'लव्ह अँड वॉर'मध्ये विकी कौशलचा नवा लूक समोर, सिनेमाची उत्सुकता वाढली
संजय लीला भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर' सिनेमातील विकी कौशलचा फर्स्ट-लूक पोस्टर प्रेक्षकांसमोर आला आहे.
संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतीक्षित सिनेमा 'लव्ह अँड वॉर' या वर्षातील सर्वात मोठ्या सिनेमांपैकी एक मानला जातो आहे. रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल हे तिघे आघाडीचे कलाकार पहिल्यांदाच एका भव्य एसएलबी सिनेमात एकत्र येत आहेत, त्यामुळे हा सिनेमा वेगळाच सिनेमॅटिक अनुभव देणार असल्याचं बोललं जातं आहे.
सिनेमाबद्दलची उत्सुकता आधीच शिगेला पोहोचलेली होती, त्यातच निर्मात्यांनी आधी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे फर्स्ट-लूक पोस्टर्स प्रेक्षकांसमोर आणले होते. या दोन्ही पोस्टर्सनी सोशल मीडियावर जोरदार चर्चा घडवली आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळवलं. आता याच मालिकेत विकी कौशलचा फर्स्ट-लूक पोस्टर रिलीज झाला असून, त्याचा हा नवा अंदाज पाहून प्रेक्षक अक्षरशः थक्क झाले आहेत.
या पोस्टरमध्ये विकी कौशलच्या हातात सिगारेट आणि लायटर दिसतंय, चेहऱ्यावर तीव्र नजर आणि व्यक्तिमत्त्वात एक वेगळीच धार आहे. या भूमिकेला विकीने आपल्या खास स्टाईलने एक वेगळी तीव्रता आणि दमदार उपस्थिती दिली आहे. यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अशा लूकमध्ये विकी कौशल यावेळी दिसतो आहे, आणि त्यामुळे हा पोस्टर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो आहे. या एका पोस्टरमधूनच सिनेमाबद्दल बरंच काही सांगितलं जातं आहे, असं म्हणता येईल.
भन्साळींच्या सिनेमातील नायकाच्या भूमिकेत उतरणारा कलाकार बहुतेकवेळा एका वेगळ्याच आणि अनपेक्षित रूपात प्रेक्षकांसमोर येतो, असा अनुभव आधी आलेला आहे. विकीचा हा नवा लूकही याच गोष्टीची पुष्टी करतो. त्याचं आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि तीव्र नजर एकत्र आल्यामुळे जो परिणाम साधला जातो, तीच एसएलबी सिनेमांच्या फर्स्ट लूकमधली खास जादू असते. निर्मात्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून विकी कौशलचा हा फर्स्ट-लूक पोस्टर शेअर केला आहे.
रणबीर, आलिया आणि आता विकी, अशा तिन्ही कलाकारांच्या फर्स्ट-लूक पोस्टर्सनी 'लव्ह अँड वॉर'च्या विश्वाची तीन वेगळी रूपं आतापर्यंत प्रेक्षकांसमोर आणली आहेत. प्रत्येक पोस्टरमध्ये एक वेगळी व्यक्तिरेखा, वेगळं व्यक्तिमत्त्व आणि वेगळी दृश्यभाषा पाहायला मिळते. विशेषतः विकीच्या पोस्टरमुळे या सिनेमाच्या विश्वाला आणखी एक जबरदस्त तीव्रता मिळाली आहे. यातून संजय लीला भन्साळी या सिनेमाच्या माध्यमातून उभं करत असलेलं गुंतागुंतीचं आणि थरारक विश्व, तसेच वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमधील रंजक समीकरणं याची झलक मिळते.
'लव्ह अँड वॉर' हा संजय लीला भन्साळी यांचा सिनेमा आहे, यात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा २१ जानेवारी २०२७ रोजी जगभरात हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.