मॅकलमोरच्या 'फ्री पॅलेस्टाईन' दौऱ्याची लंडनमध्ये सांगता, गाझातील मुलांसाठी भावनिक साद
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
अमेरिकन रॅपर मॅकलमोरच्या 'फ्री पॅलेस्टाईन' संगीत दौऱ्याचा शेवट लंडनमध्ये हाऊसफुल्ल कार्यक्रमाने झाला. ग्रेटा थनबर्गसह अनेक कलाकार त्यात सहभागी झाले.
अमेरिकन रॅपर मॅकलमोर याने सुरू केलेल्या 'फ्री पॅलेस्टाईन' संगीत दौऱ्याची सांगता लंडनमध्ये झाली. शुक्रवारी (३० ऑक्टोबर) लंडनमधील OVO Arena Wembley येथे हा कार्यक्रम झाला. हजारो चाहते आले होते आणि सगळा हॉल पूर्ण भरला होता. गाझातील नागरिकांवर आलेले संकट आणि पॅलेस्टिनी लोकांना पाठिंबा, हाच या दौऱ्यामागचा हेतू होता.
या कार्यक्रमात मॅकलमोरने गाझातील मुलांच्या परिस्थितीचा उल्लेख करत भावनिक भाषण केले. "गाझामधील ती मुले आपलीच मुले आहेत. त्यांच्यापासून आपण वेगळे नाही," असे तो म्हणाला. त्याच्या या वाक्याला उपस्थित प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला.
गाझातील परिस्थितीवर गप्प बसणे आपल्यासाठी जास्त अस्वस्थ करणारे आहे, असे मॅकलमोरने सांगितले. अन्यायाविरोधात बोलणे ही फक्त धाडसाची गोष्ट नाही, ती माणुसकीची जबाबदारी आहे, असेही त्याने स्पष्ट केले. जगाने आखलेल्या सीमा आणि उभ्या केलेल्या भिंतींच्या पलीकडे जाऊन प्रत्येक मुलाच्या सुरक्षिततेचा विचार झाला पाहिजे, असे त्याने मांडले. पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ तयार केलेले 'Hind's Hall' हे गाणेही त्याने या वेळी सादर केले.
या कार्यक्रमात पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, गायिका पालोमा फेथ आणि पॅलेस्टिनी-कॅनेडियन गायिका नेमहसिस यांच्यासह अनेक कलाकार सहभागी झाले. ग्रेटा थनबर्ग यांनी सांगितले की पॅलेस्टिनी नागरिकांसाठी फक्त आर्थिक मदत पुरेशी नाही, राजकीय बदलासाठीही प्रयत्न करावे लागतील. पालोमा फेथ यांनीही गाझातील मुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा मांडला. होलोकॉस्टमधून बचावलेले स्टीफन कापोस आणि पॅलेस्टिनी कार्यकर्ते अरब बरघौती यांनीही उपस्थितांशी संवाद साधला.
या दौऱ्यामागची पार्श्वभूमीही आहे. १४ सप्टेंबरच्या एड शिरीनच्या टूरमध्ये मॅकलमोरने पॅलेस्टिनी लोकांसाठी आवाज उठवला, तेव्हा त्याला उरलेल्या टूरमधून वगळण्यात आले. त्यानंतर गदारोळ झाला. सोशल मीडियावर आणि इतरत्र एड शिरीनवर टीकेची झोड उठली. नंतर त्याने आपली बाजू मांडून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. वगळल्यानंतर मॅकलमोरने स्वतःचा 'फ्री पॅलेस्टाईन' दौरा आयोजित केला. डब्लिन, पॅरिस आणि लंडन या तीन शहरांमध्ये तो झाला.
या कार्यक्रमांतून जमणारा निधी पॅलेस्टिनी नागरिकांसाठी काम करणाऱ्या मानवतावादी संस्थांना दिला जाणार आहे. वैद्यकीय मदत, शिक्षण, अन्नपुरवठा आणि विस्थापित नागरिकांना मदत, यासाठी हा निधी वापरला जाणार आहे.
लंडनच्या कार्यक्रमात चाहत्यांनी पॅलेस्टिनी झेंडे फडकावून त्याला पाठिंबा दिला. संगीत हे फक्त करमणुकीचे साधन नाही, तर सामाजिक प्रश्नांवर बोलण्याचे प्रभावी माध्यम आहे, हे या दौऱ्यातून मॅकलमोरने दाखवून दिले. पॅलेस्टाईनच्या प्रश्नाकडे आंतरराष्ट्रीय संगीतविश्वाचे लक्ष पुन्हा एकदा वेधले गेले.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.