कटारिया कुटुंब पुन्हा भेटीला, 'बकैती सीजन 2' 25 सप्टेंबरपासून ZEE5 वर
दोन कटारिया कुटुंबं आता एकाच घरात राहायला येणार, त्यातून होणारा गोंधळ आणि इमोशनल नाट्य घेऊन 'बकैती सीजन 2' प्रेक्षकांसमोर येतोय.
ओटीटीवर सारख्याच धाटणीच्या क्राईम आणि थ्रिलर वेबसिरीज बघून कंटाळला असाल, तर तुमच्यासाठी एक मस्त बातमी आहे. सगळ्यांची लाडकी कटारिया फॅमिली पुन्हा पडद्यावर येतेय. ZEE5 ने आपल्या सुपरहिट शोचा, म्हणजे 'बकैती सीजन 2' चा ट्रेलर रिलीज केला असून तो बघूनच पोट धरून हसायला होतंय. हा नवा सीजन 25 सप्टेंबर 2026 पासून हिंदीत ZEE5 वर बघायला मिळणार आहे.
पहिल्या सीजनला प्रेक्षकांनी इतकं प्रेम का दिलं, याचं कारण म्हणजे त्यात प्रत्येकाच्या घरचीच गोष्ट होती. मध्यमवर्गीय कुटुंब, रोजचे वाद, आईचा ओरडा, बाबांचं टेन्शन आणि भावंडांची भांडणं हे सगळं जवळपास प्रत्येकाच्याच घरात घडतं. त्यामुळे कटारिया फॅमिली लोकांना आपलीच वाटली होती. त्याच यशानंतर मेकर्सनी आता दुसरा सीजन आणलाय आणि यावेळी गोंधळ डबल असणार आहे.
ट्रेलरवरून कथेची झलक मिळते. पहिल्या सीजननंतर जवळपास वर्षभराचा काळ लोटलाय. एका अनपेक्षित घटनेमुळे अजय, अल्का आणि अमन पुन्हा कटारिया कुटीरमध्ये राहायला येतात. म्हणजे आता दोन्ही कटारिया फॅमिली एकाच घरात राहणार. जिथे दोन कुटुंब एकत्र येतात तिथे गोंधळ ठरलेलाच. सुरुवातीला ही तात्पुरती व्यवस्था वाटते, पण नंतर त्याचंच मोठं भांडण होतं. वेगवेगळी मतं, दुखावलेला इगो, जुन्या हिशोबाची भांडणं आणि रोजची किरकिर, यामुळे घरात सतत बकैती सुरू असते.
पण या हसण्या-खिदळण्यामागे एक इमोशनल गोष्टही दडलेली आहे. कुटुंबावर पैशाचं टेन्शन आहे, नात्यांमध्ये अडचणी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नानाजींची तब्येत ठीक नाही, त्यांची स्मरणशक्ती कमी होत चाललीय. अशातच कटारिया कुटीर विकून तिथे नवीन बिल्डिंग बांधण्याचा विषय समोर येतो. मग हे घर फक्त घर राहत नाही, तर एक इमोशन बनून जातं. घर म्हणजे नक्की काय, हाच प्रश्न सगळ्यांना पडतो. या सगळ्या गोंधळात सगळ्यात जास्त भरडला जातो तो संजय कटारिया, ज्याला एका संकटातून दुसऱ्या संकटात वाट काढावी लागते.
या सीजनमध्येही जुनीच टीम कायम आहे. डाईस मीडियाने हा शो बनवलाय आणि समर इक्बाल यांनी दिग्दर्शन केलंय. राजेश तैलंग, शीबा चड्ढा, तान्या शर्मा आणि आदित्य शुक्ला मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत देविशी मदान, रित्विक नाम्बियार आणि अशोक चव्हाणही दिसणार आहेत.
मेकर्सच्या म्हणण्यानुसार यावेळी बकैती डबल आहे, कारण फॅमिलीच डबल झालीय. एकाच छताखाली दोन कुटुंब असल्याने डबल वाद आणि डबल इमोशनही पाहायला मिळणार आहे. हा शो फक्त विनोदापुरता मर्यादित नसून रोजच्या आयुष्यातल्या गोष्टींवर बोलतो, पैसा, भावंडांचं नातं, आई-वडिलांचं टेन्शन आणि पिढ्यांमधला फरक, या सगळ्यावर हा शो भाष्य करतो.
दिग्दर्शक समर इक्बाल म्हणाले की, "बकैती हे माझ्या खूप जवळचं जग आहे. जिथे कोणी थेट I Love You म्हणत नाही, पण जेवण झालं का, हे मात्र आवर्जून विचारतात. हाच गोंधळ आणि आपुलकी कटारिया फॅमिलीला खास बनवते. सीजन 2 मध्ये आम्ही पात्रांच्या इमोशनवर जास्त काम केलंय."
राजेश तैलंग आणि शीबा चड्ढा यांनीही सांगितलं की या शोमध्ये पुन्हा येऊन खूप छान वाटतंय. प्रेक्षकांनी पहिल्या सीजनला जितकं प्रेम दिलं, त्यामुळे दुसऱ्या सीजनची जबाबदारी अजून वाढलीय. फॅमिली ड्रामा, कॉमेडी आणि इमोशनल कथा आवडत असेल, तर 'बकैती सीजन 2' खास तुमच्यासाठीच आहे. 25 सप्टेंबरला ZEE5 वर बघायला विसरू नका, कटारिया कुटीरमध्ये पुन्हा एकदा गोंधळ सुरू होणार आहे.