चीनच्या Hongqi ची सोलर सनरूफ असलेली EHS7 कार, उन्हात छतावरच तयार होणार वीज
FAW Hongqi या चिनी कंपनीने Perovskite तंत्रज्ञानावर आधारित सोलर पॅनोरमिक सनरूफ विकसित केले असून त्याची चाचणी Hongqi EHS7 इलेक्ट्रिक SUV मध्ये झाली आहे.
इलेक्ट्रिक गाड्यांच्या दुनियेत सध्या बॅटरीची रेंज आणि चार्जिंगला लागणारा वेळ हे दोन मोठे प्रश्न आहेत. त्यावर उपाय शोधण्यासाठी चीनमधील प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी FAW Hongqi नव्या तंत्रज्ञानावर काम करत आहे. कंपनीने Perovskite तंत्रज्ञानावर आधारित सोलर पॅनोरमिक सनरूफ तयार केले असून त्याची चाचणी Hongqi EHS7 या इलेक्ट्रिक SUV मध्ये घेण्यात आली आहे. गाडीच्या छतावर बसवलेल्या या सोलर सिस्टममधून सूर्यप्रकाशाच्या मदतीने वीज तयार होणार आहे.
या सनरूफचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते उन्हात 300W पर्यंत रिअल टाइम वीज तयार करू शकते. कंपनीच्या माहितीनुसार या सिस्टममधून वर्षाला सुमारे 400 kWh वीज निर्माण होऊ शकते.
ही वीज गाडीतील काही इलेक्ट्रिक फीचर्स चालवण्यासाठी थेट वापरता येऊ शकते. उदाहरणार्थ, AC, मिनी फ्रिज आणि Sentry Mode सारखी सुरक्षा यंत्रणा चालवण्यासाठी मुख्य बॅटरीतील ऊर्जा वापरण्याची गरज कमी होऊ शकते. त्यामुळे गाडीची बॅटरी इतर महत्त्वाच्या कामांसाठी जास्त प्रमाणात शिल्लक राहू शकते.
आतापर्यंत गाड्यांमधील सोलर पॅनेलसाठी मुख्यत्वे सिलिकॉन तंत्रज्ञान वापरले जाते. Hongqi ने तयार केलेल्या या सोलर रूफमध्ये मात्र Perovskite मटेरियल वापरले आहे. हे मटेरियल तुलनेने पातळ, हलके आणि लवचिक असल्याने गाडीच्या वळणदार छतावर बसवणे सोपे जाते. पारंपरिक सोलर पॅनेलच्या तुलनेत गाडीच्या डिझाइनमध्ये मोठा बदल न करता सोलर सेल्स बसवण्याची शक्यता या तंत्रज्ञानामुळे तयार होते.
Hongqi च्या संशोधन पथकाने अतिनील किरणे, पाणी आणि वारा अशा बाहेरच्या घटकांपासून सोलर पॅनेलचे संरक्षण कसे करायचे, या आव्हानांवर काम केले आहे. या तंत्रज्ञानाचा प्रोटोटाइप Hongqi EHS7 या इलेक्ट्रिक SUV मध्ये बसवण्यात आला आहे. चीनमध्ये ही गाडी Tiangong 08 या नावानेही ओळखली जाते.
कंपनीची योजना फक्त छतावर सोलर पॅनेल बसवण्यापुरती नाही. पुढे हे तंत्रज्ञान बोनेटवर आणि गाडीच्या इतर भागांवरही बसवण्याचा Hongqi चा विचार आहे. संपूर्ण गाडीवर सोलर सिस्टम बसवल्यानंतर दररोज सुमारे 10 युनिट वीज तयार करण्याचे लक्ष्य असल्याचे अहवालात म्हटले आहे. या ऊर्जेतून गाडीला दररोज 80 किलोमीटरपर्यंत अतिरिक्त ड्रायव्हिंग रेंज मिळू शकते, असा दावा करण्यात आला आहे. मात्र हा आकडा प्रत्यक्ष वापरातील हवामान, सूर्यप्रकाश आणि इतर परिस्थितींवर अवलंबून राहू शकतो.
Hongqi इलेक्ट्रिक गाड्यांच्या चार्जिंग तंत्रज्ञानावरही काम करत आहे. कंपनी Flash Charging Technology विकसित करत असून, त्याद्वारे बॅटरी फक्त 9 मिनिटांत 10% वरून 97% पर्यंत चार्ज करण्याचे लक्ष्य आहे. शिवाय पुढच्या पिढीच्या Solid State Battery तंत्रज्ञानावरही कंपनी चाचण्या करत आहे. सोलर रूफ, अल्ट्रा फास्ट चार्जिंग आणि सॉलिड स्टेट बॅटरी या तिन्ही तंत्रज्ञानांमुळे पुढच्या काळातील इलेक्ट्रिक गाड्यांची रेंज आणि चार्जिंगचा अनुभव बदलण्याची शक्यता आहे.
मात्र Hongqi चे हे सोलर तंत्रज्ञान आणि फ्लॅश चार्जिंग सिस्टम सामान्य ग्राहकांसाठी प्रत्यक्ष उत्पादन म्हणून नेमके कधी उपलब्ध होणार, याबद्दल कंपनीने अजून स्पष्ट माहिती दिलेली नाही.