मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

प्रदीप वेलणकर यांचं 'मनापासून' पुस्तक मुंबईत वाचकांच्या हाती

प्रदीप वेलणकर यांचं 'मनापासून' पुस्तक मुंबईत वाचकांच्या हाती छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कल्चर PT24 टीम

ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांच्या 'मनापासून' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी, १ नोव्हेंबर रोजी मुंबईतील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात झाला.

अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर आता लेखनातून वाचकांशी बोलणार आहेत. त्यांचं 'मनापासून' हे पुस्तक रविवारी, १ नोव्हेंबर रोजी मुंबईतील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात प्रकाशित झालं. त्यांचे अनुभव, आठवणी आणि आयुष्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन या पुस्तकात आहे.

साहित्य, नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातले अनेक दिग्गज या सोहळ्याला हजर होते. त्यांच्या उपस्थितीत वेलणकर यांचा लेखनप्रवास आणि त्यांच्यावर असलेलं लोकांचं प्रेम दिसून आलं. आलेल्यांच्या प्रेमाने भारावलेल्या वेलणकर यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या. हा क्षण आपल्यासाठी जितका आनंदाचा आहे, तितकाच भावनिकही आहे, असं ते म्हणाले.

हे पुस्तक ग्रंथालीतर्फे प्रकाशित झालं आहे. पुस्तकाचं मुखपृष्ठ अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्या मीरा वेलणकर यांनी आपल्या कल्पकतेने आकर्षक पद्धतीने केलं आहे.

बोलताना प्रदीप वेलणकर म्हणाले, "आजचा दिवस बोलण्याचा नाही, तर अनुभवण्याचा आहे. आज आनंद आहे, पण त्याचबरोबर मनावर दडपणही तेवढंच आहे. लेखक ही संज्ञा अत्यंत मोठी आणि उच्च स्तरावरील आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. त्या साहित्यिक उंचीपासून मी अजूनही खूप दूर आहे, याचीही नम्र जाणीव मला आहे. लहानपणापासून जे काही अनुभवलं, त्या अनुभवांची नोंद ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी 'मनापासून' या पुस्तकातून केला आहे."

उपस्थितांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना ते पुढे म्हणाले, "आज इथे उपस्थित असलेले सर्वजण माझ्यावरील प्रेमाखातर आले आहेत. तुमच्या या प्रेमाचं मोल माझ्यासाठी खरोखरच अनमोल आहे. मला शुभेच्छा देण्यासाठी आणि माझ्या आनंदात सहभागी होण्यासाठी तुम्ही आवर्जून आलात, त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे."

त्यांच्या पत्नी रजनी वेलणकर यांनीही मनोगत मांडलं. त्या म्हणाल्या, "आम्ही आमचा संसार अत्यंत प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने केला. आज सहचारिणी आणि सहकलाकार म्हणून त्यांचा प्रवास जवळून पाहताना त्यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचा मला विशेष आनंद वाटतो. त्यांनी आयुष्यातील अनुभवांना शब्दरूप दिलं आहे, याचा मला अभिमान आहे. हे पुस्तक मी नक्कीच वाचणार असून, वाचल्यानंतर त्याविषयीचा माझा अभिप्रायही त्यांना आवर्जून कळवणार आहे."

वेलणकर यांची कन्या गौरी हिने वडिलांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यांच्या समृद्ध जीवनप्रवासाविषयी अभिमान व्यक्त केला. ती म्हणाली, "आमच्या वडिलांना आयुष्यात जे काही हवं होतं, ते कदाचित सगळंच मिळालं नसेल; मात्र त्यांनी आयुष्याला भरभरून दिलं आहे. त्यांच्या या प्रवासाचा आणि त्यांनी जपलेल्या मूल्यांचा आम्हाला मनापासून अभिमान आहे."

पत्नी रजनी, कन्या गौरी, मीरा आणि मधुरा यांच्यासह नातवंडंही या आनंदाच्या क्षणी हजर होती. संपूर्ण वेलणकर कुटुंब आल्यामुळे सोहळ्याला घरगुती जिव्हाळ्याची आणि आनंदाची खास छटा मिळाली.

सहकलाकारांनीही वेलणकर यांच्यासोबतच्या कामाच्या आठवणी सांगितल्या. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव, कामावरची निष्ठा, सहकलाकारांशी जपलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि त्यांच्यासोबत घडलेले काही खास किस्से उपस्थितांनी सांगितले. त्यातून वेलणकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू समोर आले. पुस्तकातले निवडक उतारे अभिनेते सुबोध भावे, सुमीत राघवन आणि उमेश कामत यांनी भावपूर्ण शैलीत वाचून दाखवले.

ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, वंदना गुप्ते, इला भाटे, उज्वला जोग आणि रजनी वेलणकर यांच्या शुभहस्ते प्रकाशन झालं. अर्चना गोरे, मंदार आपटे आणि प्राजक्ता रानडे यांनी सुरेल गाण्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. डॉ. समीरा गुजर यांनी सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं.

#नागपूर#कल्चर#PT24#Culture#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ