छताखाली नागरिकांची सर्व कामे वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल.

दरम्यान, महाबळेश्वरमधील स्थानिक नागरिक, व्यापारी आणि राजकीय वर्तुळातून या कामाचे जोरदार स्वागत होत आहे. सत्ताधारी गटाचे नेते नगराध्यक्ष सुनील शिंदे आणि त्यांचे सहकारी नगरसेवक यांचे विशेष आभार मानले जात आहेत.

नगराध्यक्ष सुनील शिंदे म्हणाले, "महाबळेश्वर नगरपालिकेची ही इमारत शहराची एक मुख्य ओळख आहे. हे काम अनेक वर्षे रखडल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. परंतु, आम्ही सर्व नगरसेवकांनी आणि सहकाऱ्यांनी घेतलेल्या कष्टामुळे आणि पाठपुराव्यामुळे आज हे काम सुरू होत असल्याचा मनस्वी आनंद आहे. महाबळेश्वरच्या जनतेला दर्जेदार सुविधा देणारी ही वास्तू लवकरात लवकर पूर्ण व्हावी, हाच आमचा प्रयत्न आहे."

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ