कर्जत तालुक्यात अनंत चतुर्दशीला 424 गणेशमूर्तींचे भक्तिभावात विसर्जन
कर्जत, नेरळ आणि माथेरान पोलीस स्टेशन हद्दीत अनंत चतुर्दशीला 424 बाप्पांना निरोप देण्यात आला.
कर्जत तालुक्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी विविध गणेश घाटांवर भक्तिमय वातावरणात 424 गणपती बाप्पांचे विसर्जन पार पडले. 14 सप्टेंबरला विराजमान झालेल्या या बाप्पांना शुक्रवारी निरोप देण्यात आला. तालुक्यात एकूण 9590 बाप्पा विराजमान झाले होते, त्यापैकी 424 बाप्पा अनंत चतुर्दशीपर्यंत भक्तांनी घरी आणि मंडळांमध्ये ठेवले होते. यातील बहुतांश मूर्तींचे वाहत्या पाण्यात विसर्जन करण्यात आले.
कर्जत, नेरळ आणि माथेरान या तीनही पोलीस स्टेशन हद्दीत विसर्जन सोहळा शांततेत पार पडला. कर्जत नगरपरिषद हद्दीत सहा ठिकाणी गणेश घाटांवर विसर्जनाची तयारी करण्यात आली होती. दहिवली, श्री प्रति पंढरपूर, मुद्रा, महावीर पेठ, शनि मंदिर याशिवाय गुंडगे आणि भिसेगाव येथेही नगरपरिषदेकडून व्यवस्था करण्यात आली होती. कर्जत नगरपरिषद, नेरळ ग्रामपंचायत आणि दहिवली तर्फे वरेडी ग्रामपंचायतीने विसर्जन सोहळ्यासाठी मोठे शामियाने उभारले होते.
नेरळ कळंब रस्त्यावर उल्हास नदीवरील दहिवली पुलाजवळच्या गणेश घाटावर दहिवली तर्फे वरेडी ग्रामपंचायतीने भक्तांसाठी व्यवस्था केली होती. तिथे मोठ्या संख्येने भक्त आपल्या बाप्पांना निरोप देण्यासाठी आले होते. माजी सभापती अमर मिसाळ, थेट सरपंच मिसाळ आणि इतर सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी मूर्तींवर पुष्पवृष्टी केली. नदीचे पाणी गढूळ असल्यामुळे भक्तांना पाण्यात उतरू दिले जात नव्हते, त्यामुळे विसर्जन ग्रामपंचायत आणि स्थानिक कार्यकर्त्यांनीच केले.
तालुक्यातला सर्वात मोठा आणि तब्बल 30 वर्षांची परंपरा असलेला विसर्जन सोहळा नेरळच्या गणेश घाटावर मध्यरात्रीपर्यंत रंगला. नेरळ पूर्वेच्या राजाचे विसर्जन सर्वात शेवटी झाले. जिल्हा परिषद सदस्या सुनीता मोरे, कर्जत पंचायत समिती सदस्य भगवान चंचे, प्रशासक सुजित धनगर आणि ग्रामपंचायत अधिकारी अरुण कार्ले यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मूर्तींवर पुष्पवृष्टी करण्यासाठी उपस्थित होते.
पोलीस अधिकारी राहुल वरोटे स्वतः कल्याण-कर्जत रस्त्यावर उभे राहून वाहतूक कोंडी होऊ नये आणि भक्तांना त्रास होऊ नये यासाठी लक्ष ठेवून होते. नेरळमधील ब्रिटिशकालीन धरणावर कोणत्याही भक्ताला पाण्यात उतरण्याची परवानगी नव्हती, त्यामुळे ग्रामपंचायतीने दोन बोटी तैनात केल्या होत्या आणि त्यांच्या मदतीने मूर्तींचे खोल पाण्यात विसर्जन करण्यात आले.
विसर्जनावेळी प्रशासन, पोलीस, ग्रामपंचायत आणि शिवशंभो युवा हायकर्स कर्जत संस्थेच्या कार्यकर्त्यांनी भक्तांना मदत करत सुरक्षिततेची काळजी घेतली. संस्थेचे विकास चित्ते, तुषार दिवेकर, शैलेश सातपुते, महेंद्र कर्वे, सुमित गुरव, गौरव चित्ते, नेहा सातपुते आणि इशांत मालुसरे हे कार्यकर्ते रोप आणि इतर साहित्य घेऊन प्रशासनाला मदत करत होते.