सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक, अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम
सन मराठी वाहिनीवरील इन्स्पेक्टर मंजू या मालिकेत सत्या आणि मंजूच्या लग्नाचा भाग २७ सप्टेंबरला प्रसारित होणार असून, या लग्नाच्या अंतरपाटावर साताऱ्यातील वृद्धाश्रमातील ज्येष्ठांच्या हातांचे ठसे उमटवण्यात आले आहेत.
सन मराठी या वाहिनीवर सुरू असलेल्या इन्स्पेक्टर मंजू या लोकप्रिय मालिकेत आता सत्या आणि मंजू यांच्या लग्नाची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील सगळ्या वयोगटातील प्रेक्षकांचं या जोडीवर भरभरून प्रेम असून, त्यांच्या लग्नाबद्दल चाहत्यांमध्ये आधीपासूनच उत्सुकता होती. प्रेक्षकांच्या याच प्रेमाची खास आठवण या लग्नसोहळ्यात जपली जाणार आहे. हा लग्नसोहळा येत्या २७ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता आणि रात्री ८ वाजता प्रसारित होणार आहे.
या लग्नातलं सगळ्यात खास वैशिष्ट्य म्हणजे अंतरपाट. साताऱ्यातील समता वृद्धाश्रमातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या हातांचे ठसे या अंतरपाटावर आशीर्वाद म्हणून उमटवण्यात आले आहेत. त्यामुळे या सोहळ्याला केवळ प्रेक्षकांचं प्रेमच नाही, तर ज्येष्ठांचे आशीर्वादही लाभणार आहेत. आपल्या लाडक्या सत्या-मंजूला आशीर्वाद देताना या वृद्धांनीही त्यांच्याबद्दलचं प्रेम व्यक्त केलं.
सत्याची भूमिका साकारणारा अभिनेता वैभव कदम यानं याबद्दल बोलताना सांगितलं, "महाराष्ट्रातून सत्या-मंजू या जोडीला मिळणारं प्रेम खरंच अभूतपूर्व आहे. विशेष म्हणजे आमच्या मालिकेवर आणि या दोन्ही पात्रांवर ज्येष्ठ प्रेक्षकांचं खूप प्रेम आहे. एक कलाकार म्हणून हे प्रेम प्रत्यक्ष अनुभवताना मन भरून येतं. सत्या आणि मंजूचं लग्न धूमधडाक्यात व्हावं, त्यांनी एकत्र यावं, अशी आमच्या चाहत्यांची खूप दिवसांपासूनची इच्छा होती. त्यामुळे त्यांच्या प्रेमाखातर हे लग्न एका खास पद्धतीनं पार पडत आहे."
वैभव कदम पुढे म्हणाला की, "या लग्नातली सगळ्यात खास गोष्ट म्हणजे आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या हातांचे ठसे या लग्नाच्या अंतरपाटावर असणार आहेत. आमच्यासाठी हे फक्त हातांचे ठसे नसून आमच्या जोडीला आणि संपूर्ण टीमला मिळालेला आशीर्वाद आहे. पडद्यावर सत्या-मंजूचं लग्न होत असलं तरी या लग्नात आमच्या प्रेक्षकांचाही एक सुंदर सहभाग आहे, ही भावना खूप खास आहे."
तो पुढे म्हणाला की, लग्नातले त्यांचे लुक्सही आकर्षक असणार आहेत. या मालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच नवरी लेहेंगा घालून लग्नाच्या मंडपात दिसणार आहे, असंही त्यानं सांगितलं. सत्या-मंजूची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांसाठी आणि संपूर्ण टीमसाठी हा लग्नसोहळा खास आठवण ठरणार आहे, कारण त्यात प्रेक्षकांचाही थेट सहभाग समाविष्ट करण्यात आला आहे. अंतरपाटावरचे हे हातांचे ठसे आणि ज्येष्ठांचं आशीर्वाद यामुळे या भागाला वेगळाच भावनिक रंग येणार असल्याचं टीमकडून सांगण्यात आलं. साताऱ्यातील समता वृद्धाश्रमातील या ज्येष्ठांचा सहभाग या लग्नसोहळ्याला अधिक अर्थपूर्ण बनवत असून, चाहत्यांसाठी हा भाग विशेष उत्सुकतेचा विषय ठरला आहे.