किया कॅरेन्स आणि कॅरेन्स क्लॅव्हिसचे सीएनजी व्हेरियंट बाजारात, किंमत १२.१२ लाखांपासून
किया इंडियाने कॅरेन्स आणि कॅरेन्स क्लॅव्हिसच्या फॅक्टरी-फिटेड सीएनजी व्हेरियंटच्या किमती जाहीर केल्या आहेत. एक्स-शोरूम किंमत Rs 12.12 लाखांपासून सुरू होते.
किया इंडियाने आज कॅरेन्स सीएनजी आणि कॅरेन्स क्लॅव्हिस सीएनजी या दोन गाड्यांच्या किमती जाहीर केल्या. देशातील आघाडीची मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनी म्हणून किया ओळखली जाते. या नव्या व्हेरियंटमुळे कंपनीचा मल्टि-पॉवरट्रेन पोर्टफोलिओ अधिक भक्कम झाला आहे, तसेच ग्राहकांना आपल्या गरजेनुसार निवडायला जास्त पर्याय मिळाले आहेत, असे कंपनीने म्हटले आहे.
हे सीएनजी व्हेरियंट फॅक्टरी-फिटेड आहेत आणि त्यांची एक्स-शोरूम किंमत Rs 12.12 लाखांपासून सुरू होते. कियाच्या तीन रांगांच्या गाड्यांमधली उपयुक्तता आणि सीएनजीची सोय व कार्यक्षमता एकत्र आणल्याचे कंपनी सांगते. रोजच्या शहरातल्या प्रवासासाठी आणि कुटुंबाच्या प्रवासासाठी सोयीचा आणि विश्वासार्ह अनुभव द्यायचा, असा कंपनीचा हेतू आहे.
या घोषणेबद्दल बोलताना किया इंडियाचे मार्केटिंग अँड सेल्सचे सीनियर व्हाईस प्रेसिडेंट अतुल सूद म्हणाले, "भारत वैविध्यपूर्ण बाजारपेठ आहे, जिथे ग्राहकांच्या प्रवासाच्या गरजा वेगवेगळ्या आहेत आणि ग्राहकांच्या जीवनशैलीला व वापराला सर्वोत्तम अनुकूल ठरेल अशी पॉवरट्रेन उपलब्ध करून देणे हा आमचा दृष्टिकोन आहे. कार्यक्षम आणि व्यावहारिक मोबिलिटी सोल्यूशन शोधणाऱ्या अधिकाधिक ग्राहकांसाठी सीएनजी हा अजूनही महत्त्वाचा पर्याय ठरत आहे. कॅरेन्स आणि कॅरेन्स क्लॅव्हिसवर फॅक्टरी-फिटेड सीएनजी पर्याय सादर करून आम्ही कियाचा पाठिंबा असलेल्या एकात्मिक उत्पादनाद्वारे या मागणीची पूर्तता करत आहोत. या दोन्ही मॉडेल्सनी एैसपैस जागा, आरामदायीपणा आणि कुटुंब-केंद्रित उपयुक्ततेच्या बाबतीत प्रबळ स्थान निर्माण केले आहे; तसेच सीएनजीच्या समावेशामुळे त्यांचे आकर्षण आणखी वाढेल आणि ग्राहकांना निवडीचे अधिक स्वातंत्र्य मिळेल."
सीएनजी सिस्टीम गाडीसोबतच एकत्रित करून बसवलेली आहे. ती दोन्ही मॉडेल्सच्या मूळ उपयुक्ततेवर आधारित असून नियमित प्रवासासाठी आणि कुटुंबाच्या वापरासाठी आणखी एक सक्षम पॉवरट्रेन पर्याय देते.
सिस्टीममध्ये ६०-लिटरची सीएनजी टँक आहे. ती गाडीच्या सध्याच्या पॉवरट्रेनला आणि रचनेला पूरक ठरेल, अशा पद्धतीने डिझाइन केली आहे. सीएनजी किट बसवल्यानंतरही स्पेअर टायर म्हणजेच स्टेपनी कायम ठेवली आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये पेट्रोल इंधन यंत्रणेसोबत ६०-लिटर सीएनजी टँक असल्याने ड्युअल-फ्युएल कॉन्फिगरेशनची लवचिकता मिळते.
दोन्ही गाड्या जी१.५ ६एमटीवर आधारित आहेत. त्यात स्मार्टस्ट्रीम जी१.५ इंजिन आहे, ते ६एमटी ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. सीएनजी मोडमध्ये हे इंजिन ९६ पीएस पॉवर आणि १२३ एनएम टॉर्क निर्माण करते.
सीएनजीसाठी वेगळे इंजिन कॅलिब्रेशन आणि मॉडिफाइड सस्पेंशन देण्यात आले आहे. आर१६ व्हील्स आणि १६-इंच फ्रंट डिस्क ब्रेक्सही आहेत. इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये डिस्टन्स टू एम्प्टी (डीटीई) लॉजिक (सीएनजी मोड) आणि सीएनजी फ्युएल चेंज स्विच मिळतो. ४.२-इंच कलर टीएफटी एमआयडीही यात आहे. थर्ड-रो सीट-बॅक फ्रेम मॉडिफाइड केल्यामुळे रेक्लाइन अँगल सुधारतो आणि प्रवाशांना प्रवासात अधिक आराम मिळतो, असे कंपनीने म्हटले आहे.
भारतातील आधुनिक कुटुंबांसाठी डिझाइन केलेल्या या दोन्ही मॉडेल्समध्ये एैसपैस जागा, आरामदायीपणा, सोय आणि इंधन कार्यक्षमता यांचा मेळ साधल्याचा कियाचा दावा आहे.