सणासुदीत खाद्यतेल स्वस्त होणार; सरकारकडून आयातशुल्कात कपात
सोयाबीन, पाम आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क सरकारने कमी केल्याने सणासुदीच्या दिवसांत किरकोळ बाजारात खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता उद्योग संघटनेने वर्तवली आहे.
सणासुदीचे दिवस तोंडावर आलेले असताना सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने सोयाबीन, पाम आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात कपात केली असून, यामुळे किरकोळ बाजारात खाद्यतेलाच्या किमती खाली येऊ शकतात, असा अंदाज इंडियन व्हेजिटेबल ऑइल प्रोड्युसर्स असोसिएशन (आयव्हीपीए) या उद्योग संघटनेने व्यक्त केला आहे.
भारताला आपल्या एकूण खाद्यतेलाच्या गरजेपैकी जवळपास ६० टक्के गरज आयातीवरच भागवावी लागते. याच पार्श्वभूमीवर सरकारने बुधवारी मोठा निर्णय घेत कच्च्या सूर्यफूल तेलावरील मूलभूत सीमा शुल्क (बीसीडी) १० टक्क्यांवरून थेट शून्य टक्क्यांवर आणले. तर शुद्ध केलेल्या सूर्यफूल तेलावरील बीसीडी ३२.५ टक्क्यांवरून २२.५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले. याशिवाय कच्च्या सोयाबीन तेल आणि पाम तेलावरील बीसीडी १० टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत खाली आणले गेले, तर शुद्ध केलेल्या सोयाबीन तेल आणि पाम तेलावरील बीसीडी ३२.५ टक्क्यांवरून २७.५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे.
सणासुदीचा हंगाम अगदी जवळ आलेला असताना आयात शुल्कात ही कपात करण्यात आल्याने हा निर्णय अत्यंत महत्त्वाच्या क्षणी घेतला गेल्याचे मानले जाते. आयात शुल्क कमी झाल्याने आयात केलेल्या खाद्यतेलाची किंमत खाली येईल आणि त्यामुळे ग्राहकांना द्याव्या लागणाऱ्या किमतींवरही काही अंशी नियंत्रण येऊ शकते, असे मत आयव्हीपीएचे अध्यक्ष सुधाकर देसाई यांनी मांडले.
पाम तेलाबाबत बोलताना देसाई यांनी सांगितले की, भारत अजूनही आपल्या खाद्यतेलाच्या गरजांसाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे, त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठ आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती आणि जागतिक पुरवठ्याच्या स्थितीला लगेच प्रतिसाद देते. सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाच्या आयातीत आता जास्त लवचिकता आल्याने पाम तेलाच्या मागणीवर परिणाम होऊन ती कमी होऊ शकते. मात्र बी ५० जैवइंधन अनिवार्यतेची अंमलबजावणी आणि लागवडीखालील क्षेत्रातील वाढीचा वेग मंदावल्याने पाम तेल तुलनेने महागच राहण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.
शुल्क कपातीचा प्रत्यक्ष फायदा ग्राहकांपर्यंत किती पोहोचेल, हे केवळ सीमा शुल्कावर अवलंबून नसून आंतरराष्ट्रीय बाजारातील वस्तूंच्या किमती, मालवाहतुकीचा खर्च, विनिमय दरातील चढउतार, देशांतर्गत उपलब्धता आणि साठ्याची पातळी या घटकांवरही अवलंबून असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
आगामी सणासुदीच्या महिन्यांत देशभर खाद्यतेलाचा पुरेसा पुरवठा राहावा, हे खाद्यतेल उद्योगाचे सध्याचे तत्काळ प्राधान्य आहे. मागणीतील चढउतार लक्षात घेता नव्याने ठरवलेली शुल्क रचनाही तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. सूर्यफूल तेलावरील शुल्क कपात इतर तेलांच्या तुलनेत अधिक मोठी असल्याने ते आता अधिक परवडणारे झाले आहे, विशेषतः दक्षिण भारतातील मुख्य ग्राहक भागांमध्ये याचा फायदा दिसून येईल, असे देसाई यांनी नमूद केले.