जुई गडकरी: 'असे फालतू व्हिडीओ बनवायला लाज वाटत नाही का?' लग्नाच्या फेक व्हिडीओवर जुई गडकरीचा संताप; ट्रोलरला
मालिकाविश्वातील अभिनेत्री जुई गडकरीच्या लग्नाबाबत एका युट्यूब चॅनेलवरून खोटी आणि AI जनरेटेड माहिती पसरवण्यात आली. जुईने संताप व्यक्त करत व्हिडीओ तात्काळ हटवण्याचा इशारा दिला, अखेर व्हिडीओ युट्यूबवरून हटवण्यात आला.
सोशल मीडियावर सध्या फेक व्हिडीओ आणि AI जनरेटेड फोटो-व्हिडीओंचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसतं आहे. मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांना याचा फटका बसतो आहे. कलाकारांचे फेक व्हिडीओ, AI जनरेटेड फोटो, बॉडी शेमिंग तसंच त्यांच्या खासगी आयुष्याबाबत चुकीच्या बातम्या सोशल मीडियावर पसरवल्या जात असल्याचं दिसून येतं. काहीवेळा कलाकारांच्या आजारपणाबाबत किंवा निधनाबाबतही अशाच खोट्या बातम्या व्हायरल होतात.
याआधी अभिनेता सिद्धार्थ जाधवलाही असाच अनुभव आला होता. त्याने संबंधित व्हिडीओ शेअर करत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. आता हाच प्रकार मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरीसोबतही घडला आहे.
जुईने सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत एका व्हिडीओबाबत तीव्र संताप व्यक्त केला. एका युट्यूब चॅनेलवरून तिच्या लग्नासंदर्भात खोटी माहिती पसरवली जात असल्याचं तिने या पोस्टमधून स्पष्ट केलं. या व्हिडीओत जुई एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलासोबत लग्न करणार असल्याचा दावा करण्यात आला होता. हा व्हिडीओ AI जनरेटेड असल्याचंही जुईने आपल्या पोस्टमधून सांगितलं.
जुईने हा व्हिडीओ ज्या लिंकवर आहे ती आपल्या सोशल मीडिया स्टोरीवर शेअर केली आणि तो तात्काळ हटवण्याचा इशारा दिला. व्हिडीओ डिलीट केला नाही तर कायदेशीर कारवाई करण्याचंही तिने स्पष्टपणे नमूद केलं. कोणतीही खरी माहिती नसताना केवळ लाइक्स आणि व्ह्यूजसाठी असे व्हिडीओ तयार केले जात असल्याबद्दल तिने नाराजी बोलून दाखवली.
जुईने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, "तुम्ही जे कुणीही असाल... प्लीज आपल्या कामाकडे लक्ष द्या. लाइक्स आणि व्ह्यूजसाठी असे फालतू व्हिडीओ बनवायला तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्हाला नीट AI पण करता येत नाहीये. अशुद्ध भाषा... सगळंच अशुद्ध!"
पुढे तिने असंही लिहिलं, "हा व्हिडीओ जर आजच्या आज डिलीट झाला नाही तर लवकरच कोर्टात भेटुयात. ही विनंती आहे. प्लीज सर्वांनी हे चॅनेल रिपोर्ट करा आणि या व्हिडीओलाही रिपोर्ट करा." आपल्या पोस्टमधून जुईने चाहत्यांना आणि इतर सोशल मीडिया वापरकर्त्यांना संबंधित चॅनेल आणि व्हिडीओ रिपोर्ट करण्याचं आवाहनही केलं.
दरम्यान, जुई गडकरीने अशी ठाम भूमिका घेतल्यानंतर हा फेक व्हिडीओ आता युट्यूबवरून हटवण्यात आला आहे. जुईच्या मागणीनंतर संबंधित व्हिडीओ यापुढे उपलब्ध नसल्याचं दिसून येतं आहे. तिच्या या भूमिकेमुळे व्हिडीओ त्वरित हटवला गेला, हे विशेष.
कलाकारांच्या खासगी आयुष्याबाबत कोणतीही खात्रीशीर माहिती नसताना सोशल मीडियावर असे दावे केले जात असल्याने अनेकदा प्रेक्षकांमध्ये गैरसमज निर्माण होतात. अशा फेक व्हिडीओंमुळे कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चुकीचे संदेश पसरतात आणि त्याचा त्रास संबंधित कलाकारांना सहन करावा लागतो. जुईने या फेक व्हिडीओविरोधात स्पष्टपणे घेतलेल्या भूमिकेमुळे हा प्रकार सध्या चर्चेत आला आहे.