JSW कॉम्बॅट PHEV भारतात लाँच होणार, 90 किमी इलेक्ट्रिक रेंज मिळणार
जेएसडब्ल्यू मोटरची पहिली स्वतंत्र SUV 2026 संपण्याआधी भारतात येणार असून किंमत 30 लाखांपेक्षा जास्त राहू शकते.
जेएसडब्ल्यू मोटरच्या येऊ घातलेल्या कॉम्बॅट या 5-सीटर SUV बद्दल भारतीय बाजारात सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. ही गाडी 2026 साल संपण्यापूर्वीच देशात लाँच करण्याच्या तयारीत कंपनी असल्याचं समोर आलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कंपनीची भारतातील ही पहिलीच स्वतंत्र SUV एंट्री ठरू शकते. परदेशात विकल्या जाणाऱ्या जेटूर T2 या मॉडेलवर कॉम्बॅट आधारित असून, भारतात ती प्लग-इन हायब्रिड म्हणजेच PHEV स्वरूपात दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या SUVची किंमत 30 लाख रुपयांपेक्षा जास्त असू शकते, असंही सांगितलं जात आहे.
फीचर्सच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, कंपनी प्रीमियम ग्राहकवर्गाला डोळ्यासमोर ठेवून ही गाडी तयार करत असल्याचं दिसतं. केबिनमध्ये 15.6 इंचाचा मोठा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम बसवला जाण्याची शक्यता आहे. त्यासोबत वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto, 12-स्पीकरचा ऑडिओ सेटअप, अॅम्बियंट लाइटिंग आणि पॅनोरॅमिक सनरूफ अशी फीचर्स दिली जाऊ शकतात. पुढच्या सीट्सना इलेक्ट्रिक अॅडजस्टमेंट आणि व्हेंटिलेशनची सोय मिळण्याचीही शक्यता आहे.
डिझाइनबाबत सांगायचं तर, जेटूर T2 प्रमाणेच कॉम्बॅटला बॉक्सी आणि उभट असा SUV लूक मिळू शकतो. LED हेडलॅम्प्स, रूफ रेल्स आणि 20-इंची अलॉय व्हील्समुळे गाडीचं लूक्स आणखी खुलणार आहे. ही SUV मोनोकोक प्लॅटफॉर्मवर बांधली जाणार आहे. पॉवरट्रेनबद्दल बोलायचं झाल्यास, यात 1.5-लिटर टर्बोचार्ज्ड डायरेक्ट-इंजेक्शन पेट्रोल इंजिनसोबत दोन इलेक्ट्रिक मोटर्स दिल्या जाऊ शकतात. 18.4 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक असेल आणि फक्त इलेक्ट्रिक मोडवर जवळपास 90 किमीची रेंज मिळू शकते.
जागतिक बाजारात विकल्या जाणाऱ्या जेटूर T2 PHEV मध्ये 3-स्पीडचं खास हायब्रिड ट्रान्समिशन वापरलं जातं, आणि या मॉडेलमधून सुमारे 360 hp पॉवर आणि 610 Nm टॉर्क मिळतो. भारतातील कॉम्बॅटमध्येही साधारण याच तोडीची कामगिरी अपेक्षित आहे. सुरक्षेच्या आणि सोयीच्या दृष्टीने 360-डिग्री कॅमेरा, 540-डिग्री व्ह्यू, अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल यांसारखी ड्रायव्हर असिस्टन्स फीचर्सही या गाडीत असू शकतात.
सध्या जेएसडब्ल्यू कंपनी MG सोबत संयुक्त उपक्रमात काम करत आहे, पण आता स्वतंत्र ऑटोमोबाइल ब्रँड म्हणूनही आपला विस्तार करत आहे. भारतीय बाजारासाठी चेरीवर आधारित PHEV, रेंज-एक्स्टेंडर, स्ट्राँग हायब्रिड आणि पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांवरही कंपनीचं काम सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे जेएसडब्ल्यू कॉम्बॅटचं लाँचिंग भारतीय SUV बाजारपेठेतील कंपनीच्या पुढील वाटचालीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.