तरुण वयातच घर घेण्याकडे कल, कोटकच्या कर्जदारांत जेन झेडचा वाटा 6 वरून 9 टक्क्यांवर
कोटक महिंद्रा बँकेच्या आकडेवारीनुसार भारतात 25 ते 30 वयोगटातील गृहकर्जदारांची संख्या दोन वर्षांत 86 टक्क्यांनी वाढली असून, पहिलं घर खरेदी करणाऱ्यांचं वय आता आधीपेक्षा खूप कमी झालं आहे.
भाड्याच्या घरात दीर्घकाळ राहणारी पिढी म्हणून ओळखली जाणारी जेन झेड आता वयाची तिशी गाठण्याआधीच स्वतःचं घर घेऊ लागली आहे. कोटक महिंद्रा बँकेच्या आकडेवारीतून हे स्पष्ट झालं आहे. या आकडेवारीनुसार भारतात पहिलं घर घेणाऱ्यांचं वय दिवसागणिक कमी होत असून, गृहकर्ज बाजारात जेन झेड हा सर्वात वेगाने वाढणारा गट ठरतो आहे.
आर्थिक वर्ष 2024 ते 2026 या दोन वर्षांत 25 ते 30 वयोगटातील गृहकर्जदारांची संख्या 1,234 वरून 2,290 पर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच यात 86 टक्क्यांची वाढ झाली आहे. कोटकच्या एकूण वैयक्तिक गृहकर्ज ग्राहकांमध्ये जेन झेडचा वाटाही याच काळात 6 टक्क्यांवरून 9 टक्क्यांवर गेला, म्हणजेच या सहभागात 50 टक्के वाढ नोंदवली गेली. त्यामुळे बँकेच्या होम लोन बुकमध्ये सर्वात वेगाने वाढणारा तरुण ग्राहक वर्ग म्हणून जेन झेड पुढे आला आहे. याउलट, 30 ते 45 वयोगटातील गृहकर्जदारांची संख्या याच कालावधीत फक्त 26 टक्क्यांनी वाढली.
या आकडेवारीवरून भारतातील तरुणांचा घरमालक होण्याकडचा दृष्टिकोन बदलत असल्याचं दिसतं. आधीच्या पिढ्या आयुष्याच्या उत्तरार्धात जो टप्पा गाठत होत्या, तो आता खूप लवकर गाठला जातो आहे. वर्षानुवर्षे असा समज होता की जेन झेड दीर्घकाळ भाड्याच्या घरात राहील, मोठ्या आर्थिक जबाबदाऱ्यांपासून दूर राहील आणि स्थिरतेपेक्षा लवचिकतेला जास्त महत्त्व देईल. पण आकडेवारी उलट चित्र दाखवते. घराचा विषय आला की भारतातील अनेक तरुण अपेक्षेपेक्षा खूप आधीच मोठे आणि दीर्घकालीन निर्णय घेताना दिसतात.
कोटक महिंद्रा बँकेच्या गृहकर्ज विभागाचे प्रमुख नकुल सक्सेना यांनी सांगितलं की, भारतीय कुटुंबांमध्ये स्वतःच्या घराला आजही खास स्थान आहे. घर घेण्याचा निर्णय घेणाऱ्यांचं वय आता बदलत असून, तरुण कर्जदार पूर्वीपेक्षा जास्त स्पष्टता आणि आत्मविश्वासाने बाजारात उतरत आहेत, असं ते म्हणाले.
अनेक कुटुंबांत आई-वडील ज्या वयात घरासाठी बचत करत होते, त्याच वयात आजचे तरुण प्रोफेशनल्स घर खरेदी करत आहेत. काही घरांत मुलं स्वतःच्या कमाईतून आई-वडिलांचं घराचं स्वप्न पूर्ण करत आहेत, तर काही ठिकाणी पती-पत्नी दोघांचीही कमाई असल्याने आधीच्या पिढ्यांनी वर्षानुवर्षे लांबणीवर टाकलेले निर्णय आता वेगाने घेतले जात आहेत.
कोरोना महामारीनेही घराबाबतच्या प्राधान्यक्रमांना नवा आकार दिला. घरात जास्त वेळ घालवावा लागल्याने अनेक तरुण कुटुंबांनी पुरेशी जागा, गोपनीयता, नैसर्गिक प्रकाश, बांधकामाचा दर्जा आणि कम्युनिटी लिव्हिंग यांना जास्त महत्त्व द्यायला सुरुवात केली. घर आता फक्त राहण्याची जागा न राहता जगणं, काम करणं आणि भविष्य घडवण्याचं ठिकाण बनलं आहे.
सक्सेना यांच्या मते, यात एक ठाम निश्चय दिसून येतो. पूर्ण स्थिरता येईपर्यंत वाट न पाहता तरुण खरेदीदार आयुष्याच्या सुरुवातीलाच आत्मविश्वासाने आपली स्वप्नं पूर्ण करत आहेत, आणि कोटक त्यांच्या या प्रवासात पाठबळ देत असल्याचा अभिमान असल्याचं ते म्हणाले. यामुळे तरुण खरेदीदारांच्या घर घेण्याच्या पद्धतीतही बदल दिसतो. मोठं आणि कायमस्वरूपी घर घेण्याची वाट बघण्याऐवजी अनेकजण सध्याच्या बजेट आणि जीवनशैलीला अनुरूप घर घेत असून, पहिलं घर हे भविष्यातील आर्थिक प्रगतीची पहिली पायरी मानत आहेत.
कोटकच्या मते तरुण कर्जदारांमधली ही वाढ भारतातील गृहनिर्माण बाजारपेठेतील मोठ्या बदलाचं लक्षण आहे. स्वतःचं घर असणं ही आकांक्षा आजही तितकीच महत्त्वाची आहे, फक्त ती पूर्ण करण्याची पद्धत आणि वेळ आधीच्या पिढ्यांपेक्षा वेगळी झाली आहे.