सोमवार, 19 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
07:40 IST

जामिनावर सुटका होताच अभिजीत दिपके यांची शाहरुख खान यांच्या फोटोसह पोस्ट, दोन 'भावां'च्या सुटकेची प्रतीक्षा

'लहरा दो तिरंगा' मोर्चापूर्वी दिल्लीत ताब्यात घेतलेले कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना जामीन मिळाला आहे. बाहेर आल्यावर त्यांनी सोशल मीडियावर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत.

जामिनावर सुटका होताच अभिजीत दिपके यांची शाहरुख खान यांच्या फोटोसह पोस्ट, दोन 'भावां'च्या सुटकेची प्रतीक्षा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांची जामिनावर सुटका झाली आहे. 'लहरा दो तिरंगा' मोर्चापूर्वी दिल्लीतील कॅनॉट प्लेस परिसरातून त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर जामीन मंजूर झाला. जामीन देताना विशेष दंडाधिकारी न्यायालयाने दिपके यांच्यासमोर काही अटी ठेवल्या.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दिपके यांनी सोशल मीडियावर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. सध्या या पोस्टची चर्चा सुरू आहे.

शुक्रवारी कॅनॉट प्लेस परिसरात 'लहरा दो तिरंगा' आंदोलन आयोजित करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके यांना आंदोलन न करण्याबाबत नोटीस दिली होती. तरीही ते आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले, म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम 126 आणि 170 अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतर दिपके यांना मंदिर मार्ग पोलीस ठाण्याशी संबंधित विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या सुनावणीनंतर त्यांना जामीन देण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, जामिनासाठी त्यांना शांतता राखण्यासंदर्भातील बाँडवर सही करावी लागली. त्यात सुमारे वर्षभर शांतता राखण्याची अट असल्याचे सांगितले जात आहे.

जामिनावर सुटका झाल्यानंतर दिपके यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पहिली पोस्ट टाकली. "२४ तास वायफाय आणि फोनशिवाय तुरुंगातून बाहेर पडताना कसे वाटते," अशा आशयाचा मजकूर लिहून त्यांनी अभिनेता शाहरुख खान यांचा फोटो शेअर केला. या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केलेली ही पोस्ट त्यांचे समर्थक आणि सोशल मीडिया वापरणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

दुसऱ्या पोस्टमध्ये दिपके यांनी सौरभ दास आणि आशुतोष रांका यांचा फोटो शेअर केला. या दोघांचा उल्लेख त्यांनी 'माझे दोन भाऊ' असा केला असून, त्यांच्या सुटकेची प्रतीक्षा करत असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.

दिपके यांना जामीन मिळाला असला, तरी सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या सुटकेबाबत पुढे काय होते, याकडे लक्ष लागले आहे.

'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी झालेली कारवाई आणि त्यानंतर दिपके यांनी केलेल्या पोस्ट यांमुळे कॉक्रोच जनता पार्टीच्या पुढील भूमिकेबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. दिपके यांच्या जामिनाच्या अटी, दास आणि रांका यांच्या सुटकेची स्थिती आणि पक्षाकडून पुढील आंदोलनाची घोषणा होते का, याकडे सगळ्यांचे लक्ष राहणार आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ