जयपूरमध्ये एकाच जीपमध्ये कोंबून भरले प्रवासी, छतावर बसल्या महिला; व्हिडिओ व्हायरल
राजस्थानच्या जयपूरमध्ये एका जीपमध्ये क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त प्रवासी बसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
राजस्थानच्या जयपूरमध्ये एका जीपमधून चाललेल्या प्रवासाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच फिरतो आहे. त्या जीपमध्ये जणू अख्खं घराणंच बसलं होतं, असं दृश्य त्यात दिसतं. सुरक्षेचे नियम बाजूला ठेवून लोकांना एकाच जीपमध्ये कोंबून भरण्यात आलं होतं.
अनेकदा प्रवास करताना लोक आपला जीव टांगणीला लावून प्रवास करतात. असं दृश्य रेल्वे प्रवासात अधिक वेळा दिसतं, पण आता जीपमधल्या ओव्हरलोडिंगचा हा प्रकार सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. जीपमध्ये जागा उरली नाही, तेव्हा काही महिला जीपच्या छतावर बसून प्रवास करताना दिसल्या. एका जीपमध्ये २०-३० जण असा हा जीवघेणा प्रवास पाहून इंटरनेटवर अनेकांना धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जयपूरच्या फागी पोलीस स्टेशनपासून अवघ्या २०० मीटर अंतरावर घडली. दिवसाढवळ्या, पोलीस स्टेशनच्या जवळपासच हा जीवघेणा प्रवास सुरू असल्यामुळे आता प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
एका जीपमध्ये साधारणपणे ५ ते ७ प्रवासी आरामात बसू शकतात. मात्र व्हायरल व्हिडिओत ही संख्या ५ ते ६ पट जास्त दिसली. त्यामुळे व्हिडिओतली दृश्यं पाहून अनेकांना धक्का बसला.
नियमांचा मुद्दा बाजूला ठेवला, तरी इतक्या लोकांनी जबरदस्तीने जीपमध्ये कोंबून बसणं म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखं आहे. वाहनाचा वेग वाढताना किंवा अचानक वळण घेताना तोल गेला, तर छतावर आणि वाहनाच्या बाहेरच्या भागावर बसलेल्या प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो. विशेष म्हणजे, या धोकादायक प्रवासात पुरुषांसोबत महिला प्रवासीही सहभागी असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतं.
या घटनेचा व्हिडिओ @iAtulKrishan1 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यात १६ आसनी जीपमध्ये ५० हून अधिक प्रवासी असल्याचं म्हटलं आहे. प्रवासी आत खचाखच भरलेले दिसतात आणि अनेक महिला छतावर बसलेल्या होत्या, असंही त्यात म्हटलं आहे. हे दृश्य फागी पोलीस स्टेशनपासून सुमारे २०० मीटर अंतरावरचं असल्याचंही सांगितलं गेलं आहे.
व्हिडिओवर अनेक यूजर्सनी कमेंट करून या जीवघेण्या प्रवासावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका यूजरने म्हटलं, "वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाकडून कर्तव्यात गंभीर हलगर्जीपणा". दुसऱ्या यूजरने लिहिलं, "१० जणांच्या सीटवर ४० लोकांचा प्रवास खरंच जीवघेणा आहे". आणखी एका यूजरने लिहिलं, "इतक्या लोकांनी एकाच जीपमध्ये प्रवास करण्याऐवजी त्यांनी दुसरी जीप करायला हवी होती".
ही माहिती सोशल मीडियावर शेअर झालेल्या पोस्ट आणि व्हिडिओवर आधारित आहे.