करीना कपूरच्या वाढदिवसानिमित्त तिच्या नावापासून करिअरपर्यंतच्या रंजक गोष्टी
बॉलिवूडची 'बेबो' करीना कपूर आज ४६ वर्षांची झाली, तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेऊया.
बॉलिवूडमध्ये 'बेबो' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री करीना कपूर खान आज, २१ सप्टेंबर रोजी तिचा ४६वा वाढदिवस साजरा करत आहे. कपूर घराण्यातील पाचव्या पिढीची ही अभिनेत्री गेल्या अडीच दशकांपासून बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख टिकवून आहे. तिची बोल्ड स्टाइल असो किंवा वैयक्तिक आयुष्यातले निर्णय, करीना कायम चर्चेत राहिलेली आहे. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या आयुष्यातल्या काही रंजक गोष्टी पाहूया.
करीनाचा जन्म २१ सप्टेंबर १९८० रोजी कपूर कुटुंबात झाला. राज कपूर यांची ती नात, तर रणधीर कपूर आणि बबिता कपूर यांची मुलगी आहे. जन्मानंतर तिचं नाव 'सिद्धिमा' असं ठेवण्यात आलं होतं. पण नंतर तिच्या आई बबिता यांनी तिचं नाव बदलून 'करीना' असं ठेवलं. 'अण्णा कॅरेनिना' या पुस्तकावरून प्रेरणा घेऊन हे नाव निवडलं गेलं, असं सांगितलं जातं.
करीनाचं सुरुवातीचं शिक्षण मुंबईतल्या जमनाबाई नरसी शाळेत आणि डेहराडूनमधल्या वेल्हम गर्ल्स शाळेत झालं. त्यानंतर तिने मुंबईतल्या मिठीबाई कॉलेजमध्ये कॉमर्स शाखेत अॅडमिशन घेतलं, पण डिग्री पूर्ण केली नाही. तिने हार्वर्ड समर स्कूलमध्ये तीन महिन्यांचा मायक्रो कॉम्प्युटर कोर्सही केला होता. त्यानंतर मुंबईतल्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्येही तिने अॅडमिशन घेतलं होतं. पण अभिनयात करिअर करण्यासाठी तिने शिक्षण अर्धवट सोडलं. एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं की तिचं शिक्षण फक्त अकरावीपर्यंतच झालं आहे.
करीनाच्या बॉलिवूड एंट्रीची कहाणीही तितकीच इंटरेस्टिंग आहे. डायरेक्टर राकेश रोशन त्यांच्या मुलगा हृतिक रोशन आणि करीनाला 'कहो ना प्यार है' या सिनेमातून लॉन्च करणार होते. करीनाने या सिनेमाचं शूटिंगही सुरू केलं होतं आणि काही सीन्सचं चित्रीकरणही झालं होतं. मात्र सिनेमाच्या स्क्रिप्टवरून आणि करीनाच्या रोलला मिळणाऱ्या महत्त्वावरून तिची आई बबिता आणि राकेश रोशन यांच्यात मतभेद झाले, असं सांगितलं जातं. हृतिकच्या रोलला जास्त महत्त्व दिलं जात आहे असं बबिता यांना वाटलं आणि त्यांनी करीनाला या प्रोजेक्टमधून बाहेर काढलं.
त्यानंतर करीनाला जे. पी. दत्ता यांच्या 'रिफ्युजी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याची संधी मिळाली. या सिनेमात ती अभिषेक बच्चनसोबत दिसली होती. गंमत म्हणजे 'कहो ना प्यार है' बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला आणि त्यातून अमिषा पटेल एका रात्रीत फेमस झाली. दुसरीकडे 'रिफ्युजी'ला बॉक्स ऑफिसवर तितकं यश मिळालं नाही.
करीनाने तिच्या करिअरमध्ये अनेक सिनेमांना नकार दिला आहे, आणि त्यातले काही सिनेमे नंतर सुपरहिट ठरले. यामध्ये 'कहो ना प्यार है', 'कल हो ना हो', 'गोलियों की रासलीला राम-लीला' आणि 'चेन्नई एक्सप्रेस' या सिनेमांचा समावेश होतो. हे सिनेमे करीनाने केले असते तर तिचा फिल्मी प्रवास आणखी वेगळा दिसला असता. पण तिने निवडलेल्या भूमिका आणि तिच्या अभिनयामुळे आज बॉलिवूडमध्ये तिचं स्वतःचं खास स्थान तयार झालं आहे.