होर्मुझमध्ये अडकलेल्या जहाजांमुळे जैविक धोका; मुंबई-सिंगापूर बंदरांना इशारा
महिनोनमहिने समुद्रात उभ्या असलेल्या जहाजांच्या तळाला चिकटलेले जीव आता जगभरातील बंदरांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.
मध्य पूर्वेत सुरू असलेला लष्करी संघर्ष आणि त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील (Strait of Hormuz) वाहतुकीला बसलेला फटका, या दोन्हीमुळे जागतिक जहाज वाहतूक क्षेत्र आधीच अडचणीत आहे. पण याच संकटाची एक वेगळी आणि आत्तापर्यंत फारशी चर्चेत न आलेली बाजू आता समोर येते आहे. पर्शियन आखात आणि ओमानच्या आखातात गेले कित्येक महिने एकाच जागी नांगर टाकून उभ्या असलेल्या शेकडो मोठमोठ्या मालवाहू जहाजांच्या तळाशी एक जैविक थर साचला आहे. याला बायोफॉलिंग (Biofouling) म्हणतात आणि हा थर आता जगभरातील समुद्री पर्यावरणासाठी आणि सागरी जीवांसाठी मोठा धोका बनू पाहतो आहे.
समुद्री जीवशास्त्रज्ञ सांगतात की उथळ आणि उबदार पाण्यात जहाज बराच काळ थांबून राहिलं की त्याच्या पृष्ठभागावर बार्नॅकल्स, रानटी शिंपले, शैवाल, सूक्ष्मजीव आणि विविध परजीवी झपाट्याने वाढू लागतात आणि तिथे स्वतःची वस्ती तयार करतात. आता हीच जहाजं जेव्हा पुन्हा प्रवासाला निघतील, तेव्हा एका भागातील आक्रमक आणि विनाशकारी प्रजाती ती आशिया आणि युरोपमधील बंदरांपर्यंत घेऊन जातील, असा इशारा आंतरराष्ट्रीय संशोधकांनी दिला आहे.
साधारणपणे मालवाहू जहाजं कुठल्याही बंदरात किंवा समुद्रात फार काळ थांबत नाहीत, त्यामुळे जीवांना तळाला चिकटून बसण्यासाठी पुरेसा वेळच मिळत नाही. पण सध्याच्या युद्धजन्य आणि तणावाच्या परिस्थितीमुळे हे चित्र पूर्ण बदललं आहे. गेल्या काही महिन्यांपासून १५०० हून अधिक मालवाहू जहाजं आणि तेलाचे टँकर एकाच ठिकाणी स्थिर उभे आहेत. वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार जहाज एकाच जागी १० दिवसांपेक्षा जास्त थांबलं की बायोफॉलिंगचा वेग खूप वाढतो. होर्मुझच्या या संकटात जहाजं नेहमीपेक्षा तब्बल ४० पट अधिक काळ थांबून आहेत, आणि इतक्या दीर्घ काळात जहाजांवरचं अँटी-फॉलिंग कोटिंग खराब होऊन शैवाल, सूक्ष्मजीव आणि परजीवींना अब्जावधींनी वाढण्याची मोकळीक मिळाली आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी ही कच्च्या तेलाच्या आणि जागतिक व्यापारी जहाजांच्या दृष्टीने अत्यंत मोक्याची वाट आहे आणि इथून जाणाऱ्या जहाजांचं जाळं जगभरातल्या शेकडो बंदरांशी जोडलेलं आहे. समुद्रातली ही कोंडी सुटल्यावर जहाजं वेगाने पुढे निघाली, की त्यांच्या तळाला चिकटलेल्या आक्रमक प्रजाती इतर देशांच्या जलसीमांत आणि बंदरांत शिरतील. शास्त्रज्ञांच्या मते याचा सर्वात मोठा फटका आशियाई आणि हिंदी महासागरातील बंदरांना बसू शकतो. विशेषतः मुंबई, कोलंबो आणि सिंगापूर या जगातील सर्वाधिक वर्दळीच्या बंदरांना परकीय आक्रमक जीवांचा सर्वाधिक धोका आहे. याशिवाय लाल समुद्र, भूमध्य समुद्र आणि युरोपातील अलेजसिरास व रोटरडॅम यांसारख्या बंदरांच्या सागरी परिसंस्थेवरही दीर्घकाळ याचा वाईट परिणाम दिसू शकतो.
या परकीय प्रजाती नव्या ठिकाणी पोहोचल्या की तिथल्या स्थानिक जीवांचं अस्तित्वच धोक्यात येतं. उदाहरणार्थ पर्शियन आखातातील एशियन ग्रीन मसेल किंवा ठराविक प्रकारचे बार्नॅकल्स नव्या बंदरात पोहोचले, की स्थानिक मासे आणि शिंपल्यांचं खाणं आणि राहण्याची जागा हिरावून घेतात. या जीवांची नव्या वातावरणात वेगाने वाढ झाली तर ते तिथल्या परिसंस्थेवर पूर्ण ताबा मिळवतात, त्यामुळे स्थानिक माशांच्या अनेक दुर्मिळ जाती नष्ट होऊ शकतात. शिवाय हे परजीवी आणि सूक्ष्मजंतू पसरल्याने स्थानिक मासेमारी व्यवसायाला आणि कोळंबी-शिंपल्यांच्या पालनालाही मोठा फटका बसू शकतो. अनेक ठिकाणी हे जीव वीजनिर्मिती प्रकल्प आणि पाण्याचं क्षार कमी करणाऱ्या प्लांटच्या पाईपलाईनमध्ये साचून मोठं नुकसान करतात. एकदा एखाद्या परिसंस्थेत असे जीव पाय रोवून बसले, की त्यांना हटवणं जवळपास अशक्य होतं.
त्यामुळे हे संकट आता फक्त तेलाचे भाव वाढणं किंवा व्यापारात उशीर होणं इतकंच मर्यादित राहिलेलं नाही, हे एक मोठं पर्यावरणीय संकट बनलं आहे. यावर उपाय म्हणून आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने (IMO) जहाजं रवाना होण्याआधी त्यांच्या तळाची योग्य स्वच्छता करणं बंधनकारक करण्याची गरज आहे. मात्र घाईत समुद्राच्या पाण्यातच जहाजाचा तळ साफ केला तर हे जीव थेट स्थानिक पाण्यात मिसळण्याचा धोका असतो, त्यामुळे शास्त्रोक्त पद्धतीनेच याची विल्हेवाट लावावी लागेल. मुंबईसह जगभरातील प्रमुख बंदरांनी आतापासूनच येणाऱ्या जहाजांचं जैविक सर्वेक्षण आणि बायो-सिक्युरिटी तपासणी अधिक कडक करण्याची गरज निर्माण झाली आहे.