आयटीआर आणि टॅक्स ऑडिटच्या मुदतीत वाढ, करदात्यांना मोठा दिलासा
CBDT ने असेसमेंट इयर 2026-27 साठी टॅक्स ऑडिट रिपोर्ट आणि आयटीआर भरण्याची अंतिम तारीख पुढे ढकलली आहे.
करदाते आणि सीए यांच्यासाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) असेसमेंट इयर 2026-27 साठी इन्कम टॅक्स ऑडिट रिपोर्ट सादर करण्याची आणि आयटीआर भरण्याची अंतिम मुदत अधिकृतपणे वाढवली आहे. याबाबतची माहिती CBDT ने स्वतःच्या सोशल मीडिया पोस्टमधून दिली आहे.
प्राप्तिकर कायदा 1961 च्या कलम 139(1) मधील कलम 2 अंतर्गत ज्या करदात्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे बंधनकारक आहे, अशा सगळ्यांना ही मुदतवाढ लागू होणार आहे.
टॅक्स ऑडिट लागू असलेल्या करदात्यांसाठी आयटीआर भरण्याची अंतिम तारीख आधी 31 ऑक्टोबर 2026 होती. आता ती वाढवून 21 नोव्हेंबर 2026 करण्यात आली आहे. म्हणजे करदात्यांना आयटीआर भरण्यासाठी 21 दिवस जास्तीचा वेळ मिळाला आहे.
टॅक्स ऑडिट रिपोर्ट सादर करण्याची 'निर्दिष्ट तारीख' आधी 30 सप्टेंबर 2026 होती, ती आता 21 ऑक्टोबर 2026 करण्यात आली आहे.
ही मुदतवाढ प्रामुख्याने अशा कंपन्या आणि इतर करदात्यांना लागू होते, ज्यांच्या खात्यांचे इनकम टॅक्स अॅक्ट किंवा इतर लागू कायद्यानुसार ऑडिट करणे गरजेचे आहे. यात नॉन-कंपनी करदाते ज्यांना ऑडिट लागू आहे, ऑडिट झालेल्या फर्ममधले कार्यरत भागीदार आणि ज्या ट्रस्टमध्ये कायद्यानुसार खात्यांचे ऑडिट आवश्यक आहे, अशा सगळ्यांसाठी आयटीआरची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर 2026 पर्यंत वाढवली आहे.
मात्र ट्रान्सफर प्रायसिंगशी संबंधित प्रकरणांना ही मुदतवाढ लागू नाही. अशा केसमध्ये आयटीआर भरण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2026 हीच राहणार आहे. फॉर्म 3CEB भरण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2026 असून त्यातही कुठलीही वाढ केलेली नाही.
अनेक टॅक्स ऑडिटची कामं अजून सुरू होती, बऱ्याच कंपन्यांची खाती पूर्ण तयार झालेली नव्हती आणि ऑडिटरना लागणारी माहिती देण्याचं कामही बाकी होतं. अशा वेळी मिळालेली ही अतिरिक्त मुदत उपयोगी पडणार आहे. मात्र ही मुदतवाढ शेवटच्या दिवसापर्यंत काम पुढे ढकलण्यासाठी वापरू नये असं सांगण्यात येतं, कारण कराची देयता आधीच निश्चित असेल तर कर लवकर भरणं योग्य ठरतं. उशीर झाल्यास व्याज लागू शकतं.
देशभरातल्या अनेक चार्टर्ड अकाउंटंटसाठी ही मुदतवाढ दिलासादायक आहे, कारण गेल्या काही दिवसांत इन्कम टॅक्स ई-फायलिंग पोर्टल आणि ICAI UDIN पोर्टलवर सातत्याने तांत्रिक अडचणी येत होत्या.
प्रत्येक करदात्याला टॅक्स ऑडिट करावं लागत नाही. ज्यांना कायद्यानुसार टॅक्स ऑडिट लागू आहे, त्यांनाच सीएकडून ऑडिट करून घ्यावं लागतं. सीएने ऑडिट पूर्ण केल्यावर टॅक्स ऑडिट रिपोर्ट तयार करून तो इन्कम टॅक्स ई-फायलिंग पोर्टलवर अपलोड करतो.
21 नोव्हेंबर 2026 पर्यंत आयटीआर भरणाऱ्या करदात्यांचा तो ITR वेळेत भरलेला मानला जाईल. त्यामुळे बिझनेस लॉस आणि कॅपिटल लॉस पुढे कॅरी फॉरवर्ड करण्याचा अधिकार, तसेच वेळेत आयटीआर भरण्यावर अवलंबून असलेल्या काही डिडक्शनचा दावा करण्याची पात्रता कायम राहू शकते.