सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 08:42 IST

जपानच्या 'प्रेसिडेंट' मॅगझिनमध्ये आनंद कुमार आणि त्यांच्या सुपर इन्फिनिटीचा दोन भागांत लेख

सुपर ३० चे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आणि सुपर इन्फिनिटी या डिजिटल उपक्रमावर जपानच्या मॅगझिनने लिहिले आहे.

जपानच्या 'प्रेसिडेंट' मॅगझिनमध्ये आनंद कुमार आणि त्यांच्या सुपर इन्फिनिटीचा दोन भागांत लेख छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

गणित म्हटले की अनेक मुलांना भीती वाटते. पण तोच विषय सोप्या पद्धतीने समजावून सांगितला तर मुलांसाठी मजेदार होऊ शकतो, या विचाराने सुपर ३० चे संस्थापक आनंद कुमार सध्या काम करत आहेत. त्यांच्या सुपर इन्फिनिटी या डिजिटल उपक्रमाची चर्चा आता जपानच्या प्रसिद्ध 'PRESIDENT' मॅगझिनमध्ये होत आहे. या मॅगझिनने हा उपक्रम फक्त ऑनलाइन अभ्यासाचे माध्यम नसून जगभरातील मुलांना गणिताशी जोडणारा उपक्रम आहे, असे म्हटले आहे.

जपानच्या या प्रतिष्ठित मॅगझिनने आनंद कुमार यांचे जीवन आणि त्यांचा शिक्षणाशी संबंधित उपक्रम यावर दोन भागांत लेख प्रकाशित केला आहे. पैशांच्या अभावामुळे ज्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही, अशा एका मुलाने आपल्या मेहनतीने हजारो मुलांचे आयुष्य कसे बदलले, हे यात सांगितले आहे. मॅगझिननुसार, आनंद कुमार यांचा उद्देश मुलांना नुसते गणित शिकवणे एवढाच नाही. मुलांमध्ये विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची आणि समजून घेऊन उत्तरे शोधण्याची सवय लावणे हाही त्यांचा हेतू आहे.

आनंद कुमार यांचा जन्म १ जानेवारी १९७३ रोजी बिहारची राजधानी पटना येथे झाला. त्यांचे वडील राजेंद्र प्रसाद टपाल खात्यात (डाक विभाग) क्लर्क होते. घरची आर्थिक स्थिती चांगली नव्हती, पण शिक्षण हेच आयुष्य बदलण्याचे सर्वात मोठे साधन आहे, असे त्यांचे वडील मानत होते.

आनंद यांना लहानपणापासून गणिताची मोठी आवड होती. या प्रतिभेमुळे त्यांना पुढे जाण्याची स्वप्ने पडली, पण पैशांच्या कमतरतेमुळे कॅम्ब्रिज विद्यापीठात शिकण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही. तरीही या अडचणीमुळे ते आपल्या ध्येयापासून मागे हटले नाहीत. आपले ज्ञान आणि शिकवण्याची पद्धत त्यांनी इतर मुलांना पुढे नेण्यासाठी वापरली.

पटना येथे त्यांचे बालपण अगदी साध्या परिस्थितीत गेले. त्यांचे कुटुंब रेल्वे लाईन्सजवळच्या एका छोट्या घरात राहत होते आणि आजूबाजूला सतत गाड्यांचा आवाज येत असे. तरीही आनंद अभ्यासात मग्न राहायचे. कठीण परिस्थितीतही त्यांचे लक्ष गणितावरच असे आणि हीच निष्ठा पुढे त्यांची ओळख बनली.

देशपातळीवर आनंद कुमार यांना ओळख मिळाली ती त्यांच्या 'सुपर ३०' या कार्यक्रमामुळे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील होतकरू मुलांना त्यांनी आयआयटीच्या प्रवेश परीक्षेची, म्हणजेच 'JEE' ची तयारी करण्यात मदत केली. आयआयटीत प्रवेश मिळवणे हे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न असते, पण चांगल्या कोचिंगची फी अनेक कुटुंबांसाठी मोठी डोकेदुखी ठरते. ज्यांच्याकडे साधने कमी होती पण पुढे जाण्याची जिद्द होती, अशा मुलांना 'सुपर ३०' मधून शिक्षणाची संधी मिळाली.

जपानी मॅगझिनने या उपक्रमाचे कौतुक केले आहे. जपानमधील वाचकांना आयआयटीचे महत्त्व कळावे म्हणून लेखात त्याची तुलना 'टोकियो युनिव्हर्सिटी'शी करण्यात आली आहे. अशा रीतीने आनंद कुमार यांचे काम भारताबाहेरच्या वाचकांपर्यंत पोहोचले आहे.

कठीण प्रश्न सोपे करण्यासाठी आनंद कुमार गोष्टी आणि काल्पनिक पात्रांची मदत घेतात, हे त्यांच्या शिकवण्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. 'भोलू' आणि 'रिकी' ही त्यांची पात्रे मुलांना गणित समजायला मदत करतात. त्यामुळे मुले उत्तर नुसते पाठ करत नाहीत, तर त्यामागचे लॉजिक समजून घ्यायचा प्रयत्न करतात. त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि कठीण प्रश्नांना घाबरण्याऐवजी ते सोडवायचा प्रयत्न करतात. ज्या मुलांना गणित अवघड वाटते किंवा अभ्यासासाठी पुरेशी साधने मिळत नाहीत, त्यांच्यासाठी हा मार्ग फार उपयोगी ठरू शकतो.

आनंद कुमार यांच्या 'सुपर इन्फिनिटी' या डिजिटल उपक्रमाचा उद्देश ही पद्धत जास्तीत जास्त मुलांपर्यंत नेणे हा आहे. मोफत डिजिटल शिक्षणाच्या मदतीने गणित सोपे आणि रंजक करण्याचा प्रयत्न यातून केला जात आहे. मॅगझिनने या उपक्रमातील शैक्षणिक व्हिडिओ जपानी भाषेतही उपलब्ध करून देण्याच्या योजनेचा उल्लेख केला आहे. त्यामुळे जपानमधील मुलांनाही आपल्या भाषेत हे व्हिडिओ पाहून शिकण्याची संधी मिळू शकते.

ऑनलाइन माध्यमामुळे चांगले कोचिंग किंवा अनुभवी शिक्षक ज्यांना सहज मिळत नाहीत, अशा मुलांपर्यंतही शिक्षण पोहोचू शकते, हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे. मात्र त्याचा खरा परिणाम किती दिसेल, हे मुलांना या साधनांचा किती फायदा होतो यावर अवलंबून राहील.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ