जिओ आणि टी-मोबाईलची पार्टनरशिप, भारत-अमेरिका दरम्यान सुरु होणार जगातील पहिली 5G स्टँडअलोन रोमिंग कनेक्टिविटी
भारतातून अमेरिकेत आणि अमेरिकेतून भारतात ये-जा करणाऱ्या ग्राहकांना आता 5G स्टँडअलोन नेटवर्कवर सीमलेस रोमिंगचा फायदा मिळणार आहे.
भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी जिओ आणि अमेरिकेतील टी-मोबाईल यांनी एक पार्टनरशिप जाहीर केली आहे, आणि यामुळे दोन्ही देशांमध्ये ये-जा करणाऱ्या ग्राहकांचा मोबाईल रोमिंगचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या जिओ यूजर्सना आता तिकडे टी-मोबाईलच्या नेटवर्कवर 5G स्टँडअलोनवर सीमलेस रोमिंगचा फायदा मिळणार आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेतून भारतात येणारे टी-मोबाईलचे ग्राहक इथे जिओच्या 5G स्टँडअलोन नेटवर्कचा वापर करू शकणार आहेत. म्हणजेच दोन्ही बाजूंनी प्रवास करणाऱ्या ग्राहकांना याचा फायदा मिळणार आहे. दोन्ही कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन देशांचे 5G स्टँडअलोन नेटवर्क रोमिंगच्या माध्यमातून अशा पद्धतीने जोडले जाण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे, म्हणजेच जगातील पहिले असे कनेक्शन असणार आहे.
या पार्टनरशिपमुळे देश बदलल्यानंतरही ग्राहकांना 5जीच्या नव्या नेटवर्कवर रोमिंगचा फायदा मिळणार आहे. आतापर्यंत परदेशात गेल्यावर रोमिंगमध्ये जुन्या नेटवर्कवर अवलंबून राहावं लागत असे, पण या पार्टनरशिपमुळे ग्राहकांना थेट 5जी स्टँडअलोन नेटवर्कचा वापर करता येणार आहे. यामुळे फक्त वेगवान इंटरनेटच नाही, तर लो-लेटेंसी आणि जास्त विश्वासार्ह कनेक्शन देखील मिळणार आहे. रोमिंगदरम्यान दोन्ही कंपन्यांचे ग्राहक व्हिडीओ स्ट्रिमिंगपासून ऑफिसची कामं देखील अगदी सहज पूर्ण करू शकणार आहेत. दोन्ही देशांतील यूजर्सना रोमिंगच्या वेळी सहजपणे 5जी नेटवर्क वापरता येणार आहे, आणि यासाठी वेगळी काही सेटिंग करण्याची गरज भासणार नाही.
टी-मोबाईलचे प्रमुख नेटवर्क ऑफिसर अंकुर कपूर यांनी या पार्टनरशिपबद्दल सांगितले की, एका देशातून दुसऱ्या देशात पोहोचल्यानंतरही ग्राहकांना 5जी स्पीड वापरता येणार आहे, आणि ही तंत्रज्ञानाची फार मोठी ताकद आहे.
जिओचे हेड-इंटरनॅशनल नेटवर्क, पार्टनरशिप अँड सर्विसेज मार्क यारकोस्की यांनी सांगितले की, ही कामगिरी फक्त रोमिंगपुरतीच मर्यादित नाही. जिओ आणि टी-मोबाईलचे 5जी स्टँडअलोन नेटवर्क एकत्र आल्यामुळे ग्राहक आणि व्यवसायांसाठीच्या नव्या सेवांबरोबरच एआयवर आधारित सेवांचाही मार्ग मोकळा होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले. म्हणजेच पुढच्या काळात या नेटवर्कमधून आणखी नव्या सुविधा ग्राहकांना मिळण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली.
भारत आणि अमेरिकेदरम्यान प्रवास करणाऱ्या ग्राहकांना जिओ आणि टी-मोबाईलच्या या 5G स्टँडअलोन रोमिंग कनेक्शनचा थेट फायदा होणार आहे. दोन्ही कंपन्यांचे हे रोमिंग कनेक्शन शक्य करण्यासाठी सिनिव्हर्स (Syniverse) या प्लॅटफॉर्मने महत्त्वाची भूमिका बजावली, आणि जिओ व टी-मोबाईल यांची नेटवर्क्स सुरक्षितपणे एकमेकांशी जोडण्यास मदत केली. दोन देशांच्या दोन वेगवेगळ्या टेलिकॉम कंपन्यांची नेटवर्क्स अशा पद्धतीने सुरक्षितपणे जोडली जाणं ही तांत्रिकदृष्ट्या मोठी बाब मानली जात आहे.