राज्यात ऑक्टोबर हिटचा चटका, कोकणात उष्णतेचा यलो अलर्ट; इतर भागांत हवामान कोरडे
मान्सूनचा अधिकृत काळ संपल्यानंतर राज्यात पावसाने उघडीप दिली असून तापमान वाढत आहे. हवामान विभागाने 4 ऑक्टोबरसाठी कोकणातील काही भागांना उष्णतेचा यलो अलर्ट दिला आहे.
सप्टेंबरअखेर मान्सूनचा अधिकृत काळ संपला आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या हवामानात मोठे बदल दिसू लागले आहेत. राज्यातल्या बहुतेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे आणि तापमान वाढत चालले आहे. विशेषतः कोकण आणि विदर्भात 'ऑक्टोबर हिट'चा परिणाम जाणवत आहे. काही भागांत वातावरण उष्ण आणि दमट झाले आहे.
भारतीय हवामान विभागाने 4 ऑक्टोबरसाठी कोकण विभागातल्या काही भागांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडच्या काही भागांत त्या दिवशी हवा उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतल्या काही भागांतही असाच अंदाज हवामान विभागाने दिला आहे. म्हणूनच या भागांसाठी हा अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईतही तापमान वाढण्याची शक्यता आहे. शहरातले कमाल तापमान 36 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते, तर किमान तापमान साधारण 26 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईकरांना ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच वाढत्या उकाड्याचा सामना करावा लागू शकतो.
उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर या भागांत 4 ऑक्टोबरला प्रामुख्याने हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. तिथे पावसाची शक्यता कमी असून तापमान वाढू शकते. नाशिकमध्ये किमान तापमान 18 अंश, तर कमाल तापमान सुमारे 35 अंश सेल्सिअस राहू शकते. सकाळी आणि रात्री थोडा गारवा जाणवत असला, तरी दिवसा उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, पुणे घाटमाथा, कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा, सातारा, सातारा घाटमाथा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांतही हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. 4 ऑक्टोबरला या भागांत पावसासाठी कोणताही विशेष इशारा दिलेला नाही. पुणे शहरात तापमान 23 ते 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुण्यातही दिवसा उन्हाचा चटका जाणवू शकतो.
मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत 4 ऑक्टोबरला हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 37 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. म्हणून मराठवाड्यातही उकाडा वाढू शकतो.
विदर्भातल्या अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीसह बहुतेक जिल्ह्यांत कोणताही विशेष हवामान इशारा दिलेला नाही. मात्र तिथे हवामान कोरडे राहील आणि तापमानाचा पारा चढलेलाच राहू शकतो. अकोला शहरात तापमान 24 ते 38 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भात 'ऑक्टोबर हिट'चा परिणाम जास्त जाणवू शकतो.
उष्ण आणि दमट हवामान असलेल्या भागांतल्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दुपारच्या वेळी शक्यतो थेट उन्हात जाणे टाळावे, शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून पुरेसे पाणी प्यावे आणि बाहेर पडताना टोपी किंवा छत्री वापरावी. वाढत्या तापमानामुळे लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.