Hyundai Bayon ऑक्टोबरमध्ये भारतात लाँच होणार, पॅनोरॅमिक सनरूफसह फीचर्सची रेलचेल
ह्युंदाईची नवी कॉम्पॅक्ट SUV Bayon लवकरच भारतात दाखल होणार असून प्री-बुकिंग सुरू झाले आहे.
ह्युंदाईने पुन्हा एकदा जोरदार एंट्री करण्याची तयारी केली आहे. कंपनीची नवी कॉम्पॅक्ट SUV Bayon लवकरच भारतीय बाजारात येणार असून ऑक्टोबर 2026 मध्ये तिचं लाँचिंग होईल. सगळ्या डीलरकडे या गाडीचं प्री-बुकिंग आधीच सुरू झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून गाडीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ही गाडी 4.2 मीटर लांब असून दिसायला प्रीमियम आणि फीचर्सने ठासून भरलेली आहे.
लूकबद्दल बोलायचं झालं तर कंपनीने Bayon ला एकदम फ्युचरिस्टिक स्टाईल दिली आहे. समोरून बघितलं की बोनटवर भारी कटिंग दिसते, आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे गाडीचे H-Edge LED DRLs. आजकाल बहुतेक गाड्यांमध्ये कनेक्टेड लाईट्स असतात, पण ह्युंदाईने यावेळी वेगळी डिझाईन आणली आहे, त्यामुळे रात्री रस्त्यावर ही गाडी लगेच ओळखू येईल. साईड प्रोफाईलमध्ये ड्युअल टोन मोठे अलॉय व्हील, जाड क्लॅडिंग आणि रूफ रेल्स दिले आहेत, ज्यामुळे गाडी दमदार आणि बोल्ड दिसते. मागच्या बाजूला H-Edge टेललाईट, मोठा स्पॉयलर आणि वर LED स्टॉप लॅम्प दिला आहे.
आत बसलं की जागेची अजिबात कमतरता जाणवत नाही. 4.2 मीटर लांबीमुळे लेगरूम आणि हेडरूम भरपूर मिळतं आणि पाच जण आरामात बसू शकतात. सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे यात दिलेला जनरेटिव्ह AI व्हॉईस असिस्टंट, ज्यामुळे तुम्ही गाडीशी थेट बोलू शकता आणि ती उत्तरही देते. यामुळे ही गाडी आता केवळ वाहन न राहता एक इंटेलिजेंट सिस्टीम बनली आहे.
फीचर्सची यादीही मोठी आहे. गाडीत पूर्ण छत उघडणारा मोठा पॅनोरॅमिक सनरूफ आहे. सीटला व्हेंटिलेशन दिलं असल्याने उन्हाळ्यात सीट तापणार नाही आणि थंड हवा मिळेल. सीट कव्हरही लेदरसारखं प्रीमियम आहे. पार्किंगसाठी 360 डिग्री कॅमेरा दिला आहे, तर पुढच्या दोन्ही सीट इलेक्ट्रिकली ऍडजस्ट होतात. यासोबतच ऑटोमॅटिक AC देखील उपलब्ध आहे.
इंजिनबाबत सांगायचं तर Bayon मध्ये 1.5 लिटरचं नैसर्गिक पेट्रोल इंजिन येणार असून मॅन्युअल आणि IVT ऑटोमॅटिक असे दोन्ही पर्याय मिळतील. सर्वात मोठी बाब म्हणजे कंपनी यात फॅक्टरी फिटेड CNG देखील देणार आहे. 4 मीटरपेक्षा मोठ्या SUV मध्ये मॅन्युअल गिअरबॉक्ससोबत फॅक्टरी फिटेड ड्युअल CNG किट देणारी ही ह्युंदाईची पहिलीच गाडी ठरणार आहे. विशेष म्हणजे CNG टाकी खाली बसवली असल्याने मागच्या डिक्कीची जागा कमी होणार नाही.
सेफ्टीच्या बाबतीतही कंपनीने तडजोड केलेली नाही. सगळ्या मॉडेल्समध्ये 6 एअरबॅग स्टँडर्ड असणार आहेत आणि ही गाडी ग्लोबल K एन्हान्स्ड प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. भारत NCAP च्या टेस्टमध्ये या गाडीला 5 स्टार रेटिंग मिळेल असा कंपनीचा दावा आहे. यासोबतच लेव्हल 2 ADAS प्रणालीही दिली जाणार आहे, ज्यामुळे गाडी स्वतःहून ब्रेक लावू शकते, लेनमध्ये राहू शकते आणि अपघात टाळण्यास मदत करते.
एकूणच लूक, फीचर्स, पेट्रोल-CNG असे दोन्ही पर्याय आणि 5 स्टार सेफ्टी बघता Bayon ही फॅमिलीसाठी परफेक्ट SUV ठरू शकते. ऑक्टोबरमध्ये लाँच झाल्यानंतर ही गाडी बाजारात चांगलीच चर्चेत राहील अशी अपेक्षा आहे.