भारतीय EV बाईक कंपनीची ग्लोबल झेप, अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक
अल्ट्राव्हायोलेटने 85 दशलक्ष डॉलरचा नवा फंडिंग राऊंड उभा केला असून इंटेलचे CEO लिप-बू टॅन यांनी यात वैयक्तिक गुंतवणूक केली आहे. कंपनी आता अमेरिकेसह जागतिक बाजारपेठेत विस्ताराच्या तयारीत आहे.
भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी अल्ट्राव्हायोलेटने जागतिक पातळीवर विस्तार करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. कंपनीने 85 दशलक्ष डॉलर इतकी नवीन गुंतवणूक उभी केली असून, या फंडिंग राऊंडमध्ये इंटेलचे CEO लिप-बू टॅन यांनी स्वतः वैयक्तिक गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे टॅन आता फक्त गुंतवणूकदार म्हणून राहणार नाहीत, तर कंपनीत सल्लागार म्हणूनही जबाबदारी सांभाळणार आहेत. एका मोठ्या जागतिक टेक्नोलॉजी कंपनीच्या CEOने अशा प्रकारे भारतीय EV स्टार्टअपमध्ये थेट सहभाग घेणे ही या क्षेत्रासाठी लक्षवेधी घडामोड मानली जात आहे.
हे नवीन भांडवल तीन गोष्टींसाठी वापरले जाणार आहे. पहिले म्हणजे सध्याच्या उत्पादनांची प्रोडक्शन क्षमता वाढवणे, दुसरे म्हणजे नवीन इलेक्ट्रिक वाहन प्लॅटफॉर्म तयार करणे आणि तिसरे म्हणजे परदेशातील बाजारपेठांमध्ये विस्तार करणे. सध्या अल्ट्राव्हायोलेट भारतासोबत 20 युरोपीय देशांमध्ये उपस्थित आहे, म्हणजेच कंपनीचे प्रॉडक्ट्स आधीच युरोपातील बाजारपेठेत उपलब्ध आहेत. यापुढचे कंपनीचे लक्ष्य 2027 मध्ये अमेरिकन मार्केटमध्ये पाऊल ठेवण्याचे आहे, आणि त्यानंतर लॅटिन अमेरिका व दक्षिण-पूर्व आशियातील देशांतही विस्तार करण्याची कंपनीची तयारी आहे.
अल्ट्राव्हायोलेटकडे सध्या F77 आणि X-47 या दोन इलेक्ट्रिक मोटरसायकली आहेत, आणि याच दोन मॉडेल्सवर कंपनीचा सध्याचा व्यवसाय उभा आहे. नव्या गुंतवणुकीमुळे या दोन्ही मॉडेल्सचे उत्पादन वाढणार असून, त्याचबरोबर Tesseract या इलेक्ट्रिक स्कूटरच्या आणि Shockwave या एंड्युरो मोटरसायकलच्या विकासालाही वेग मिळणार आहे. इन्वेस्टरसकडून सांगण्यात आले की Tesseractचे लॉन्चिंग 2027च्या सुरुवातीला होण्याचे लक्ष्य आहे.
ही कंपनी बॅटरी आर्किटेक्चर, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, वाहन प्लॅटफॉर्म आणि सॉफ्टवेअर या सर्व टेक्नोलॉजी बाहेरून विकत न घेता स्वतःच्या ताकदीवर विकसित करते, हे तिचे वेगळेपण आहे. कंपनीची तांत्रिक क्षमता 48V ते 400V पर्यंतच्या बॅटरी आर्किटेक्चरला सपोर्ट करते, म्हणजे लहान ते मोठ्या क्षमतेच्या वाहनांसाठी ही टेक्नोलॉजी वापरता येते. X-47 या मॉडेलमध्ये रडारवर आधारित सेफ्टी टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे, जी सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची बाब मानली जाते.
उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी कंपनीने तामिळनाडूतील होसूर इथे नवीन प्लांट उभारण्याची योजना आखली आहे. या प्रकल्पासाठी अल्ट्राव्हायोलेट सुमारे 779 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. पूर्ण विस्तार झाल्यानंतर वार्षिक उत्पादन क्षमता 5 लाख युनिट्सपर्यंत नेण्याचे कंपनीचे नियोजन आहे. यामुळे प्रीमियम इलेक्ट्रिक मोटरसायकलींसोबतच मोठ्या ग्राहकवर्गासाठी उत्पादने तयार करणे कंपनीला शक्य होणार आहे, म्हणजेच फक्त उच्चभ्रू ग्राहकांपुरता मर्यादित न राहता व्यापक बाजारपेठ काबीज करण्याची कंपनीची योजना आहे.
इंटेलच्या CEOचा या गुंतवणुकीतील सहभाग आणि मोठा निधी उभारल्यानंतर अल्ट्राव्हायोलेट आता केवळ भारतीय EV कंपनी न राहता जागतिक पातळीवर स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पुढच्या टप्प्यात प्रोडक्शन वाढवणे, नवीन मॉडेल्स आणणे आणि निर्यात करणे या तिन्ही आघाड्यांवरची कामगिरी कंपनीसाठी महत्त्वाची ठरणार आहे.