महिंद्राची पहिली सीएनजी एसयूव्ही XUV 3XO CNG 15 ऑक्टोबरला लॉन्च होणार
महिंद्रा अँड महिंद्रा आपली लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही XUV 3XO आता सीएनजी रूपात आणत असून, 15 ऑक्टोबर रोजी ती अधिकृतपणे लॉन्च होणार आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये गाजलेल्या गाड्यांच्या यादीत आता एका नव्या आणि पर्यावरणपूरक पर्यायाची भर पडणार आहे. महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) आपली अत्यंत लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही 'महिंद्रा एक्सयूव्ही 3 एक्सओ' (Mahindra XUV 3XO) नव्या रूपात बाजारात आणत आहे. कंपनीची ही पहिली सीएनजी एसयूव्ही असून तिचे नाव 'XUV 3XO CNG' आहे. येत्या 15 ऑक्टोबर रोजी ती अधिकृतपणे लॉन्च होणार आहे.
पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक या पर्यायांनंतर आता सीएनजी पॉवरट्रेनही या गाडीला जोडली जात आहे. त्यामुळे टाटा नेक्सॉन (Tata Nexon) आणि मारुती सुझुकी ब्रेझा (Maruti Suzuki Vitara Brezza) यांसारख्या गाड्यांना ही थेट आणि जोरदार टक्कर देईल, असे बोलले जात आहे.
सध्या पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत आणि पर्यावरणाला अनुकूल गाड्यांची मागणीही वाढत आहे. हे लक्षात घेऊन महिंद्राने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या नव्या सीएनजी मॉडेलमुळे ग्राहकांना कमी खर्चात प्रवास करता येईल आणि मायलेजही चांगले मिळेल. विशेष म्हणजे, या एसयूव्हीमध्ये 5 स्टार सुरक्षा रेटिंग (5-Star Safety Rating) आणि आकर्षक बिल्ड क्वालिटी कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सेफ्टीच्या बाबतीत तडजोड करावी लागणार नाही.
इंजिन आणि संभाव्य फीचर्सबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, या एसयूव्हीमध्ये 1.2 लिटर एमपीएफआय टर्बो पेट्रोल इंजिन सीएनजीच्या पर्यायासोबत दिले जाऊ शकते. हे इंजिन सीएनजी टेक्नोलॉजीशी सहज जुळवून घेणारे मानले जाते. तसेच टाटाच्या धर्तीवर महिंद्रा ड्युअल सिलिंडर सेटअप वापरू शकते. असे झाल्यास बूट स्पेसची (Boot Space) अडचण येणार नाही आणि सामानासाठी पुरेशी जागा मिळू शकेल.
फीचर्सच्या बाबतीत, Mahindra XUV 3XO सीएनजीमध्ये 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस कनेक्टिव्हिटी आणि सेगमेंटमधील सर्वात मोठे पॅनोरमिक सनरूफ अशी अॅडव्हान्स फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्ज, सर्व चाकांवर डिस्क ब्रेक आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल या सुविधा स्टँडर्ड स्वरूपात मिळतील.
सध्या बाजारात सीएनजी कार्सची विक्री झपाट्याने वाढत आहे, तर लहान गाड्यांमध्ये ग्राहकांकडे डिझेलचा पर्याय आता उरलेला नाही. अशा वेळी महिंद्राची ही नवी सीएनजी एसयूव्ही बाजारात पूर्णपणे गेम चेंजर ठरू शकते. 15 ऑक्टोबर रोजी या गाडीची किंमत आणि इतर अधिकृत तपशील जाहीर होणार असून, ग्राहकांचे लक्ष त्याकडे लागले आहे.