शनिवार, 10 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
13:34 IST

कोपरखैरणेत रोजची वाहतूक कोंडी, भुयारी मार्गात टेम्पो अडकल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प

संध्याकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत कोपरखैरणे स्टेशन परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

कोपरखैरणेत रोजची वाहतूक कोंडी, भुयारी मार्गात टेम्पो अडकल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

नवी मुंबईची गणना 'वेल प्लॅन्ड सिटी' म्हणजेच सुजाण नियोजनबद्ध शहर म्हणून केली जाते. मात्र कोपरखैरणेतील रहिवाशांना रोजच तुफान वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः संध्याकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत कोपरखैरणे स्टेशन परिसरातून गाडी घेऊन जाणे वाहनधारकांसाठी मोठा मनस्ताप ठरत आहे.

कोपरखैरणे भुयारी मार्गाजवळ वाहतूक पोलीस तैनात नसतात, याचा गैरफायदा काही बेजबाबदार टेम्पो चालक घेत आहेत, असे सांगितले जाते. सायंकाळच्या गर्दीच्या वेळी भुयारी मार्गाची उंची आणि रुंदी याचा अंदाज न घेता मोठे टेम्पो सर्रास आत घातले जातात. योग्य जजमेंट न मिळाल्याने हे टेम्पो अनेकदा भुयारी मार्गातच अडकून पडतात आणि त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प होते.

फक्त स्टेशन परिसरच नाही, तर संध्याकाळच्या वेळी डी-मार्टपासून सेक्टर १५ आणि सेक्टर २० पर्यंत, घणसोलीच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरही वाहनांच्या प्रचंड रांगा लागतात. रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची गर्दी आणि भुयारी मार्गातून ये-जा करणारी वाहने एकाच वेळी येतात. त्यामुळे संपूर्ण परिसराला ट्रॅफिक जॅमचे स्वरूप येते. नागरिकांचा मोलाचा वेळ या कोंडीतच वाया जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वाहतूक नियमन कक्षाचे या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. अनेक महत्त्वाच्या चौकांत किंवा सिग्नलवर वाहतूक पोलीस कर्मचारी हजर नसतात. ते सिग्नल सोडून अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर लपूनछपून उभे राहतात, असा आरोप त्यांनी केला आहे.

कोंडी सोडवण्याऐवजी चालकांना पकडून ई-चलान फाडण्यातच पोलीस कर्मचारी व्यस्त असतात, असाही नागरिकांचा आरोप आहे. एकाच ठिकाणी ३ ते ४ कर्मचारी ई-चलान मशीन घेऊन उभे असल्याचे दिसते. हेच कर्मचारी थेट सिग्नलवर किंवा गर्दीच्या ठिकाणी उभे राहिले, तर वाहनचालकांना नियमांची भीती राहील आणि कोंडी होणार नाही, असे नागरिकांना वाटते.

नागरिक स्वतः वाहतूक नियंत्रण कक्षाला फोन करून तक्रार करत नाहीत, तोपर्यंत परिसरात एकही वाहतूक पोलीस फिरकत नाही, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. रोजच्या कोंडीतून कसातरी मार्ग काढत कसेबसे घर गाठतो, अशी उद्विग्न प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी दिली.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सध्याच्या वाहतूक पोलीस उपायुक्तांची ओळख अनुभवी अधिकारी म्हणून आहे. कोपरखैरणे परिसरातील या रोजच्या समस्येची त्यांना खरोखरच माहिती आहे का आणि ते यावर ठोस उपाययोजना करणार का, असा प्रश्न आता कोपरखैरणेकर विचारत आहेत. वाहतूक पोलीस आयुक्तांनी या समस्येत तातडीने लक्ष घालून या कोंडीच्या विळख्यातून आपली सुटका करावी, हीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ