'रामायण: राइज ऑफ अ लिजेंड'चा वर्ल्ड प्रीमियर लॉस एंजेलिसमध्ये, ९४५ पाहुणे हजर राहणार
नितेश तिवारी दिग्दर्शित चित्रपटाचा प्रीमियर २७ ऑक्टोबर रोजी अकॅडमी म्युझियम ऑफ मोशन पिक्चर्समध्ये होणार आहे. पहिला भाग ५ नोव्हेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांत येईल.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नितेश तिवारी दिग्दर्शित आणि नमित मल्होत्रा निर्मित 'रामायण: राइज ऑफ अ लिजेंड' या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर २७ ऑक्टोबर रोजी लॉस एंजेलिसमध्ये होणार आहे. शहरातील प्रतिष्ठित अकॅडमी म्युझियम ऑफ मोशन पिक्चर्स येथील डेव्हिड गेफेन थिएटरमध्ये हा सोहळा रंगेल. या खास सोहळ्याला एकूण ९४५ पाहुणे हजर राहणार असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली आहे.
जागतिक चित्रपटसृष्टीचा इतिहास, चित्रपटनिर्मितीतील उत्कृष्टता आणि सिनेमाच्या कलेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी एका भारतीय चित्रपटाचा प्रीमियर होत आहे. भारतीय मनोरंजनविश्वासाठी ही महत्त्वाची बाब मानली जात आहे. चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर पाहिल्यापासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. चित्रपटाची भव्यता, दमदार कलाकार आणि नेत्रदीपक दृश्यांबरोबरच रामायणाच्या मूळ कथेशी असलेली निष्ठा हे या चित्रपटाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. निर्मात्यांनी या प्रकल्पाकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता भारतीय संस्कृती आणि परंपरेचा सन्मान करणारी जबाबदारी म्हणून पाहिल्याचे सांगितले जात आहे.
प्रीमियरच्या निमित्ताने लॉस एंजेलिसमध्ये भारतीय संस्कृती आणि दिवाळीचा झगमगाट पाहायला मिळणार आहे. रेड कार्पेटवरही भारतीय परंपरेची झलक दिसावी, म्हणून निर्मात्यांनी पाहुण्यांना पारंपरिक भारतीय सणाच्या पोशाखात येण्याचे आवाहन केले आहे. हॉलीवूडमधील नामवंत व्यक्ती, चित्रपट निर्माते, आंतरराष्ट्रीय माध्यमांचे प्रतिनिधी आणि चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज या सोहळ्याला उपस्थित राहतील. त्यामुळे भारतीय सिनेमाची भव्यता आणि सांस्कृतिक वारसा जागतिक प्रेक्षकांसमोर मांडण्याची संधी चित्रपटाला मिळणार आहे.
हा प्रीमियर ३डी तंत्रज्ञानात होणार आहे. त्यामुळे चित्रपटातील दृश्यांची खोली, भव्यता आणि बारकावे अधिक प्रभावीपणे अनुभवता येतील, असे सांगण्यात आले. प्रेक्षकांना रामायणाच्या विश्वाचा जवळून अनुभव घेता यावा, हा त्यामागचा उद्देश आहे. भारतासह जगभरातील प्रेक्षकांनीही हा चित्रपट ३डीमध्ये पाहावा, असे निर्मात्यांचे आवाहन आहे. जगभरातील अॅडव्हान्स बुकिंग २० ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती नमित मल्होत्रा यांच्या प्राइम फोकस स्टुडिओजने केली आहे. डीएनईजी आणि यश यांची मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स ही कंपनीही या निर्मितीत त्यांच्या सहकार्याने सहभागी आहे. डीएनईजीने आठ ऑस्कर पुरस्कार जिंकले आहेत.
हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग ५ नोव्हेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये येईल, तर दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतात हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये दाखवला जाईल. प्रेक्षकांना तो आयमॅक्समध्येही पाहता येईल.
भारताबाहेर चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी सोनी पिक्चर्स सांभाळणार आहे, तर हिंदी भाषिक बाजारपेठेत वितरण धर्मा प्रॉडक्शन्स करणार आहे.