जालन्यात भेसळयुक्त मसाले आणि नमकीनवर FDA ची कारवाई, 6,60,600 रुपयांचा साठा जप्त
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या 'Safe Food Safe Maharashtra' मोहिमेत जालना, सावरगाव हडप आणि अंबड येथील तीन उत्पादन केंद्रांवर छापे टाकण्यात आले.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) 'Safe Food Safe Maharashtra' ही विशेष मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत जालन्यातील मसाले आणि नमकीन (फरसाण) उत्पादकांवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल 6,60,600 रुपयांचा निकृष्ट व भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आला आहे.
उत्पादन अस्वच्छ वातावरणात होत असल्याचा आणि पदार्थांचा दर्जा निकृष्ट असल्याचा संशय आल्याने प्रशासनाने ही कारवाई केली. प्रशासनाच्या पथकाने जालन्यातील तीन मुख्य उत्पादन केंद्रांवर अचानक छापे टाकले आणि तिन्ही ठिकाणी माल जप्त केला.
पहिला छापा जालना तालुक्यातील सावरगाव हडप येथील मे. अधिराज स्पाईसेस फुड्स या मसाला निर्मिती केंद्रावर पडला. तिथून 360 किलो मिरची पावडर जप्त झाली, तिची किंमत 2,23,200 रुपये आहे. तसेच 100 किलो धणे पावडर जप्त झाली, तिची किंमत 39,000 रुपये आहे. या केंद्रावरून एकूण 2,62,200 रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
दुसरी कारवाई जालना औद्योगिक वसाहतीतील (MIDC) मे. के. एम. के. मसाले या केंद्रात झाली. तपासणीदरम्यान तिथे निकृष्ट दर्जाचा साठा आढळला. त्यात 298 किलो हळद पावडर आणि 58 किलो धणे पावडर होती. येथून एकूण 1,33,700 रुपयांचा माल जप्त झाला.
तिसरी कारवाई अंबड येथील मे. सह्याद्री फूड्स या नमकीन आणि फरसाण उत्पादकावर झाली. तिथे मोठा साठा हस्तगत करण्यात आला. त्यात 328 किलो शेव, 278 किलो लसूण चिवडा, 463 किलो मिक्स फरसाण आणि 206 पॅकेट (103 किलो) नमकीन होते. या ठिकाणी एकूण 2,64,700 रुपयांचा माल जप्त झाला.
अन्न सुरक्षा अधिकारी अ. ए. तांबे, अनुजा नगरारे आणि विनोद ओसावार यांच्या पथकाने ही धाड टाकली. अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त एस. आर. करकाळे आणि सहायक आयुक्त निखिल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण मोहीम पार पडली.
सणासुदीच्या काळात लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. सार्वजनिक आरोग्य आणि ग्राहकांच्या हितासाठी सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा कायद्याचे नियमानुसार काटेकोर पालन करावे, असे आवाहनही अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.
नियम मोडणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर कायदेशीर खटले दाखल केले जातील, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.