कोकण व नाशिकमध्ये ४१८ ठिकाणी रोजगार मेळावे सुरू, फडणवीसांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ
पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचा कोकण व नाशिक विभागात एसएनडीटी महिला विद्यापीठातून शुभारंभ झाला.
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचा ऑनलाईन शुभारंभ झाला. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. कोकण व नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांत हा मेळावा सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ संदेशातून मेळाव्याला शुभेच्छा दिल्या.
या वेळी फडणवीस यांच्या हस्ते सहीदा परमाणिक यांना क्रेवा कॅपीटल सर्व्हिसेस प्रायवेट लिमीटेड, बेलापूर यांच्याकडून आणि कांती शंभू चव्हाण यांना क्रेवा कॅपीटल सर्व्हिसेस प्रायवेट लिमीटेड, कुर्ला यांच्याकडून नियुक्तीपत्र देण्यात आले.
फडणवीस म्हणाले की, देशाच्या युवा शक्तीला रोजगारक्षम बनवायचे असेल तर शिक्षणासोबत कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि रोजगार यांची सांगड घालणे आवश्यक आहे. फक्त पदवी मिळवणे पुरेसे नाही. एआय, सेमीकंडक्टर, क्वांटम कॉम्प्युटिंग अशा बदलत्या तंत्रज्ञानानुसार सतत 'अपस्किलिंग' करणे आणि नवे कौशल्य आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. जगातील २८ हून अधिक देशांत मनुष्यबळाची मोठी मागणी आहे. महाराष्ट्रातील तरुणांना आंतरराष्ट्रीय पातळीवर रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर 'सेवा संकल्प अभियाना'अंतर्गत हा मेळावा भरवण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार ही त्रिसूत्री विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची आहे. गरीबीमुक्त, बेरोजगारीमुक्त आणि रोगमुक्त भारत हे आपले स्वप्न आहे, असे ते म्हणाले. आज देशातील ६५ टक्के लोकसंख्या कार्यक्षम युवाशक्ती आहे. एकीकडे उद्योजकांना कुशल मनुष्यबळ हवे आहे, तर दुसरीकडे तरुणांना रोजगार हवा आहे. या दोघांना जोडणारा भक्कम दुवा म्हणून हे मेळावे काम करत आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेल्या 'अंत्योदय' आणि 'एकात्म मानव दर्शन' या विचारांवर आधारित सरकारचे कामकाज सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हा महाराष्ट्राच्या दृष्टीने ऐतिहासिक दिवस असल्याचे सांगितले. कोकण व नाशिक विभागात ४१८ ठिकाणी एकाच वेळी मेळावे होत असून एक लाखांहून अधिक युवक-युवती त्यांच्याशी जोडले गेले आहेत, असे ते म्हणाले. लोढा यांच्या म्हणण्यानुसार, हा फक्त ४१८ मेळाव्यांचा उपक्रम नाही. युवाशक्तीला रोजगाराच्या संधींशी जोडण्याच्या मोठ्या संकल्पनेची ही सुरुवात आहे.
लोढा पुढे म्हणाले की, रोजगार महाकुंभाची आज सुरुवात झाली आहे, हा शेवट नाही. प्रत्येक युवक-युवतीला रोजगार किंवा स्वयंरोजगाराची संधी मिळेपर्यंत प्रयत्न थांबणार नाहीत. या वेळी फक्त आयटीआयमधील विद्यार्थ्यांपुरते मर्यादित न राहता सर्व स्तरांतील तरुणांसाठी प्रत्येक तालुक्यात किमान तीन लहान मेळावे घेतले जात आहेत. ७ दिवसांचे मोफत पूर्व-रोजगार प्रशिक्षण देण्यात आले असून आतापर्यंत ६१ हजार मुला-मुलींनी ते घेतले आहे. या मेळाव्यासाठी १ लाखांपेक्षा जास्त तरुणांनी नोंदणी केली आहे. किमान ७० टक्के तरुणांना रोजगार किंवा स्वरोजगाराशी जोडल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, जेवढे पदवीधर बाहेर पडतील तेवढे रोजगाराचे मार्ग तयार व्हावेत, यासाठी त्यांचा विभाग कौशल्य विकास विभागाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, महाराष्ट्राने आशियातील अव्वल गुंतवणूक केंद्र आणि देशाची 'स्टार्टअप कॅपिटल' म्हणून ओळख निर्माण केली आहे. तरुणांना जगात कुठेही रोजगार मिळाला तर त्यांना भाषा व कौशल्य प्रशिक्षण देऊन परदेशात पाठवण्याची सरकारची तयारी आहे.
कार्यक्रमाला महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे, अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रो. हेमलता बागला, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयुक्त डॉ. अमित सैनी आणि मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल उपस्थित होते. विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि राज्यभरातून ऑनलाईन व प्रत्यक्ष हजारो विद्यार्थीही हजर होते.
कोकण व नाशिक विभागातील १२ जिल्ह्यांत हे मेळावे होत आहेत. १५०० पेक्षा अधिक उद्योजक नियोक्त्यांनी आणि एक लाखांपेक्षा अधिक रोजगार इच्छुक युवक-युवतींनी रोजगार महाकुंभासाठी नोंदणी केली आहे. सहभागी उद्योजकांनी २५,००० पेक्षा अधिक रिक्त पदांची मागणी नोंदवली आहे. जिल्हानिहाय शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, स्थानिक प्रशासन आणि इतर संस्थांच्या समन्वयातून उमेदवार आणि नियोक्ते एकमेकांशी जोडले गेले. जिल्हा प्रशासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, कामगार विभाग, उद्योग विभाग, पणन विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, विद्यापीठे आणि औद्योगिक संघटना यांचे सहकार्य लाभले.
महिलांच्या रोजगारातील सहभागाला विशेष प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्यासाठी स्वतंत्र विशेष मेळावाही घेण्यात आला. महिलांना रोजगार देणारे उद्योग, कंपन्या आणि सेवा क्षेत्रातील आस्थापना यांचा व्यापक सहभाग निश्चित करण्यात आला आहे. ३६ उद्योजकांनी सहभाग नोंदवला आहे. स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी विविध शासकीय महामंडळांच्या योजनांची माहिती देणारे स्टॉलही ठेवण्यात आले आहेत.