शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
03:11 IST

आयपीओपूर्वी जिओचा पुढचा आराखडा: मोबिलिटी, होम आणि एंटरप्राइज तीन इंजिन

आयपीओपूर्वी जिओचा पुढचा आराखडा: मोबिलिटी, होम आणि एंटरप्राइज तीन इंजिन छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

भारतातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आयपीओपूर्वी जिओ प्लॅटफॉर्म्सने आपल्या पुढच्या टप्प्यातील विकासाचा रोडमॅप सादर केला आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना जिओ प्लॅटफॉर्म्सचे व्यवस्थापकीय संचालक आकाश अंबानी यांनी मोबिलिटी, होम आणि एंटरप्राइज-इंटरनॅशनल ही तीन क्षेत्रे कंपनीची प्रमुख विकास इंजिन्स असल्याचे सांगितले.

तंत्रज्ञान, डिजिटल प्रवेशद्वारे आणि भक्कम पायाभूत सुविधा यांच्या बळावर आर्थिक वर्ष २०३०-३१ पर्यंत भारताच्या सुमारे १.४ ट्रिलियन डॉलरच्या डिजिटल अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देण्याची क्षमता कंपनीकडे आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आकाश अंबानी म्हणाले, "आमच्या व्यवसायातील सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे आमचा ग्राहक." प्रत्येक भारतीय नागरिक, प्रत्येक घर आणि प्रत्येक उद्योगसमूहाला अधिक चांगल्या आणि किफायतशीर डिजिटल सेवा देण्यावर जिओचा भर राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या जिओकडे सुमारे ५३.३ कोटी कनेक्टिव्हिटी ग्राहक आहेत. भारतातील एकूण डेटा वाहतुकीपैकी ६० टक्क्यांहून अधिक वाहतूक जिओच्या नेटवर्कवरून होते.

मोबिलिटी क्षेत्रात पुढील पाच वर्षांत सुमारे ३४ कोटी नवीन ४जी आणि ५जी ग्राहकांची बाजारपेठ तयार होईल, अशी कंपनीची अपेक्षा आहे. आकाश अंबानी यांच्या म्हणण्यानुसार यापैकी सुमारे १० कोटी ग्राहक पहिल्यांदाच मोबाइल कनेक्शन घेणारे असतील, तर सुमारे २४ कोटी ग्राहक २जीवरून ४जी आणि ५जी सेवांकडे वळू शकतात. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये जिओच्या निव्वळ सक्रिय मोबाइल ग्राहकसंख्येत झालेली वाढ दुसऱ्या क्रमांकाच्या ऑपरेटरच्या तुलनेत सुमारे तिप्पट होती.

होम ब्रॉडबँडकडे कंपनी येत्या वर्षांतील विकासाचे एक महत्त्वाचे इंजिन म्हणून पाहत आहे. जिओचे सध्या सुमारे २.८६ कोटी फिक्स्ड ब्रॉडबँड ग्राहक आहेत. ही संख्या वाढवून १० कोटी घरांपर्यंत पोहोचण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. फायबर नेटवर्क आणि स्वतःच्या वायरलेस तंत्रज्ञानाच्या मदतीने कंपनी देशातील १९,००० पिनकोड क्षेत्रांमध्ये आपली पोहोच वाढवत आहे.

एंटरप्राइज आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय हे जिओचे तिसरे प्रमुख विकास इंजिन असेल. भारतातील एंटरप्राइज डिजिटल सेवा बाजारपेठेचा आकार सुमारे ५.१ लाख कोटी रुपये, म्हणजेच ५६.८ अब्ज डॉलर असल्याचे जिओचे आकलन आहे. देशातील सुमारे ६५ टक्के बँक शाखा जिओच्या नेटवर्कशी जोडलेल्या आहेत, अशी माहिती आकाश अंबानी यांनी दिली.

जिओने स्वतः विकसित केलेली एंड-टू-एंड तंत्रज्ञान प्रणाली निवडक परदेशी बाजारपेठांमध्ये व्यावसायिक स्वरूपात उपलब्ध करून देण्याची कंपनीची योजना आहे. फक्त सॉफ्टवेअर विकण्यापुरते न थांबता जागतिक दूरसंचार कंपन्यांसोबत व्यवस्थापित सेवा भागीदार म्हणून काम करण्यावर जिओचा भर असेल. त्यामुळे भारताला तंत्रज्ञान आयात करणाऱ्या देशाकडून तंत्रज्ञान निर्यात करणाऱ्या देशाकडे वाटचाल करण्यास मदत होऊ शकते, असे आकाश अंबानी यांनी नमूद केले.

यापूर्वी ईशा अंबानी यांनी जिओच्या सुरुवातीचा आणि रिलायन्सच्या व्यावसायिक दृष्टिकोनाचा उल्लेख करताना सांगितले की, कंपनी दीर्घकालीन विचार, मोठ्या प्रमाणावरील विस्तार, प्रभावी अंमलबजावणी आणि आर्थिक शिस्त या तत्त्वांवर विश्वास ठेवते. पत्रकार परिषदेची सुरुवात करताना उदय कोटक यांनी रिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानी आणि १९७७ मध्ये झालेल्या रिलायन्सच्या आयपीओच्या आठवणींना उजाळा दिला.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ