जिओचा Rs 51 चा ॲड-ऑन प्लॅन, बेस पॅकसोबत मिळणार अनलिमिटेड 5G डेटा
रिलायन्स जिओने प्रीपेड युजर्ससाठी Rs 51 चा डेटा बूस्टर ॲड-ऑन आणला असून त्यातून अनलिमिटेड 5G डेटा आणि आपत्कालीन वापरासाठी 3GB 4G डेटा मिळणार आहे.
देशातील सगळ्यात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओने प्रीपेड सिम युजर्ससाठी Rs 51 चा एक नवीन 5G प्लॅन आणला आहे. कमी पैशात कंपनीच्या 5G स्पीडचा अनुभव घ्यायचा असेल, तर हा प्लॅन युजर्सला आकर्षक वाटू शकतो. रिलायन्स जिओ आपल्या युजर्सला खेचण्यासाठी वेळोवेळी खिशाला परवडतील असे रिचार्ज प्लॅन्स लॉन्च करत असते.
शिक्षण असो, वर्क फ्रॉम होम असो किंवा मनोरंजन, आता हाय-स्पीड इंटरनेट ही गरज बनली आहे. याच गरजेला उत्तर म्हणून जिओने आपल्या 'ट्रू अनलिमिटेड अपग्रेड' पोर्टफोलिओत फक्त Rs 51 चा एक स्वस्त ॲड-ऑन पॅक जोडला आहे. महागडे मासिक रिचार्ज न करता रोज अनलिमिटेड 5G डेटा हवा असणाऱ्या युजर्सला हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी देणे, हा या प्लॅनमागचा मुख्य उद्देश आहे.
या Rs 51 च्या जिओ बूस्टर पॅकमधून युजर्सला अनलिमिटेड 5G हाय-स्पीड डेटा मिळतो. याशिवाय, समजा कधी तुम्ही 4G नेटवर्क असलेल्या भागात गेलात, तर इमर्जन्सी वापरासाठी 3GB जास्तीचा 4G डेटाही यात दिला जातो. हे 3GB 4G डेटा संपल्यावर मात्र इंटरनेटचा स्पीड 64Kbps पर्यंत कमी होतो. महत्त्वाचं म्हणजे या Rs 51 च्या पॅकला स्वतःची वेगळी व्हॅलिडिटी नाही; तुमच्या अॅक्टिव्ह बेस प्लॅनची जितकी व्हॅलिडिटी उरलेली असेल, तितकीच या पॅकचीही असते.
हा प्लॅन सगळ्या जिओ युजर्ससाठी नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. Rs 51 चा हा प्लॅन स्वतंत्र रिचार्ज नसून एक डेटा बूस्टर ॲड-ऑन आहे. हा फायदा फक्त अशाच प्रीपेड युजर्सला मिळतो, ज्यांच्या नंबरवर आधीच एक महिन्यापर्यंतच्या व्हॅलिडिटीचा आणि रोज 1.5GB डेटा असलेला बेस प्लॅन सुरू आहे.
ज्या युजर्सकडे रोज 2GB किंवा त्याहून जास्त डेटा असलेले एलिजिबल प्लॅन्स आधीपासून आहेत, त्यांना कुठलंही जास्तीचं शुल्क न भरता आधीच अनलिमिटेड 5G मिळत असतं. शिवाय ही सुविधा वापरण्यासाठी युजरकडे 5G स्मार्टफोन असणं आणि तो जिओच्या 5G कव्हरेज एरियात असणं गरजेचं आहे.
आपला भाग जिओच्या ट्रू 5G नेटवर्कमध्ये येतो की नाही, हे तपासण्यासाठी MyJio ॲपचा वापर करावा लागतो. ॲप ओपन करून मोबाईल सेक्शनमध्ये 'ट्रू 5G' या पर्यायावर टॅप करायचं. 'चेक 5G रेडीनेस' हा पर्याय तुमचं डिव्हाईस आणि परिसरातलं कव्हरेज लगेच स्कॅन करतो. जर तुमचा 5G फोन सपोर्टेड असेल आणि रोज 1.5GB डेटा असलेला अॅक्टिव्ह मंथली पॅक तुमच्याकडे असेल, तर Rs 51 चा रिचार्ज करून एका महिन्यासाठी अनलिमिटेड 5G सेवा लगेच सुरू करता येते.