सोमवार, 19 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
07:35 IST

सिन्नरजवळ नाशिक-पुणे महामार्गावर पिकअप उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकली; चार मजुरांचा मृत्यू, पाच गंभीर जखमी

नाशिक-पुणे महामार्गावर गोंदे ते दातली अंडरब्रिजदरम्यान, दोडी शिवारात शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात चार मजुरांचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

सिन्नरजवळ नाशिक-पुणे महामार्गावर पिकअप उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकली; चार मजुरांचा मृत्यू, पाच गंभीर जखमी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावरील गोंदे ते दातली अंडरब्रिजदरम्यान, दोडी शिवारात शनिवारी (दि. १७) पहाटे तीनच्या सुमारास भीषण अपघात झाला. काँक्रीटीकरणाचे काम आटोपून सिन्नरच्या दिशेने निघालेल्या मजुरांची पिकअप गाडी उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकली. या अपघातात चार मजुरांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृत झालेल्यांपैकी तीन मजूर पश्चिम बंगालचे, तर एक जण बिहार राज्यातील रहिवासी आहे. अपघातात मृत झालेल्या मजुरांची नावे पोलिसांनी दिली आहेत. ती अशी : एम.डी. बिसू आसामुद्दीन (वय २५, रा. तरसूर, ता. तलसूर, जि. मालदा, पश्चिम बंगाल), साजेमन अली साजीबुर रहमान (वय २१, रा. बादशाही रस्ता, तलसूर, जि. मालदा, पश्चिम बंगाल), अब्दुल मोहम्मद हुसेन कलाम (वय २२, रा. गाजपाडा, ता. लोहडांगा, जि. किशनगंज, बिहार) आणि खुर्शीद अलीम अब्दुल रहीम (वय १९, रा. आमडोल घाट, ता. हरिश्चंद्रपूर, जि. मालदा, पश्चिम बंगाल).

कामावरून परतत असताना हा अपघात झाला. नाशिक-पुणे महामार्गावरील दोडी शिवारात सध्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. या कामावर असलेले मजूर शनिवारी रात्री उशिरापर्यंत काम करत होते. काम संपल्यानंतर ते पिकअप (एम एच-१४, केक्यू-२३६१) गाडीतून गुरेवाडी शिवारातील कॅम्पकडे निघाले होते. त्याच वेळी गोंदे ते दातली अंडरब्रिजच्या परिसरात चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि पिकअप उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकली. धडक इतकी जोरदार होती की तीन मजूर उड्डाणपुलावरून थेट खाली रस्त्यावर कोसळले.

अपघाताची माहिती मिळताच सिन्नर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका चालक पुरुषोत्तम भटजिरे हे शाम लोंढे आणि गणेश गायकवाड यांच्यासह घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून शिवाई हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र तिथे त्यांपैकी चार जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. अन्य पाच जखमींना उपचारासाठी यशवंत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

गंभीर जखमी झालेल्या पाच जणांमध्ये तुहीत आलम (वय १९), साजिद आलम (वय १९), समीर हुसेन (वय २०), महेबुबा आलम (वय २३) आणि आयाब अली (वय २०) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या अपघाताचा पुढील तपास सहाय्यक हवालदार राहुल निरगुडे आणि अर्जुन निंबेकर करत आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ